Saturday, March 12, 2016

मिरवणूक आणि लोकशाही

मिरवणूक हा खरं तर खाजगी असला तरी एक सार्वजनिक सोहळाच असतो आणि तो साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या थरातल्या माणसांची, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मदत लागते.  म्हणजे बँडवाले लागतात, वाजंत्री लागतात, घोडेवाला लागतो, रांगोळ्या काढणारे लागतात, सजावट करणारे लागतात, ट्रक टेम्पोवाले लागतात, टेम्पो सजवणारे फूलवाले लागतात, गुरुजी लागतात, पोलीस लागतात, कार्यकर्ते लागतात, नाचणारे लागतात, चालणारे लागतात,फटाके फोडणारे लागतात आणि मिरवणूक बघणारेही लागतात.

मिरवणुकीची आणखी एक गंमत असते.  मिरवणूक कुणी काढलीय, ती कोण चालवतोय, हे मिरवणूक पाहून कळत नाही.  ती पुढे कोणत्या वाटेनं जाणार, हे तर खूपदा मिरवणुकीतल्या लोकांनाही माहीत नसत;  पण कुणीतरी पडद्याआडच्या माणसानं ती आखणी आधीच केलेली असते.  त्यासाठी माणसं आणि साधनं विकत घेतलेली असतात.  आमंत्रणं-निमंत्रणं देऊन पोलीस, कार्यकर्ते, मित्रमंडळी बोलावलेली असतात, कामगार बोलावलेले असतात आणि मिरवणूक छान चाललेली असते.  पाहताना असं वाटतं, की ती स्वतःच चाललीय आनंदात तल्लीन होऊन - एकदिलानं, एकमतानं ठरवल्यासारखी, आपसूक, कुणीही न सांगता;  पण खरं तर तसं नसतं.  मिरवणूक - मग ती कसलीही असो - तिचा कर्ताकरविता कुणी वेगळाच असतो.  आपल्या लोकशाहीसारखीच असते ती एका अर्थानं.  सगळ्यांना वाटत असतं की ती आपणच चालवतोय किंवा चालतेय सगळ्यांच्या मतानं;  पण ती चालवणारे कुणी दुसरेच असतात, मोजके, पडद्यामागे. 

कथा:- झुंबर
लेखकः- किरण येले
हंस दिवाळी २०१५