हस्तांतर
विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारूण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला : द्या इकडे.
मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर टेकली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या....
मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला....
फुले आणि ते
१.
एक रहस्य सांगावे म्हणून
फुले पाकळ्या उघडतात, तेव्हा
समस्त आस्तिक तिथेच पोहोचलेले असतात
फुलांच्या परड्या घेऊन.
२.
त्यांना एक फूलही
निर्मिता यायचे नाही तुझ्यासारखे
म्हणून तर ते तत्परतेने
उमललेली फुलेच नाहीशी करतात.
३.
फुलता येत नाही म्हणून
फुले तोडणारे लोकच
उडता येत नाही म्हणून
पाखरांना पिंजर्यात ठेवतात....
No comments:
Post a Comment