त्यावेळी समस्त विद्यार्थिनी वर्गाकडे पाहाण्याचा माझा दृष्टीकोण ’बहीण’ या सदरात असायचा. त्या मागचं खरं कारण कोणालाच माहीत नसल्यामुळे माझी ’सपक भाऊराया’ म्हणून फार टिंगल व्हायची.
मी देखणा होतो-आहे-असं म्हंटलं तर आत्मस्तुती होईल; पण ती वस्तुस्थिती आहे. नाव घेत नाही, पण आजही माझे कित्येक सहकारी वकील मला आपल्या घरी न्यायला कचरतात! पंधरा-पंधरा, वीस वीस वर्ष संसार केल्यानंतरही आपल्या पत्नीचा त्यांना माझ्या संदर्भात विश्वास देता येत नाही!
तर, रूपाचं एक बाजूला ठेवू. पण अभ्यासेतर चळवळीतही मी नेहमी अभ्यासाइतकाच अग्रेसर होतो. त्यामुळे, मुलांना हेवा वाटावा इतक्या मुलींशी माझे संबंध आले. (विशेष म्हणजे, आजही एखादा अपवाद वगळला तर या मुली (?) रस्त्यात थांबून माझ्याशी बोलतात. नवर्याशी चक्क माझी ओळख करून देतात (!) या पैकी कितीतरी जणींनी माझ्या प्राप्तीकरिता प्रयत्न केले असतील, पण मी कोणालाच वश झालो नाही. (आज त्याचा मला फार पश्चाताप होतो!))
दीपा कोल्हटकर, आशा तळवलकर, रजनी मरकळे, नेत्रा कुलकर्णी, सुधा नेने.... नावं आठवायची म्हंटली, नि त्यांची ’प्रेम केलेल्या’, ’अव्यक्तपणे, पण प्रेम करणार्या’, ’प्रेमात पडल्या असाव्यात असा संशय असलेल्या’ - अशी वर्गवारी केली तरी पहिल्या प्रकारात तेरा मुली मला आठवतायत. दुसर्या प्रकारात असंख्य होत्या, नि तिसर्यात दोन-तीन! त्यांची एव्हाना सर्वांची नावं बदललेली आहेत, म्हणून मी निर्धास्तपणे नावं सांगितली.
एक जाई सोडली तर यातल्या कोणालाही मी ’माझी’ म्हणायला तयार नव्हतो. अन् जाई ’पद्माकर’ ची होती!
** ** **
पण आता खरं कबुल करायला हरकत नाही. कॊलेजच्या वातावरणात रंगल्यानंतर जाईच्या आठवणींनी मला ईतका त्रास दिला नाही. तिला वगळता काहीच उरत नाही, ही माझी समजूत अगदी भ्रामक ठरली. याचा अर्थ, मी जाईशी बेईमान होऊन कुणा मुलीच्या प्रेमात वगैरे पडलो असा नाही. पण मुलींकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनात नंतर-नंतर खूपच बदल झाला. वागण्यातही फरक पडला. कॊलेज-लाईफ़ त्यामुळे उपभोगता आलं. मनाला अपराधाची टोचणी अशी लागली नाही केव्हाच.
त्या काळात दीपा कोल्हटकर हे नाव माझ्या जोडीनं घेतलं जायचं. तिचा चेहरा कंपासानं वर्तुळ काढल्यासारखा गोल होता. गाल गुब्रे-गुब्रे होते. नाक थोडं अपरं आणि नकटं होतं. डोळे मात्र मांजरीसारखे घारे आणि टप्पोरे होते. एकदम गोड दिसायची पोरगी. तिच्या गुलाबी रंगाला तिचे तपकिरी छटा असलेले कुरळे केस फार शोभून दिसायचे. माझ्या मनात जाई नसती तर या मुलीच्या मी केव्हाच प्रेमात पडलो असतो. इव्हन, तिनं त्या बाबतीत धीटपणे पुढाकारही घेतला होता.
महाडच्या स्पर्धेसाठी जी नावं आली होती, त्यात ’दीपा कोल्हटकर पी.डी.’ हे एक नाव होतं. नावावरून, किंवा आवाजावरून, किंवा पाठमोर्या आकृतीबंधावरून मुलीच्या रूपाची कधीही कल्पना करायची नसते हे एव्हाना मला कळायला लागलं होतं. माझ्या एका मित्राच्या बोलण्यात, त्याच्या शेजारी राहणार्या एका मुलीचा फार वेळ उल्लेख यायचा. बरं तिचं नाव पण आई-बापानं अगदी शोधून काढलं होतं. सुवर्णा. का कोणास ठाऊक, ही सुवर्णा म्हंटलं की वैजयंतीमाला अगदी गॊगल्ससह माझ्या डोळ्यांसमोर साकार व्हायची. म्हणून म्हंटलं - चल दाखव तरी तुझी सुवर्णा! तर.... अगग! रेल्वेच्या इंजिनाची भट्टी आणि कोळशाच्या समागमातूनच तिचा जन्म झाला असणार!
होतं असं बर्याचदा, मागून तंबोर्यासारखी भरीव वाटणारी पोरगी आवर्जून पुढे जाऊन, मान वळवून पाहावी, तर हमखास तिच्या डोळ्यांच्या जागी कोटांची बटणं तरी दिसतात, किंवा कोणी तरी खालून बोट लावून वर केल्यासारख्या तिच्या नाकपुड्या तरी वर उचललेल्या असतात, नाही तर तिचे दात भलतेच जागरूकपणे पुढे येऊन तिच्या ओठांचं संरक्षण करीत असतात.
म्हणूनच, ’दीपा कोल्हटकर’ या नावाकडून माझ्या कसल्याही अपेक्षा नव्हत्या.
can i get the softcopy of this novel on net.. let me know
ReplyDeleteamarshriram@gmail.com