कपिल व वृषाली यांना बारावीला त्यांच्या आयुष्यातील सर्वात जास्त गुण मिळाले. त्यांच्या अकरावीचा निकाल लागण्यापूर्वी मी जेलमध्ये आलो. संपूर्ण वर्ष तणावाचा सामना करीत सारंगीने व तिच्या आई अन् दिन भावांनी त्यांना सांभाळून घेतले. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनाच आहे. बहुतांश सर्व वृत्तपत्रात मुलांचे कौतुक झाले. ते वाचून जेलमध्ये पण कैद्यांनी माझे अभिनंदन केले. डोळ्यातील पाणी लपविता लपविता माझी घालमेल झाली.
संकट हे आयुष्याला वळण लावते. बर्याचवेळी संधी संकटाच्या रूपाने उभी असते. ही गोष्ट माझ्या दोन मुलांनी जर ओळखली तर त्यांना पुढील आयुष्यात जिद्दीने उभे राहता येईल, असा माझा ठाम विश्वास आहे. न्यायालयात मुलांना आणू नका त्यांच्या मनावर परिणाम होईल, असे मला बर्याच लोकांनी सांगितले. अगदी पोलिस व सरकारी वकिलांनी सुद्धा... पण मी निर्णय त्या दोघांवरच सोडला. माझं जेलमध्ये अनिश्चित काळासाठी असणं ही माझ्या दोन मुलांना संकटाच्या रूपात संधी आव्हानच देत आहे. आम्हा तीन भावांच्या सर्व मिळून सहा मुलांमध्ये फक्त कपिल व वृषाली दहावी व बारावीला प्रथम श्रेणीत पास झाले. बाकी चारजण बारावीपर्यंत पोहोचू पण शकले नाहीत. प्रमोद नेहेमी मला ’शराबी’ या चित्रपटातील आमिताभचे वाक्य सांगत असे
पुत सुपुत तो क्यू धनसंचय?
पुत कुपुत तो क्यू धनसंचय?
प्रमोद कधीही चांगला बाप बनू शकला काय? कारण राजकीय यशाने त्याला आर्थिक सुबत्ता आणली. तात्काळ त्याने पुन्हा ते तारूण्य, जे काकांच्या जाण्याने कौटुंबिक जबाबदारीत गेले होते, ते पुनश्च जगण्याचा त्याने चंगच बांधला होता. पण सत्तेपुढे शहाणपण नको, असे घरातील सर्वांनीच स्वीकारले असावे.
राहुल - कपिल आणि पूनम - वृषाली
दि. ३०-०४-२००६ च्या टाईम्स ऒफ इंडिया मध्ये पान क्रमांक दोन वर राहुल व कपिल या चुलत भावांचे दोन फोटो छापले होते. त्याचे शीर्षक होते In the name of the father. दोघेजण वेगवेगळ्या ठिकाणी आपआपल्या पित्यासाठी मंदिरात प्रार्थना करून बाहेर पडत असताना हे फोटो काढण्यात आले होते.
राहुल व कपिल यांच्या वयात साडेचौदा वर्षाचे अंतर आहे. दोघेही एकाच दिवशी (२२-०४-२००६) महासंकटात सापडले होते. राहुलचे वडील हिंदुजामध्ये मृत्युशी झूंज देत होते, कपिल तर या वयातही नाही की पुढे त्याच्या वडिलांचे काय होईल, हे समजण्याएवढा.
प्रमोदच्या निधनानंतर महिनाभराच्या आत राहुल ड्रग्ज सेवनाच्या दुसर्या संकटात सापडला. पुढील दोन आठवडे प्रसारमाध्यमात त्याच्याविषयी नाही नाही ते लिहून आले. विवेकच्या मृत्यूविषयीही त्याला जबाबदार धरण्यात आले. नंतर त्याचा विवाह व दुर्दैवाचा अखंड प्रवास.
खरे तर मी राहुलला त्याच्या आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून पाहिले आहे. शैक्षणिक अपयश जर सोडले तर या मुलात आक्षेपार्ह असे काहीही नाही. त्याने कधी कुणाचा अपमान केला नाही, तर कुणाविषयीही अपशब्द कढले नाहीत. प्रमोदच्या चारित्र्यहीन वागणुकीचे विष त्याने न बोलता पचविले. पण त्यात त्याचे शैक्षणिक व मानसिक असे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझ्याविषयी त्याने कधीही अपशब्द काढले नाहीत कारण त्याला सत्य माहीत आहे. कपिल अचानक उद्भवलेल्या संकटाला सामोरे जाण्याच्या वयातही नाहीये. पण, बारावीला त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात जास्त मार्क्स मिळवून मला दिलासा दिलाय.
पूनमच्या स्वभावाविषयी काय बोलावे? वृषालीने पूनमचा स्वभाव घेऊ नये असेच मी म्हणेन.
No comments:
Post a Comment