Thursday, October 28, 2010

चिमणरावाचे चर्‍हाट (लेखक - चिं वि. जोशी)

जर्मन महायुद्धाच्या वेळी पुणे येथे सरकारने लष्करी खर्चाचे हिशेब ठेवण्यासाठी मोठी थोरली हंगामी ऒफिसे उघडली.  लढाईच्या महर्घतेने पांढरपेशा लोकांची जी दाणादाण उडाली, तीत पुण्याच्या वॊर ऒफिसांनी त्यांस चांगला हात दिला हे प्रसिद्ध आहे.  मॆट्रिक झालेल्या इसमाने समक्ष अर्ज करण्याचा अवकाश, की त्यास साठाची व बी. ए. स एकशेविसाची नोकरी हटकून ठेविलेलीच.  वशिल्याच्या तट्टास तर त्याच्या दुप्पट तनखा मिळत असे; परंतु असल्या प्राण्यांत गणना होण्याइतका भाग्यवान नसल्याने मला साठ रुपयांचाच प्रारंभ मिळाला.

निव्वळ मॆट्रिकवर इतके रूपये मिळत असल्याने छपन्न देशचे कारकून पुण्यास लोटलेले होते.  मद्रासचे एन् माडती आप्पा, पंजाबचे धिप्पाड दाढीवाले लाला, बंगालचे भुकेकंगाल बाबू इत्यादी लोक आपआपल्या देशातून येताना निसर्गदत्त लेण्यांशिवाय फारशी अधिक वस्त्रे न घेता येत.  कारण कापडाची महागाई इतकी भयंकर झाली होती, की त्या वेळी धोतरजोडीस जी किंमत पडत असे तिच्यात हल्ली इरकली लुगडे मिळू शकते.  परंतु हे बुभुक्षू लोक एक महिन्याचा पगार हाती पडताच नखशिखान्त साहेबी पोशाखात विराजमान होऊन व्हॆसेलिन, पोमेड, ब्रिलियन्टाइन वगैरे उपयुक्त जिनसांच्या किंमती आणखी वर  चढवीत असत.  मीही एक-दोन महिन्यांत अप-टु-डेड बनलो हे सांगावयास नकोच.  एक लहानसे बिर्‍हाड भाड्याने घेऊन त्यातील पुढच्या खोलीत टेबलखुर्च्यांचा थाट ठेविला आणि दारावर इंग्रजी अक्षरांत पाटी लाविली.  परंतु या माझ्या थाटाने दोन ब्यादी माझ्यामागे लागल्या.  एक उपवर मुलींचे बाप, व दुसरी विमा कंपन्यांचे एजंट म्हणजे दलाल.  या वर्षी मुलींच्या बापांस चकविण्यासाठी ज्या यातायाती मला कराव्या लागल्या त्यांचा अनुभव आमच्या पुरूषवाचकांपैकी जे विवाहित आहेत त्यांस पूर्वी आलाच असेल; व जे अविवाहित आहेत त्यांस येणार आहेच; म्हणून त्यांचे वर्णन करून स्मरणांचे दु:ख वाढविण्याच्या किंवा अपेक्षेचे सुख कमी करण्याच्या भरीस मी पडत नाही.

एका रविवारी दुपारी चार वाजता आई चहा करीत होती व मी त्याची वाट पाहात हातात एक कादंबरी घेऊन खुर्चीवर बसलो होतो.  रुपयाला एक शेर साखर व सव्वा रुपयाला एक पौंड चहाची भुकटी झाल्याने बहुतेक कुटुंबातून दुपारच्या चहाला छाटच मिळाला होता; तथापि आम्हा "वॊर हापिसवाल्यां" ना रुपयास तीन शेर साखर व बारा आणे पौंड चहा आमच्या रेशन्सबरोबर मिळे.  इतरांस ज्या सुखाचा उपभोग घेता येत नाही त्याचा उपभोग आपल्याला एकट्यालाच मिळताना सुख शतगुणित होते - आगगाडीत इतर उतारू स्थलसंकोचामुळे उभे राहणे, भांडणे करणे, चेंगरणे इत्यादी हाल अपेष्टा सोशीत असता वरच्या फळीवर स्वस्थ पडून त्यांची गंमत पाहात राहण्याचे स्वर्गसुख ज्यांनी भोगिले असेल अशा आमच्या वाचकांस माझ्या वरील सुभाषिताचे सत्य पटलेच असेल - म्हणून दुपारी चहा घेताना  मला फारच आनंद व अभिमान वाटे.

No comments:

Post a Comment