Sunday, July 27, 2014

तुम्हाला पुणेकर व्हायचं का?

...आता तुम्हाला पुणेकर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो.

पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत, उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.अमेरिकेची आर्थिक आघाडी- ठोका.

दिवसातून एकदा तरी "चक चक पूर्वीचे पुणं राहिलं नाही, पूर्वीचे पुणं राहिलं नाही" हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, आमच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, कचेरी, ओमकारेश्वर, पेनशनर मारुतीची टेकडी, मंडई आणि शिशुविहार, कुठेही ऐकायला मिळेल, "आमच्या वेळी ते तस नव्हतं!"

मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. त्यात शुद्ध मराठी या नावाची एक पुणेरी बोली आहे. आता ह्या बोली मध्ये व्यासपीठावरची पुणेरी, घरातली पुणेरी, दुकानदाराची पुणेरी, ह्यातला फरक नीट समजावून घेतला पाहिजे. आता खासगी पुणेरी बोली भाषा आणि जाहीर बोली भाषा ह्यातल्या फरकाचा एक उदाहरण पहा. अशी कल्पना करा, की कोणीतरी एक प्राध्यापक भांबुर्डेकर हे प्राध्यापक येरकुंडकराबद्दल स्वतःच्या घरी बोलतायत:

"बोंबला! या यारकुंडवारशास्त्र्याचा सत्कार! च्यायला, येरकुंडकारचा सत्कार म्हणजे कमाल झाली. वास्तविक जोड्‍याने मारायला हवा याला. ऋग्वेदाचे भाषांतर म्हणे! कमाल आहे! अहो ऋग्वेदाचा बट्ट्याबोळ! आणि ह्यांना च्यायला सरकारी अनुदानं, पन्नास-पन्नास हजार रुपये!"
पुणेरी मराठीतून संताप व्यक्त करायला दुसर्‍याला मिळालेले पैसे, हा एक भाषिक वैशिष्ठ्याचा नमुना मानावा लागेल.

"ओढा! ओढा लेको पैसे! करा चैन! खा! रोज शिकरण खा! मटार उसळ खा!". अगदी चैनीची परमावादी. पुणेरी मराठीत इकडेच संपते- शिकरण, मटार उसळ वगेरे. "आहो! आहो चक्क वीस-वीस रुपये मिळवले" हे वाक्य वीस वीस लाख मिळवले ह्या ऐटीत उच्चारावे.
"आणि ह्यांचा म्हणे सत्कार करा! ह्यांना श्रीफळे द्या!" पुणेरी मराठीत नारळाला 'श्रीफळ' म्हणतात, आणि चादरीला 'महावस्त्र'

आता ह्याच खासगी पुणेरी बोलीचे जाहीर बोली भाषेतील रुपांतर पहा. हाच प्राध्यापक, ह्याच गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार.

"गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार, म्हणजे साक्षात विद्द्वात्तेच्या सूर्याचा सत्कार! मित्रहो, आजचा दिवस, पुणे महानगराच्या सांस्कॄतिक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हे माझे गुरु...म्हणजे मी त्यांना गुरूच मानत आलो आहे, ते मला शिष्य मानतात का नाही, हे मला ठाऊक नाही." इथे हशा. सार्वजनिक पुणेरी मराठी मध्ये, व्यासपीठावरच्या वक्त्यांनी तिसर्‍या वाक्यात जर हशा मिळवला नाही, तर तो फाउल धरतात. तेव्हा होतकरू पुणेकरांनी जाहीर पुणेरी बोलीचा अभ्यास करताना हे नीट लक्षात ठेवायला पाहिजे.

"आता, एका परीने तसा मी त्यांच्या शिष्यच आहे- कारण, ते मुन्सिपलाटीच्या शाळेत शिक्षक असताना, मी पहिल्या इयत्तेत त्यांचा विद्यार्थी होतो." म्हणजे, येरकुंडकर प्रोफेसर, हा एकेकाळी मुन्सिपालटी शाळामास्तर होता, हे जाता जाता ध्वनित करून जायचं.
"त्यांचे तीर्थरूप, सरदार पंचापात्रीकारांच्या वाड्यातील आहार विभागात सेवक होते." म्हणजे तिकडे वाड्यावर स्वयंपाकी होते, हे सांगून मोकळे व्हायचे.
"असो! अत्यंत दारिद्र्यात बालपण घालवल्यानंतर आता अरण्येश्वर कॉलनीतल्या आपल्या प्रशस्त बंगल्यात राहताना प्राध्यापक येरकुंडकरांना किती धन्यता वाटत असेल!" म्हणजे विद्वत्तेच्या नावावर पैसा कसा ओढला बघा! हे आलं त्याच्यामध्ये.

"प्राध्यापक येरकुंडकर, आणि आपले शिक्षण मंत्री, एकाच शाळेत शिकत असल्यापासूनचे स्नेही आहेत."- म्हणजे वशिला कसा लागला!

सार्वजनिक पुणेकर व्हायचे असेल, तर जाहीर पुणेरी मराठीचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल.
आता दैनंदिन व्यावहारिक पुणेरी शुद्ध मराठी बोलीला मात्र अनेक पैलू आहेत. त्यामुळे रोजच्या व्यवहारात देखील ही बोली वापरताना, वाक्यरचनेकडे नीट लक्ष द्यायला हवे. आता हेच बघा ना, टेलीफोन रिसीवर उचलल्यानंतर, "हेलो, हेलो", असे म्हणावे, हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण पुणेरी शुद्ध मराठीत, "हेलो" याच्या ऐवजी, दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला जो एक नैसर्गिक तुसडेपणा येत असतो, तो आणून, "हेलो" म्हणण्याच्या ऐवजी "कोणे?" असे वस्‌कन ओरडायचे. म्हणजे टेलीफोन‍ करण्याप्रमाणे ऐकण्यालादेखील पैसे पडले असते, तर माणूस जसा वैतागला असता, तसे वैतागायचे. मग तिकडून विचारतो कोणीतरी, " आहो, जरा प्लीज गोखल्यांना बोलावता का?" असं विचारलं रे विचारलं की पुण्याबाहेरचे तुम्ही आहात, हे पुणेरी पोर देखील ओळखेल. त्याच्या ऐवजी, "गोखल्यांना बोलवा" असा इथून हुकुम सोडायचा. मग पलीकडून आवाज येतो, "अहो इथे दहा गोखले आहेत! त्यातला कुठला हवाय?"

"तो कितवा तो मला काय ठाऊक! LIC मध्ये झोपा काढायला जातो त्याला बोलवा!!"
मग इकडून आवाज ऐकू येतो, " अरे गणू! इथे तुझ्यासाठी फोनवर कोणीतरी पेटलाय रे!" "च्यायला, ह्या गण्याचे दिवसाला शंभर फोन." हे सुद्धा आपल्याला ऐकू येते.

पुणेकर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. तो शिवछत्रपती किंवा लोकमान्य टिळकांचाच असला पाहिजे, असं मुळीच नाहीये. म्हणजे आपल्या अळीचा गणपती विसर्जनाच्या दिवशी रांगेत कितवा जावा, इथ्पासून पुणेरी गावरान शेंग ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे टिळक पुण्यातीथीच्या दिवशी आगरकरांविषयी चा जाज्ज्वल्य अभिमान, क्रिकेट च्या टेस्ट च्या वेळी देशी खेळांविषयीचा जाज्ज्वल्य अभिमान- अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून पुण्याचे संपूर्ण नागरिकत्त्व मिळत नाही. अधून मधून वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये एक पत्र पाठवावे लागते. त्यासाठी पत्रलेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे.

पुणेकर होण्यासाठी सायकल चालवणं, ही क्रिया एक खास कला म्हणूनच शिकायला हवी. सायकलवर बसता येणं, म्हणजे पुण्यात सायकल चालवता येणं, हे नाही. "चालवणे" इथे हत्त्यार चालवणे, किंवा चळवळ चालवणे, अशा अर्थाने वापरलं पाहिजे. सायकलचा मुख्य उपयोग, वाहन म्हणून न करता वाहत्या रस्त्यात मध्यभागी कोंडाळे करून गप्पा मारताना ’टेकायची सोय’ म्हणून करायला हवी. यातूनच पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचे शिक्षण मिळते! त्याचप्रमाणे, पाहुणे नामक गनीम येतात, त्यांना वाड्यामध्ये सहजासहजी एकदम प्रवेश मिळू नये, यासाठी मुख्य प्रवेशद्वारात सायकलींची बॅरीकेड रचता यायला हवी. त्या ढिगार्‍यातून नेमकी आपलीच सायकल बाहेर काढता येयला हवी. सायकल, हे एकट्याने बसून जायचे वाहन आहे, हे विसरायला हवे. किमान तिघांच्या संख्येनी, रस्त्याच्या मधून गप्पा मारत मारत जाता आले पाहिजे. नजर समोर न ठेवता, फुटपथावरील चालत्या-बोलत्या आणि इतर प्रेक्षणीय स्थळांच्या तिथे येणे जाणे चालू असतं तिथे ( --> ) असं पाहिजे. सायकल ला घंटी,दिवा, ब्रेक हे वगैरे असणं, हे म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे.

अशा रितीने पुणेकर होण्यातल्या प्रथम, द्वितीय, वगैरे परीक्षा उत्तीर्ण होत होत सार्वजनिक पुणेकर होण्याची पहिली परीक्षा म्हणजे कुठल्यातरी सौस्थेंच्या कार्यकारी मंडळामध्ये तिथे शिरायची धडपड सुरु ठेवायची. उगीचच काहीतरी, "श्रीमंत दुसरे बाजीराव साहेब ह्यांचे शुद्धलेखन" किंवा "बाजरीवरील कीड" असल्या फालतू व्याख्यानांना जाऊन सुद्धा हजेरी लावायची,आणि व्याख्यानानंतर, त्या व्याख्यात्याला भेटून "... या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायचीये" , असे चारचौघात म्हणून टाकावे . हा हा म्हणता आपण खासगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर होऊन जाल!

आता पुण्यात राहून दुकान वगैरे चालवायची इच्छा असेल, तर पुणेरी मराठी बोलीचा फारच अभ्यास वाढवायला लागेल. तरच किमान शब्दात गिर्‍हाईकाचा कमाल अपमान करता येईल. ती भाषा आली पाहिजे. कारण पुण्यात दुकान चालवणे, हे सायकल चालवणे, ह्या अर्थी चालवणे आहे. दुकानदारांनी गिर्‍हाईकावर सत्ता चालवायची असते. दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते. पुढे ते सिंध्या-बिन्ध्याला विकावे. जागेच्या पगडीत उरलेल्या आयुष्याची सोय होते, आणि आपण , "महाराष्ट्र व्यापारात मागे का?" या विषयावर भाषण द्यायला मोकळे!

थोडक्यात म्हणजे पुणेकर व्हायचं असेल, तर म्हातारपणाच्या सत्त्काराच्या दिशेने वाटचाल करायचा धोरण सांभाळावे लागते.

- पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)

Wednesday, July 23, 2014

लॉज ३४१ वर

"सध्यातरी शिल्लक रक्कम बर्‍यापैकी आहे." ट्रेझरनं पुढ्यात असलेल्या बॅंकबुकावर नजर टाकून माहिती दिली.  "अलीकडे फर्म्स बर्‍यापैकी उदार झाल्या आहेत.  मॅक्स लिंडर ऍंड कंपनीनेच पाचशे दिले आहेत.  वॉकर ब्रदर्सने शंभर पाठवले होते पण मी ते परत केले आणि पाचशे मागितले आहेत.  बुधवारपर्यंत मला त्यांच्याकडून काही समजलं नाही तर त्यांचे बाईंडिंग गिअर्स कामातून जातील.  गेल्या वर्षी आपल्याला त्यांचे ब्रेकर जाळावे लागले तेव्हा ते सुतासारखे सरळ आले.  वेस्ट सेक्शन कंपनीने आपली वार्षिक वर्गणी पाठवली आहे.  सध्या तरी आपल्या सार्‍या गरजा भागवता येतील एवढा पुरेसा पैसा शिल्लक आहे."
"आर्ची स्विंडनचं काय झालं?" एका ब्रदरनं प्रश्न केला.
"त्यानं आपली सारी मालमत्ता विकली आणि जिल्हा सोडून गेला.  जाता जाता थेरडा चिठ्ठी ठेवून गेला की इथे ब्लॅकमेलर्सच्या गराड्यात मोठा खाणमालक म्हणून मिरवण्यापेक्षा आपण न्यूयॉर्कमध्ये राहून तिथे रस्ते साफ करण्याचं काम मोठ्या खुशीनं करू.  तो चिठ्ठी आपल्या हाती पडण्यापूर्वीच इथून पसार झाला हे त्याच्या दृष्टीनं बरं झालं नाहीतर...? मला वाटतं पुन्हा तो या भागात तोंड दाखवण्याची हिंमत करणार नाही."
एवढ्यात टेबलाच्या दुसर्‍या टोकाजवळ असलेला एक प्रौढ इसम चेअरमनकडे तोंड करून उभा राहिला.  त्यानं आपली गुळगुळीत दाढी केली होती आणि चेहर्‍यावरून शांत व समंजस वाटत होता.
"मि. ट्रेझरर," तो म्हणाला, "मी एक प्रश्न विचारू का? आपण या जिल्ह्यातून हाकलून लावलेल्या त्या इसमाची मालमत्ता कुणी खरेदी केली?"
"होय, ब्रदर मॉरीस, ती मालमत्ता स्टेट ऍंड मर्टन कौंटी रेलरोड कंपनीनं विकत घेतली."
"याच पद्धतीनं गेल्या वर्षी टॉडमन आणि ली यांची मालमत्ता बाजारात आली होती, ती कुणी घेतली?"
"त्याच कंपनीनं घेतली ब्रदर मॉरीस!"
"त्याचप्रमाणे मॅन्सन, शूमन व्हॅन देहरे आणि ऍटवुड यांचे लोखंडाचे कारखाने विक्रीला निघाले होते ते कुणी घेतले?" 
"ते सारे वेस्ट गिल्मर्टन जनरल मायनिंग कंपनीनं घेतले."
"तुम्ही हे सारं कशासाठी विचारता हे मला कळत नाही ब्रदर मॉरीस."  चेअरमन म्हणाला.  "ते कुणी विकत घेतले याच्याशी आपल्याला काय देणंघेणं आहे.  ते कुणीही हा उद्योग जिल्ह्याबाहेर तर घेऊन जाणार नाहीत?" 
"माफ करा चेअरमन, पण मला वाटतं आपल्या दृष्टीने या घटनांशी अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा संबंध आहे.  गेली दहा वर्षे ही परंपरा चालू आहे.  आपण छोट्या-छोट्या व्यावसायिकांना इथून हाकलून लावत आहोत.  त्याचा परिणाम काय होतो?  त्याची जागा रेलरोड किंवा जनरल आयर्नसारख्या बड्या कंपन्या घेतात.  त्यांचे संचालक न्यूयॉर्क किंवा फिलाडेल्फियाला राहतात.  ते आपल्या धमक्यांना जराही भीक घालत नाहीत.  आपण फार तर त्यांच्या स्थानिक प्रमुख अधिकार्‍यांना हाकलवू शकतो पण त्यामुळे काय होतं?  त्यांच्या जागी दुसरे नवे अधिकारी येतात.  अशा तर्‍हेनं आपण आपल्यालाच मोठा धोका निर्माण करून घेत आहोत.  छोट्या माणसांकडून आपल्याला कसलाच धोका नसतो. त्यांच्याजवळ पैसा नसतो की ताकद नसते.  आपण त्यांचा पिळून अगदी चोथा करीत नाही तोपर्यंत ते इथेच राहणार आणि आपल्या धाकात राहणार.  मात्र आपण या मोठ्या कंपन्यांच्या दृष्टीनं त्यांच्या नफा मिळवण्याच्या मार्गातले अडथळेच ठरू.  ते पैसा खर्च करायला मागेपुढे बघणार नाहीत की चिकाटी सोडणार नाहीत.  ते आपल्या मागे कायद्याचं शुक्लकाष्ठ लावतील आणि आपल्याला कोर्टात खेचतील."
त्याचं ते अभद्र बोलणं ऐकून सर्वत्र एकदम स्मशानशांतता पसरली.  सर्वांचे चेहरे काळवंडले.  आपापसात सूचक नजरानजर झाली.  हे विचार इतके स्पष्ट होते, इतके ताकदवान होते की त्यांना आव्हान देणं शक्यच नव्हतं.  त्यांच्या मनात आपल्या गैरकृत्यांबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा विचार यापूर्वी कधीही आला नव्हता.  आता मात्र भीतीची थंडगार लाट सर्वांच्याच देहातून शिरशिरी आणून गेली.
"माझी एक सूचना आहे." तो ब्रदर पुढे बोलू लागला. "आपण त्या छोट्या उद्योजकांवरचं ओझं थोडं कमी करूया!  ते सारेच्या सारे या विभागातून बाहेर पळतील त्या दिवशी आपल्या संघटनेची ताकद पार धुळीला मिळालेली असेल."  
उघडपणे एवढं परखड सत्य ऐकवणं कुणालाच आवडत नाही.  सर्वांच्या संतापानं भरलेल्या नजरा झेलतच तो वक्ता परत आपल्या जागेवर बसला.  मॅकगिंटी त्याला उत्तर देण्यासाठी उभा राहिला तेव्हा त्याच्या कपाळावरही आठ्या दिसत होत्या.
"ब्रदर मॉरीस," त्यानं सुरूवात केली, "सतत रडत राहण्याची तुला सवयच आहे.  लॉजचे सर्व सभासद एकजुटीनं ठामपणे उभे आहेत तोपर्यंत संपूर्ण अमेरिकेत त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत होणार नाही.  आतापर्यंता आपल्याला अनेक वेळा कोर्टात खेचण्यात आलं नाही का?  मला वाटतं या मोठ्या कंपन्याही छोट्या कंपन्यांप्रमाणे आपल्याविरुद्ध लढा देण्याऐवजी पैसा खर्च करणंच जास्त पसंत करतील, आणि बंधूंनो आता" -बोलता-बोलता मॅकगिंटीनं आपल्या डोक्यावरची मखमली काळी टोपी आणि गळ्याभोवती गुंडाळलेला पट्टा काढून टाकला- "लॉजसमोर आज संध्याकाळि चर्चेसाठी असणारे विषय संपले आहेत.  आता फक्त एक गोष्ट बाकी आहे त्यावर आपण जाताजाता विचार करुया!  आता थोडंसं खाणं-पिणं आणि मजा करणं!" 

 माणसांचे स्वभावसुद्धा किती विचित्र असतात.  खूनखराबा या मंडळींच्या रक्तातच भिनलेला.  एखाद्या परिवारातल्या कर्त्या पुरूषाला पोहोचवणं, त्यांची रडणारी पत्नी, असहाय्य मुलंबाळं यांची जराही पर्वा न करता अथवा दयामाया न दाखवता आपली पाशवी कृत्यं पार पाडणं यांच्या हातचा मळ.  तरीही एखादं शोकगीत ऐकून मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी येत होतं.  मॅकमर्डोचा आवाज चांगलाच भारदार आणि तितकाच गोड होता.  यापूर्वी त्याला लॉजच्या सर्व सभासदांची मनं जिंकता आली नसली तरी यावेळी मात्र तो कमी पडला नाही.  पहिल्या रात्रीच त्यानं आपल्या सर्व भाऊबंदांची मनं जिंकली आणि आपल्या संघटनेत पुढे जाण्याच्या दृष्टीनं चांगलीच प्रगती केली.  चांगला सहकारी आणि उत्तम फ्रीमन होण्याच्या दृष्टीनं अनेक पात्रता अंगी असाव्या लागतात.  आपल्याजवळ त्या आहेत हे त्यानं त्या संध्याकाळी सिद्ध करून दाखवलं.  व्हिस्कीच्या बाटल्या या हातातून त्या हातात अशा पुढे सरकत होत्या.  सारे सभासद हास्यविनोदात गर्क झाले होते.  याच धामधूमीत बॉडीमास्टर पुन्हा एकदा बोलण्यासाठी उठून उभा राहिला.
"मित्रांनो," तो म्हणाला, "या गावातला एक इसम विनाकारण हात धुऊन आपल्या मागे लागला आहे.  त्याबद्दल त्याला कसा धडा शिकवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे.  मी 'हेरॉल्ड'च्या जोस स्टॅंगरबद्दल बोलतो आहे.  तो पुन्हा पुन्हा आपल्याविरोधी गरळ कसं ओकतो आहे हे तुम्हाला माहीत आहे ना?"
सर्वांकडून त्याच्या विधानाला पुष्टी देणारी कुजबूज झाली.  काहींच्या तोंडून इरसाल शिव्याही ऐकू आल्या.  मॅकगिंटीनं आपल्या जाकिटाच्या खिशातून एक घडी केलेला वर्तमानपत्राचा तुकडा बाहेर काढला आणि तो उलगडून वाचू लागला.
"कायदा आणि सुव्यवस्था!" तो म्हणतो, "कोळसा आणि लोहखनिजानं समृद्ध परिसरातील दहशतवादाचं साम्राज्य.  पहिला खून होऊन आमच्या भागात गुन्हेगारी संघटनेचं अस्तित्त्व सिद्ध झाल्याला आता एक तप उलटून गेलं.  तेव्हापासून सुरू झालेलं खूनखराब्याचं दुष्टचक्र कधी थांबलंच नाही.  या गोष्टी आता एवढ्या थराला गेल्या आहेत की आमच्या सभ्य सुसंस्कृत जीवनाला तो एक कलंक ठरला आहे.  युरोपातील जुलूम जबरदस्तीला कंटाळून जे लोक आमच्या देशाच्या आश्रयाला येतात त्यांचं स्वागत आमचा देश याच पद्धतीनं करणार का?  ज्यांचा मोठ्या विश्वासानं आसरा घ्यावा त्यांच्याच अत्याचारांना त्यांनी बळी पडावं कां?  स्वातंत्र्याची ग्वाही देणार्‍या आमच्या तारांकित ध्वजाखाली कायदा पायदळी तुडवून दहशत माजवणारं राज्य अशी आमची प्रतिमा त्यांच्यासमोर उभी राहावी का?  पूर्वेकडे माजलेल्या त्या अनागोंदी पुढे आमचे राज्यकर्ते पार हतबल झाले आहेत असं समजायचं का? सारे गुन्हेगार परिचयाचे आहेत.  त्यांची संघटना कोणती हे सर्वांना माहीत आहे.  हे सारं आम्ही किती दिवस सहन करणार आहोत की आम्ही कायमचं...  मला वाटतं या गटारगंगेतला पुरेसा नमुना मी तुमच्यासमोर ठेवला आहे."  चेअरमन हातातला कागद टेबलावर आपटत म्हणाला.  "आपल्याबद्दल हा इसम हे असं बोलतो.  माझा तुम्हाला प्रश्न आहे की आपण त्याचं काय करायचं?"
"त्याला ठार मारा!" डझनभर ब्रदर्स एकदम ओरडले.
"माझा याला विरोध आहे!"  गुळगुळीत दाढी केलेला मघाचाच मॉरीस म्हणाला.  "माझं ऐका बंधुंनो, या परिसरात आपली दहशत प्रचंड प्रमाणात वाढली आहे पण एक क्षण असा येईल की प्रत्येक सर्वसाधारण माणूस स्वत:च्या बचावासाठी एकत्र येईल आणि आपलं अस्तित्त्व संपवून टाकेल.  जेम्स स्टॅंगर एक वयस्कर माणूस आहे.  त्याला या गावात आणि परिसरात मान आहे.  त्याचं वृत्तपत्र सर्वसामान्यांचं वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध आहे.  अशा माणसाला मारलं तर सार्‍या राज्यात खळबळ माजेल आणि त्याचा विनाश हा अखेरीस आपला विनाश ठरेल."
"आणि ते आपला विनाश कसा घडवून आणतील ते तरी सांग पळपूट्या!"  मॅकगिर्टी ओरडला.  "पोलिसांकडून? त्यांच्यापैकी अर्ध्यांना आपण पोसतो आणि राहिलेले अर्धे आपलं नाव ऐकून चळाचळा कापतात.  कायद्याचा वापर करून न्यायाधीशाद्वारा शिक्षा ठोठावणार?  या मार्गाला आपण पूर्वी तोंड दिलं नाही?  त्यातून अखेर काय निष्पन्न झालं?"
"पण यावेळी कदाचित जज लिंच हे प्रकरण हाताळेल!"*  ब्रदर मॉरीसनं इशारा दिला.
त्याच्या या इशार्‍याविरुद्ध सभासदांमध्ये संतापाची लाटच उसळली.
"मी बोट उचलण्याचा अवकाश,"  मॅकगिंटी कडाडला.  "दोनशे माणसं गावात घुसतील आणि सारं होत्याचं नव्हतं करतील."  अचानक त्याचा आवाज आणखीनच चढला.  भुवया वर चढल्या.  "हे बघ ब्रदर मॉरीस, गेले कित्येक दिवस मी तुझ्यावर नजर ठेवून आहे.  तुझ्यात जराशीही हिंमत नाही आणि तू इतरांचंही खच्चीकरण करतो आहेस ब्रदर मॉरीस!  कदाचित एक वेळ अशी येईल की या कार्यक्रमपत्रिकेवर तुझंच नाव असेल.  तुला त्याची पूर्वकल्पना असावी म्हणून हे आधीच सांगतो आहे."

Friday, July 18, 2014

कर्मकांड

एका अरण्यात एका ऋषींचा आश्रम होता.  आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर व रम्य होता.  ऋषींबरोबर त्यांचे बरेच शिष्यही आश्रमात राहत होते.  रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सर्व जण आश्रमाची स्वच्छता, गोशाळेत गायींना चारा घालणे, दूध काढणे, नदीवरून पाणी आणणे इत्यादी कामे करीत असत.  आपल्या गुरूंवर त्यांची नितांत भक्ती होती.  गुरूजी रोज सकाळी आपल्या शिष्यांना शिकवीत असत.  श्लोकांचे पाठांतर करून घेत.  नंतर प्रवचन देत.  दररोज एक मांजर येऊन प्रवचन चालू असताना तिथे लुडबूड करीत असे.  शिष्यांचे लक्ष सारखे त्या मांजराकडे जाई.  तेव्हा गुरूजींनी एका शिष्याला असे सांगितले की, प्रवचनाच्या वेळी या मांजराला बांधून ठेवत जा.

आता दिवसभर मोकळे असणारे मांजर प्रवचनाच्या वेळी बांधून ठेवण्यात येऊ लागले.  पुढे गुरूजींचा स्वर्गवास झाला, तरी प्रवचनाच्या वेळी मांजराला बांधून ठेवणे चालूच राहिले.  

काही दिवसांनी ते मांजर मेले.  तेव्हा शिष्यांनी दुसरे मांजर आणून प्रवचनाच्या वेळी बांधून ठेवायला सुरूवात केली.  पुढे शेकडो वर्षांनी पुजा-प्रवचनाच्या वेळी मांजराला बांधून ठेवण्याचे महत्त्व व त्याबद्दलचा गूढार्थ या विषयी महान शिष्यांनी विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले.  

तात्पर्य: धार्मिक कार्यात कर्मकांड शिरते, तेव्हा मूळ हेतूचा विसर पडलेला असतो.

अंजली नानल
बोधकथा / दैनिक सकाळ
सोमवार दिनांक १९ नोव्हेंबर २०००

Tuesday, January 7, 2014

जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे


दहा वर्षांपूर्वीं ‘मी कसा झालो?’ हे माझे ‘वाङमयीन आत्मचरित्र’मी प्रसिद्ध केले. आज माझ्या जीवन-चरित्राचा पहिला खंड प्रसिद्ध होतो आहे. त्यामध्ये जन्मापासून तो वयांच्या तिसाव्या वर्षापर्यंतच्या वृत्तांत मी सांगितलेला आहे. असे निदान आठदहा तरी खंड प्रसिद्ध होतील. मराठी भाषेतच काय, पण जगामधील कोणत्याहि भाषेत एका माणसाचे  एवढे मोठे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याचे मला तरी निदान माहित नाही.
     
कोणी विचारील, की एका लहान माणसाने इतके मोठे आत्मचरित्र काय म्हणून लिहावे? त्याला उत्तर असे की, ह्यात ‘मी’ला महत्त्व नाही. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि वाङमयीन घडामोडी घडल्या, त्यांच्या इत्थंभूत वृत्तांत सांगण्यासाठी ‘आत्मचरित्र’ हे एक माझे निमित्त आहे. हे मराठी सामाजाचे चरित्र आहे. मी पाहिलेलया, मी ऐकलरल्या आणि मी अनुभवलेल्या अनेक व्यक्तीचे, घटनांचे, गोष्टींचे आणि अनुभवांचे हे चरित्र आहे. माझे काम पुष्कळसे प्रेक्षकाचे आणि निवेदकांचे आहे.
     
‘तुम्ही कोण?’ असे कोणी म्हणेल. मी कोण? मी एक जीवनाचा यात्रेकरु आहे. कसली वा कसली तरी पताका माझ्या खांद्यावर नेहेमी असतेच. जन्मापासून माझ्या पायाला जे  एकदा चक्र लागले आहे. ते एकसारखे फिरतेच आहे. कोणत्याहि एका ठिकाणी मी फार वेळ थांबत नाही. जिथे रंगतो, तिथे काही वेळ थांबतो. कंटाळलो की पुढे चालू लागतो.
     
कोणत्याहि एका व्यवसायांत मला रस नाही कारण, व्यवसाय हे काही माझें जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिेज, सारे मला समजलें पाहिजे? सारे मला आले पाहिजे, ही एकच माझ्या जिवाची तडफड असते.
     
आयुष्याला जीवन का म्हणतात? कारण, जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वहात राहिले, तरच ते जीवन.सांचून राहिलर तर ते डबके जीवन म्हणजे एक प्रंचड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ति कधी होत नाही.
     
रोज सकाळी सूर्योदयाबरोबर नवीन जीवन जन्माला येते. चिरंतन नावीन्य म्हणजेच जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही. मला जीवनाचा लोभ नाही पण ओढ आहे. चोहोकडून मला ते हाका मारते. आणि त्या ऐकू आल्या म्हणजे शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देहकण जीवनाकडे धावत सुटतात.
     
जीवनाचे हे विलक्षण वेड  माझ्यामध्ये कसे आले? लहानपणापासून निसर्गाचूी अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कर्‍हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखाद्यावर जेजूरीच्या खंडोबाच्या भंडार्‍याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवाजीमहाराजांचा पुरंदर किल्ला आष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपानदेवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे.
     
शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवड गांव. महाराष्ट्रातील संताच्या नि वीराच्या पदस्पर्शाने त्याचया भूमीचा कण न् कण पुनीत झालेला आहे. शिवशाहीचा नि पेशवाईचा महत्त्वाचा इतिहासच मुळी त्याच्या पंचक्रोशीत घडलेला आहे. आजहि सासवडच्या रस्त्यांतून जाऊ लागले. की उंच उंच वाडयांच्या पडक्या भितीवरुन दोनतीनशे वर्षांचा इतिहास तिमच्या कानांत कुजबुजू लागतो. ज्ञानोबाची पालखी दर वर्षीं सोपानदेवाचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते. त्यावेळी आमच्या गावात दिड्यापतकांची अशी गर्दी उडते आणि टाळमृदुंगाच्या नि ग्यानबातुकारामांच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणत! बालपणांत झालेल्या ह्या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.
     
जे रम्य आणि भव्य आहे, त्याचें सर्धन खेडेगांवातच घडते. पावलोपावली परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो तिथे. त्याची कृपा नदीच्या रुपाने तुमच्या घराजवळून वहात असते. शिवारामधल्या शेतांत डोलणार्‍या पिकावरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्र्वासच प्रतिक्षणी घेऊन येतो. शहरांत रहावयाला आलो, तरी निसर्गाची संगत मी कधीच सोडलेली नाही. मुंबईचा सागर आणि खंडाळयाचा डोंगर हे माझे सोबती आहेत.
     
जीवनाच्या आनंदामधूनच माझे वाङमय वेड निर्माण झाले आहे. वाङमयापेक्षा मला अधिक प्रिय काही नाही. वाङमय म्हणजे जीवनाचा अनुभव. जीवनाचा शोध जीवनाचे जेजे अनंत साक्षात्कार मला घडले, ते प्रकट करण्यासाठींच मी वाङमयाचा आसरा घेतला. मी आयुष्यांत पुष्कळच भटकलो. पण वाङमयाची सोबत कधी सोडली नाही. जीवनाची सेवा मी वाङमयाने केली.
     
मी उपदेशक नाही. उपासक आहे. सिद्ध नाही. साधक आहे. समाजातील अनंत दुःखाची आणि दन्यांची मला जाणीव आहे. त्यांजवर फुंकर घालण्याचाच माझ्या लेखणींने मी सतत प्रयत्न केला आहे. रंजल्यागांजल्याचा कैवार घेण्यांतच मी माझे सामर्थ्य खर्च केले आहे. जगातील म्लान वदने प्रफुल्लित कशी होतील ह्याचीच मी सदैव चिंता केली आहे. माझ्या दोषांची आणि चुकींची मला जाणीव आहे. पण सज्जनांच्या निदेचे पाप माझ्या हातून कधी घडलेले नाही. लोकगंगेचे जीवन गढूळ करण्याचे दुष्कर्म मी कधी केलेले नाही.
     
मी गुणांचा पूजक आहे. हे माझे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले रे दिसले की मी त्यांजवर तुटून पडतो. चांगल्या गोष्टीवर प्रेम करण्याची मला उपजतच आवड आहे. सद्गुणांच्या दाराशी जन्मभर मी जी माधुकरी मागितली, त्याच शिदोरीवर आजपर्यंत मी गुजराण करीत आलो आहे.

कर्‍हेचे पाणी
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

Wednesday, January 1, 2014

चतूर माधवराव

प्रस्तावना

दातार छापखाना स्थापन झाल्यापासून "शालिवाहन शक", "मोलकरीण" ही दोन पुस्तके पूर्वी प्रसिद्ध झाली; आणि आता हे तिसरे "चतूर माधवराव" वाचकांच्या सेवेला सादर होत आहे.  आम्ही लिहिलेल्या सर्व पुस्तकांहून याची रचना जरा निराळ्य़ा तर्‍हेची आहे.

आम्ही यापूर्वी ज्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबर्‍या लिहिल्या त्या सर्व आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबर्‍यांची रूपांतरे आहेत.  परंतू प्रस्तुत पुस्तक हे कोणत्याही पुस्तकाचे किंवा पुस्तकखंडाचे रूपांतर नसून या सर्व गोष्टी स्वतंत्रपणे लिहिल्या आहेत.

नुकतेच ख्रिस्तवासी झालेले सर ऑर्थर कॉनन डाईल यांच्या "शेरलॉक होम्स" च्या धर्तीवर या सर्व गोष्टी अगदी नवीन रचल्या आहेत.  निरीक्षणी, चातुर्य, तर्कशुद्ध विचारसरणी, कल्पकता यांच्या पायावर प्रत्येक गोष्टीची उभारणी केली आहे.  प्रत्येक गोष्टीत बहुधा काहीतरी नवीन तर्कसरणीचा आश्रय केलेला आढळून येईल आणि प्रथमत: कठीण वाटणार्‍या कोड्याचा तार्किक पद्धतीने केलेला उलगडा वाचकांचे मनोरंजन करून त्यांच्या तर्कशक्तीस चालना देण्यास साह्य करील, अशा दृष्टीने प्रत्येक गोष्टीची रचना केलेली आहे.  

या पुस्तकात ’आद्य’ रसाला जागाच नसल्यामुळे हे कित्येकांना रुक्ष वाटेल.  परंतु शृंगार, ग्राम्यता, किंवा अश्लीललता यांपासून या गोष्टी पूर्णपणे अलिप्त ठेवण्याची खबरदारी घेतलेली असल्यामुळे हे पुस्तक तरूणांच्या हाती बिनधोक देता येण्यासारखे आहे.  "कुटूंबातील लहान थोर माणसे एकत्र बसली असता सर्वांसमक्ष जे पुस्तक बिनधोक वाचता येईल, ते पुस्तक चांगले," अशी जी विद्वानांनी चांगल्या पुस्तकाची कसोटी ठरविली आहे त्या कसोटीस हे पुस्तक पूर्णपणे उतरेल असा आम्हास भरवसा वाटतो.

प्रत्येक गोष्टीत माधवराव आणि बळवंतराव अशी दोन पात्रे आहेत.  वाचकांनी आपणास माधवराव न समजता बळवंतराव समजून गोष्ट वाचावी, आणि प्रत्येक गोष्टीत जेथे पूर्वरंगाचे दुवे पुरे होतात, तेथे थोडा वेळ थांबून त्या दुव्यांवरून आपणांस अनुमानश्रुंखला कितपत तयार करता येते, याचा विचार करावा आणि नंतर उत्तररंग वाचावा म्हणजे आपल्या तर्कसरणीपेक्षा माधवरावांची तर्कसरणी कशी सूक्ष्म व शुद्ध आहे हे लक्षात येऊन मनाला समाधान वाटल्यावाचून राहणार नाही, असे आम्हास वाटते.  या कादंबरीतील सर्व गोष्टी ’मधुकर’ मासिकात वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झाल्या आहेत व ’हरवलेली नथ’ ही गोष्ट ’चित्रमय जगत’ व ’मधुकर’ या दोन्ही मासिकातून प्रसिद्ध झालेली आहे.  या गोष्टी जशा त्यावेळी वाचकांस आवडल्या, तशा आताही या स्थायी स्वरूपात आवडतील, अशी अपेक्षा धरणे अस्थानी होणार नाही.  अशा प्रकारच्या निरीक्षणविषयक स्वतंत्र लघुकथांची महाराष्ट्र वाङ्मयात फारच उणीव असल्यामुळे हा आमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी सरस्वतीमंदिराच्या या दालनात प्रवेश करणार्‍या वाङ्मयसेवकास ’मागच्याला ठेच पुढचा शहाणा’ या न्यायाने हा आमचा अल्प प्रयत्न मार्गदर्शक झाला तरी त्याने पुष्कळच काम केल्यासारखे होईल.

’शेरलॉक होम्स’ जसा इंग्रजी वाचकांस आवडला व त्याची नव्याजुन्या जगात प्रतिष्ठा झाली तसे भाग्य जरी ’माधवरावास’ लाभणे शक्य नाही तरी त्याच्या जनकाच्या या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्र वाचक त्याचा उपहास तरी करणार नाहीत, अशी आशा बाळगून ही प्रस्तावना पुरी करतो.  

सन् १९३०

गोविंद नारायण दातार

नवरदेवाचे पलायन

लग्न ठरल्यावर ते होऊन जाईपर्यंत वधूवरांची आईबापे त्यांना किती जपत असतात आणि त्यांचे किती लाड करत असतात, हे कोणास नव्याने सांगण्याची जरूरी नाही.  तेवढ्यापुरती आईबापांकडून अथवा सोयर्‍या धायर्‍यांकडून वधूवरांच्या शरीरप्रकृतीसंबंधाने जितकी काळजी व तत्परता दाखविली जाते, तिचा दशांश काळजी जर नेहमी दाखविली जाईल तर अकाली मृत्यूमुखी पडणार्‍या तरूणांची संख्या पुष्कळच कमी होईल, यात शंका नाही.
*******
मवाळांची गणना भित्र्यांमध्ये किंवा स्वार्थसाधूंमध्ये होत असल्यामुळे, आपणास मवाळ म्हणवून घेण्यापेक्षा जहाल म्हणवून घेणे पुष्कळास आवडते.  त्यामुळे जहाल म्हणविणारांची संख्या फुगलेली दिसते खरी, पण कर्तबगारीची वेळ आली की असल्या जहालांपैकी बरेच जण मवाळ तर, नाहीतच, अगदी गचाळ असतात असे आढळते.

पुत्रप्रेम की धनलोभ

माधवरावांना भरपूर काम असले म्हणजे ते करताना त्यांच्या अंगी मोठा हुरूप चढे, पण मनासारखे काम नसले म्हणजे त्यांचा स्वभाव अगदी उदास बने.  ही उदासीनता घालविण्यासाठी ते गंजिफा किंवा बुद्धिबळे खेळत.  तथापिअ त्यांच्या तोडीचा खेळणारा त्यांना नेहमी मिळत नसल्यामुळे खेळातसुद्धा त्यांची निराशाच होत असे.  अशावेळी वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिक पुस्तकामध्ये प्रसिद्ध होणारे बुद्धिबळाचे कठीण डाव सोडविण्यासाठी मी त्यांच्याकडे नेत असे.  परंतु मौज ही की, तासतास डोके खर्च करून आम्हास जे डाव सुटत नसत असले बिकटा डाव ते सहज चारपाच मिनीटांत सोडवीत.  हे तुम्हाला कसे साधते, असा त्यांना प्रश्न केला असता त्यांनी असे सांगितले:

’स्वाभाविकपणे घडून आलेल्या गोष्टी आणि कृत्रिम रीतीने घडवून आणलेल्या गोष्टी त्यातील भेद तुमच्या लक्षात येत नाहीत म्हणून असे होते.  प्रत्येक गोष्टीची स्वत:ची  -- निसर्गसिद्ध अशी काहीतरी मर्यादा असते.  म्हणून गोष्टी स्वाभाविकपणे घडून येत असता त्यामध्ये मर्यादेचे उल्लंघन झालेले दिसून येत नाही.  परंतु, जेव्हा कृत्रिम गोष्टी स्वाभाविक गोष्टीप्रमाणे भासवावयाच्या असतात, तेव्हा किती जरी खबरदारी घेतलेली असली, तरीदेखील, सूक्ष्म अवलोकन करणार्‍यास कृत्रिम गोष्टींमध्ये मर्यादेचे उल्लंघन झालेले हटकून आढळून येते.  एखाद्या कवीचे किंवा चित्रकाराचे उदाहरण घ्या.  या सृष्टीमध्ये एका ईश्वरावाचून सर्वगुणपरिपूर्ण -- दोषरहित असे काहीच नाही.  मनुष्य-प्राण्याच्या सर्व कृती सदोष असावयाच्याच.  "सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता:।" या सामान्य नियमाला दूर ढकलून कवी आणि चित्रकार आपापल्या कल्पनाशक्ती जोरावर निर्माण केलेल्या काव्यातील अथवा चित्रातील प्रधान वस्तूचे स्वरूप दाखविताना तिच्या ठिकाणी दोषांचा नुसता विटाळदेखील होऊ देत नाहीत.  अशा प्रसंगी ते आपल्या कलेचे घोडे इतके अमर्याद दामटतात की, त्याला तो वेग असह्य होऊन ते मध्येच तोंडघशी पडेल, ही साधी गोष्टसुद्धा त्याच्या लक्षात येत नाही.  प्रत्येक बाबतीत असेच आहे.’  अशा रीतीने त्यांचे तात्त्विक व्याख्यान सुरू झाले म्हणजे त्यांच्या निरीक्षणशक्तीचे व कार्यकारण संबंधाचे पृथक्करण करण्याच्या कौशल्याचे मला मोठे कौतुक वाटे.  

पुढील गोष्ट मी नोकरीस असताना घडलेली आहे.  ते त्यावेळी नुकतेच सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मोकळे झाले होते.  त्यांचे बुद्धिसामर्थ्य त्यांच्या वरिष्ठांपेक्षा अधिक होते, हेच त्यांना राजीनामा देण्याला कारण.  इतका ’फाजील’ बुद्धिवान नोकर वरिष्ठांना नको होता, आणि अधिकारमताने सर्वज्ञ बनलेल्या वरिष्ठांची खुशामत करण्याची माधवरावांची तयारी नव्हती, म्हणून झाले ते उभयपक्षी इष्टच झाले.  कायमची पेन्शनेबल नोकरी सोडली, म्हणून आम्ही स्नेह्यांनी त्यांना प्रथम दोष देण्यास बिलकूल अनमान केला नाही, पण लवकरच आमची चूक आमच्या लक्षात आली.  इस्लामाबादच्या बेगमसाहेबांच्या चोरीस गेलेल्या जवाहिराचा त्यांनी मोठ्या शिताफीने पत्ता लावून दिला, म्हणून बेगसाहेबांकडून त्यांना जे बक्षीस मिळाले, त्याचे व्याजच त्यांना अर्ध्या पगाराइतके येऊ लागले.
*******
एकदा दरवाज्यातून लांबवर दृष्टी पोचवून व आपले बोलणे आणखी कोणी ऐकत नाही अशी खात्री करून घेऊन तो हलक्या स्वराने बोलू लागला, "माधवराव, माझा सर्वस्वी नाश होण्याची वेळ जवळ आली की काय, अशी मला भीती वाटू लागली आहे.  पैशापरी पैसा जाणार आणि इतके दिवस मिळविलेली अब्रूही गमविण्याचा प्रसंग येतो की काय, असे मला भय पडले आहे..  लोक मला मारवाडी, कंजूष, कवडीचूंबक काय हवे ते म्हणोत, तथापि अनंत धोंडदेव लबाड माणूस आहे असे मात्र कोणाला म्हणता यावयाचे नाही.  लोकांसारखे चैनीत पैसे मी उधळीत नाही आणि कोणाकडे तोंड पसरायलाही जात नाही.  आजपर्यंत निदान पंचवीस वेळा तरी माझे हिशोब सरकारात गेले असतील, पण त्यात कधी तफावत निघाली असे कधीच झालेले नाही.  उलट माझे हिशोब चोख असतात असे एक सोडून दहा शेरे तुम्हाला पाहावयास मिळतील.  मी निढळच्या घामाने पैसे मिळवितो व काटकसरीने खर्च करतो, लोकांच्याने पाहावत नाही. मी व्याजच जबर सांगतो, ते वेळच्यावेळी मिळाले नाही तर व्याजावर व्याज घेतो, अंगभर वस्त्र वापरीत नाही, पोटभर जेवीत नाही, असे माझ्यावर लोकांचे विलक्षण आरोप आहेत."

"माझी खरी स्थिती काय आहे हे तुम्हाला समजल्याखेरीज सध्या मजवर प्रसंग कसा गुदरला आहे हे तुमच्या नीटसे ध्यानात येणार नाही.  लोक मला लक्षाधीश समजतात.  समजेनात! आणि मी जरी लक्षाधीश असलो तरी आणखी पैसा मिळवू नये असे कोणत्या शास्त्रात सांगितले आहे?  आज माझ्यावर जो प्रसंग आला आहे तो पैशाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा नाही.  आज माझी अब्रू जाण्याची वेळ आली आहे.
*******
मात्रा लागू पडली, पुत्राच्या अश्रूंनी जे कार्य घडून आले नाही, ते कार्य द्रव्यतृष्णतेने एका क्षणात करून दाखविले!  द्रव्यलोभाने त्या म्हातार्‍याचे मन पुरते व्यापून टाकले आहे, त्यात पुत्रप्रेमाला जागा मुळीच नाही हे माधवरावांनी प्रथमच ओळखले होते.  म्हणूनच त्यांनी मुद्दाम नानासाहेब इनामदारांना तेथे आणून बसवून ठेवले होते.  द्रव्य मिळवून त्याचा संग्रह करणे हेच आपल्या जन्माचे सार्थक असे मानणार्‍या त्या म्हातार्‍याने पुत्राचे कर्ज फेडण्याचे निरूपायाने कबूल केले.  लवकरच आवडीच्या गळ्यात सरी दिसू लागली.  हुंडा न घेता लग्न करण्याची विष्णूपंताची प्रतिज्ञा नानासाहेब इनामदारांनी पूर्ण केली.  त्याच जडावाच्या पाटल्या हाती असलेली नानासाहेबांची कन्या ज्या दिवशी सुनेच्या नात्याने अनंतराव मारवाड्याच्या पाया पडावयाला आली त्याच दिवशी त्या म्हातार्‍याच्या पोटात धुमसत असलेला क्रोधाग्नी पूर्णपणे शांत झाला असे माझ्या ऐकिवात आहे.

तांब्याची पट्टी

माधवराव म्हणाले, "रावसाहेब तुम्ही तर या गोसाव्याचे फारच उत्तम चित्र काढले! पण मी सांगतो, त्याचे पूर्वचरित्र बरेच विलक्षण असले पाहिजे, विरक्तीखेरीज दुसर्‍या कोणत्यातरी कारणाने याने हा वेष धारण केला असावा.  बाह्य आचरणाला व वेषाला गतानुगतिक लोक नेहमी फसत असतात."
मी म्हंटले, "माधवराव, माणसाकडे नुसते पाच-चार मिनीटे पाहून त्याच्याविषयी काहीतरी सिद्धांत ठोकून देणे हे वाजवी नव्हे.  आम्हा शिकलेल्या लोकांना साधुसंतांची अवहेलना करण्याची मोठी वाईट खोड लागली आहे, असे जुने लोक नेहमी म्हणत असतात--"
माझे भाषण पुरते संपण्यापूर्वीच माधवराव म्हणाले, "आणि ते पुष्कळ अंशी खरेही आहे.  तथापि अलीकडच्या लोकात चिकित्सकबुद्धी विशेष असल्यामुळे ते नुसत्या बाह्य देखाव्याला फारसे फसत नाहीत, ही गोष्टही तितकीच खरी आहे."

जुगाराचा भयंकर परिणाम

’सोडतीचे तिकीट घेण्यासंबंधाने तू माझा अभिप्राय विचारलास हे चांगले केलेस.  सोडत हा शुद्ध जुगार आहे, व जुगार हा काही द्रव्यसंपादनाचा नीतीचा मार्ग नव्हे.  सोडतीच्या पैशाने श्रीमंत होऊन चैन मारण्यापेक्षा भिक्षा मागितलेली शतपट बरी, असे माझे स्पष्ट मत आहे.  ईश्वरदयेने जे आपणास मिळत आहे ते काही कमी नाही.  जुगारात मिळालेला पैसा हरामाचा.  तो यशालाभास यावयाचा नाही.  सोडतीत पैसे घालणारा प्रत्येक जण मोठ्या आशेने पैसे घालीत असतो.  आपले पैसे व्यर्थ जाणार ही कल्पना जरी प्रत्येकाला असली, तरी भावी सुखाच्या कल्पना त्याच्या डोळ्यांपुढे नाचत असल्यामुळे केवळ तेवढ्या आशेवरच तो बेफिकीर असतो.  पण सोडतीचा निकाल होऊन निराशा झाली, म्हणजे आपल्या व्यर्थ गेलेल्या द्रव्याची खरी किंमत त्याला कळते, आणि त्याचा जीव तळमळू लागतो.  सोडतीत पैसा घालण्याचा विचार तुझ्यासारखे गर्भश्रीमंतच करते तर गोष्ट वेगळी होती, पण आजचा दिवस कसाबसा गेला, उद्याचा कसा जातो याची ज्यांना भ्रांत असते, असे लोकदेखील सोडतीत पैसा घालतात.  घरी बायकापोरे उपाशी मरत असता केवळ अनिश्चित आशेच्या भरी भरून, मारवाड्याचे कर्ज काढून सोडतीत पैसे घालणार्‍या लोकांची पाच सहा उदाहरणे माझ्या डोळ्यांसमोर आहेत.  सर्वच लोक कर्ज काढतात, किंवा सर्वांसच फुकट गेलेल्या पैशाबद्दल हळहळ वाटते असे माझे म्हणणे नाही.  पण ऐपत नसता सोडतीत पैसे घालणार्‍या लोकांचीच संख्या जास्त हे लोक आपल्या मूर्खपणामुळे तळमळत बसतात, त्याला लोकांनी काय करावे, असा यावर कित्येकांच्या तोंडचा आक्षेप मी ऐकला आहे, पण त्यात काही तथ्य नाही.  मूर्खांना उपदेश करून शहाणे करणे हे जाणत्या लोकांचे कर्तव्य आहे.  त्यांच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन आपण चैन मारण्याची इच्छा करणे, हे काही माणूसकीचे कृत्य नव्हे.  हा धडधडीत जुलूम आहे.  या सोडतीत घातलेल्या पैशातील अर्धी रक्कम एका धर्मकृत्याकडे जाणार आहे, म्हणून तिकीट घ्यावे असे तू लिहीतोस, यावरूनच तुझ्या मूर्खपणाची व अविचारीपणाची साक्ष पटते.  तुला जर धर्मकृत्याला मदत करावयाची असेल, तर ते एक सोडून दहा तिकिटांच्या किंमतीइतकी रक्कम सरळ धर्मकृत्यास देऊन टाक.  त्याला मी मूळीच नको म्हणणार नाही.  धर्म करावयाचा तो केवळ धर्माच्या सात्त्विक वासनेनेच केला पाहिजे.  त्यात लोभाला थोडादेखील थारा मिळता कामा नये.  लोभाला बळी पडून खर्चिलेला पैसा जरी खरोखरच्याच धर्मकृत्यात खर्ची पडला असला तरी त्यापासून पुण्यप्राप्ती होते असे मानणे म्हणजे आपली आपणच करून घेतलेली फसवणूक होय.  हा निव्वळ मूर्खपणा आहे.  असला मूर्खपणा तू करू नकोस.  सोडत हा निव्वळ जुगार आहे.  जुगार हा अविचार आहे.  जुगार हे अनीतीचे कृत्य आहे - पाप आहे.  सोडतीत मिळालेल्या पैशाबरोबरच गोरगरिबांच्या तळतळाटाचे ओझे डोक्यावर बसत असते.  असले पापाचे ओझे डोकीवर घेऊन त्यात आनंद मानणार्‍या नरपशूचे तोंडसुद्धा पाहू नये.  हे माझे लिहीणे कदाचित तुला कठोर वाटेल, पण याबाबतीत माझी मते काय आहेत हे कळविण्याची आज आयती आलेली संधी फूकट घालवू नये, म्हणून मी अगदी जिव्हाळ्याने लिहीत आहे.

मी सार्‍या जन्मात जुगार खेळलो नाही.  जुगार, मग तो कितीही क्षुल्लक असो, तो खेळणारांचा मला मोठा तिटकारा येत असतो.  जुगारी माणसाचे तोंड दृष्टीस पडले की माझ्या पायांची तिडीक मस्तकाला झोंबते, इतकी मला जुगाराची चीड आहे.’


चतूर माधवराव
मुंबई - कोकणात घडणार्‍या रहस्यमयी घटनांवर आधारित १३ चातुर्यकथांचा संग्रह
पृष्ठे - २४४
किंमत रूपये २५०/-
समन्वय प्रकाशन / अजब डिस्ट्रीब्युटर्स, कोल्हापूर