Sunday, October 24, 2010

बायपास (लेखक - रविंद्र गुर्जर)

पावणेसहा वाजता मी हॊटेलवर पोचलो.  सहा लाख रुपयांच्या नोकरीवर ’उदक’ सोडून मी परतलो होतो.  मला माझा अभिमान वाटत होता.
मायाला कधी एकदा भेटेन आणि माझी ’गौरवगाथा’ ऐकवीन, असं मला झालं होतं.
’माया!’ मी हाक मारली.  आमच्या खोलीचं दार उघडंच होतं.  ते ढकलून मी आत गेलो.
’माया’, मी पुन्हा आवाज दिला. पण उत्तर आलं नाही.
मी आत सगळीकडे पाहिलं.  माझा उत्साह केव्हाच ओसरला होता.  उलट आता धीर खचू लागला.  ती मला सोडून निघून तर गेली नसेल? छे! शक्यच नाही!
भिंतीशी असलेल्या टेबलावर एक घडी केलेला कागद दिसला.  धडधडत्या अंत:करणानं मी तो उचलला.  माझ्यासाठी तिनं काय निरोप ठेवला होता?
’प्रिय शाम,
कितीही सहनशील बाई इतका वेळच वाट बघू शकते.  (दुपारचे ४-३० झाले आहेत, समजलं?) नंतर ती खरेदीसाठी बाहेर पडते.  ७ च्या आत नक्की परत येणार.

तुझीच,
माया.
असह्य उकाड्याच्या दिवसात थंड हवेची झुळूक यावी, तसं मला झालं.  मी एक सुटकेचा श्वास टाकला.  चिठ्ठी टेबलावर खाली टाकून मी फोनजवळ गेलो.  ऒपरेटरला माझ्या ऒफिसचा नंबर दिला.
शर्माचा आवाज उत्सुकतेनं ओतप्रोत भरला होता.
’मुलाखत कशी काय झाली, साहेब?’
’फारशी चांगली नाही,’ मी उत्तर दिलं.  ’शेटजींना मी त्यांच्या कंपनीत नोकर म्हणून हवा आहे.  आपली जाहिरात मोहीम राहिली बाजूला.’
’त्यांची ऒफर काय आहे?’
’वर्षाला सहा लाख रूपये.  त्यांना म्हणे मी आवडलो आहे.’
शर्माची शीळ फोनशिवायही मला ऐकू आली असती.
’मग तुम्ही सुरूवात कधी करणार?’
’कधीच नाही’, मी म्हणालो.  ’त्यांना तसं सांगूनही टाकलं.’
’काय म्हणता?’ तो जवळजवळ ओरडलाच.  ’डोकं ठिकाणावर असलेला कोणीही तसं करणार नाही.’
’असं कर’, मी म्हणालो, ’येरवड्यात मेंटल हॊस्पिटलमध्ये माझ्यासाठी बुकिंग करून ठेव; कारण माझा नकार ठाम आहे.’
’पण सर,’ त्यानं कुरकूर केली.  ’अशा संधीची तुम्ही कित्येक वर्षं वाट बघत होता.  शिवाय इथला धंदा मी सांभाळू शकतो.  अर्थातच, तुमच्यातर्फे गुपचुप.’
त्याच्या आवाजाला महत्त्वाकांक्षेची धार होती.  आम्ही एकदम भागीदार बनत होतो.  ही गोष्ट मला आवडण्यासारखी नव्हती.
’मी सांगितलं ना, मला इंटरेस्ट नाही! अजूनतरी मी बॊस आहे. नव्या जाहिरात मोहिमेबद्दल मला अद्याप आशा आहे,’ मी म्हणालो.
’विनोदभाईंच्या मनाविरुद्ध जाणार असाल तर ते अकाऊंट विसरा.’  त्याचा आवाज पडलेला होता.
’ते मी बघून घेतो,’ मी म्हणालो.
’ओके बॊस! तुम्ही केव्हा परत येणार? मी घरी फोन करून काही कळवू?’
’नको.  मी करीन.  उद्या ऒफिसवर मी हजर आहे,’ मी सांगितलं.
’ठीक आहे,’ तो म्हणाला आणि आम्ही फोन बंद केला.  त्याची निराशा झालेली होती.  पुढचा फोन मी घरी लावला.  आशा ताबडतोब फोनवर हजर झाली.

No comments:

Post a Comment