Monday, November 21, 2011

आहे आणि नाही (लेखक :- विष्णू वामन शिरवाडकर)

पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही
शाळेत शिकविल्या जाणार्‍या कित्येक गोष्टी, शाळेचा उंबरठा ओलांडून आपण बाहेर आलो म्हणजे खोट्या किंवा चुकीच्या आहेत असं आपल्याला आढळून येतं.  शाळाकॉलेजांच्या संकुचित इमारतीबाहेर मानवी व्यवहाराचं जे विशाल विद्यापीठ पसरलेलं आहे त्यात शालेय सिद्धांताची कोणी पर्वा ठेवीत नाही असंच सामान्यत: दिसून येतं.  शाळेत शिकवलं जातं एक आणि वस्तुस्थितीत असतं काहीतरी वेगळंच.  आपलं चारित्र्य आणि शील पुष्ट होण्यासाठी कितीतरी नीतिपाठांची आसवं आणि अरिष्टं आपल्याला दिली जातात!  या सोज्वळ तत्त्वांचा हात धरून आपण जगात वावरलो  तर आपल्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाविषयी शंका बाळगायचं काहीही कारण नाही अशी आपली समजूत करून देण्यात येते.  परंतु अनुभव असा येतो की निदान ऐहिक कल्याणाच्या बाबतीत हे नीतिपाठ पुरे पडत नाहीत.  पुरे पडत नाहीत इतकंच नव्हे तर त्यांच्या ते आड येतात!  दिवाळीत अंगणामध्ये लावलेल्या पणत्या वार्‍याची झुळूक आली की विझून जातात त्याप्रमाणे या शालेय तत्त्वांची अवस्था होते.  जे या तत्त्वांची लोढणी गळ्यात घालून घेत नाहीत ते मात्र पृथ्वीवरील शर्यतीमध्ये आघाडीला जातात.  अर्थात पारलौकिक कल्याणासंबंधी मात्र काही सांगता येत नाही.  परंतु जे नाणे या पेठेत चालत नाही ते दुसर्‍या पेठेतही चालेल हे फारसं संभवनीय नाही.  तेव्हा शाळेत शिकवलं जातं ते सारं खरंच असतं असं नाही.