Sunday, December 29, 2013

चेतन

खुर्चीतून उठलेली गीता परत खुर्चीत बसली.  खोलीवरून अजूनही तिची नजर फिरत होती.  एखाद्या तर्‍हेवाईक गर्भश्रीमंत तरुणाने लहरीप्रमाणे सजवलेली खोली - एवढंच त्या खोलीबद्दल म्हणता आलं असतं आणि मग तिचं लक्ष तिच्या समोरच एका खुर्चीत आरामात बसलेल्या चेतनकडे गेलं.  त्याने नुकतीच शिलगावलेली सिगारेट त्याच्या हातात होती आणि त्या धुरातून तो तिच्याकडे किंचित मिश्कील नजरेने पाहात होता.  तो श्रीमंत असेल, पण तर्‍हेवाईक? लहरी? मुळीच नाही !  पण वेगळा होता - तिच्या परिचयातल्या तरुणांहून किती वेगळा होता! आताचं त्याचं गुलहौशी रूप फसवं होतं.  त्याच्यातलं परिवर्तन तिने आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं होतं नाहीतर तिचा विश्वासच बसला नसता - रात्री त्या गुंडांच्या अड्ड्यात पोहोचताच चेतन त्याच्या खर्‍या स्वरूपात प्रकट झाला होता.  मेंढ्यांच्या कळपात शिरलेल्या चित्त्याने त्यांची दाणादाण उडवावी तसा त्याने त्या वाड्यात हाहाकार माजवला होता.  तिनं ऐकलेलं खरं असलं तर दोघांना त्याने समुद्रात बुडवून मारलं होतं, एकाला चाकूने, आणखी एकाला विजेच्या कुंपणावर फेकून, तर मुक्रानला चाबकाने फोडून आणि रसूलला गळफास लावून ठार मारलं होतं.  बालिश चेहर्‍याच्या, मध्यम शरीरयष्टीच्या या चेतनमध्ये ही धुमसती शक्ती आली होती? आताचाही त्याचा स्वस्थपणा फसवा होता - त्याच्या सान्निध्यात सर्व वस्तूंना, सर्व प्रसंगांना, सर्व शब्दांना एक नवा अर्थ येत होता, एक नवा उजाळा लाभत होता.  
"कसला एवढा गंभीर विचार?" चेतन हसत म्हणाला.
"मला तुमचं नवल वाटतं, चेतन-" गीता प्रांजळपणे म्हणाली.
"तू काही नवल करणारी पहिलीच नाहीस." तो अर्धवट थट्टेने म्हणाला.
"मी तुम्हाला एक विचारू?"
"अवश्य".
"तुम्ही अनेकांचा बळी घेतलात--"
"संरक्षणासाठी! नाहीतर त्यांनी माझा बळी घेतला असता!"
"मी समर्थन मागत नाही.  मला माहीत आहे ती सर्व माणसं कोणत्या लायकीची होती ते-- त्यांना केवळ मृत्यू हीच शिक्षा योग्य होती.  माझा प्रश्न वेगळाच आहे.  अनेकांना अशा गुन्हेगारांचा संताप येतो.  पण तुम्ही त्यांच्या पुढे जाता--कायदा गुंडाळून ठेवता-- हे कसं?"
"गीता, केवळ तूच विचारते आहेस म्हणून मी या प्रश्नाचे उत्तर देतो, कारण तू सर्व कसोट्यांना उतरली आहेस.  कधी काळी मी जर स्त्री साथीदार निवडली असती तर ती तुझ्यासारखीच असती तेव्हा तुला प्रश्न विचारण्याचा आणि त्याचे उत्तर मिळण्याचा हक्क आहे."
काही वेळ चेतन खिडकीबाहेर पाहात बसला.
"गीता, हे मी आजवर कुणापाशीही बोललो नाही.  माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी मला एक भयंकर अनुभव आला.  तो काय हे मी सांगत बसत नाही.  एवढं सांगतो की त्या अनुभवाने माझे डोळे उघडले.  तथाकथित कायदा व कायद्याचा न्याय किती अपुरा आहे हे मला समजलं.  हेही कळलं की असे अनेक गुन्हे आहेत की जे कायद्याच्या कक्षेत येतच नाहीत.  अन्याय ज्याच्यावर झालेला आहे अशा माणसाला दाद मागायची सुद्धा काही सोय नाही.  कदाचित सुधारलेल्या समाजाची ती एक खूण असेल-- पण सर्वच माणसे सुधारलेली नसतात.  काही माणसे समाजाच्या या सैल किंवा चूकीच्या नियंत्रणाचा गैरफायदा घेतात.  समाजातल्या पापभिरू, असहाय्य, सज्जन, दुबळ्या अशा घटकांवर आपली उपजीविका करतात."  लोकांनी कष्टाने पैसा पैसा जमवून उभी केलेली संपत्ती लुटतात.  अशा दुर्दैवी लोकांना वाली नाही.  समाज केवळ हळहळतो, प्रत्यक्ष काही करत नाही.  मलाही हा अनुभव आला.. ते संस्कारक्षम वय म्हणा, माझा स्वभाव म्हणा किंवा माझ्यावर झालेल्या अन्यायाचं खास राक्षसी रूप म्हणा-- कशाचा तरी परिणाम होऊन माझ्या मनाची घडण आमूलाग्र बदलली--"
"गुन्हेगारांविरुद्ध  नुसतं संतापून उपयोग नव्हता.  त्यांच्या मागे पैशांचं बळ होतं, समव्यवसायी लोकांची संघटना होती.  त्यांना धडा शिकवायचा तर मला मला त्यांच्यापेक्षा जास्त क्रूर, जास्त हिकमती, जास्त कुशल व्हायलं हवं होतं आणि माझ्या आयुष्याची अनेक वर्षे ही तांत्रिक कौशल्ये हस्तगत करण्यात घालवली आहेत-मीही साधा माणूसच आहे- पण सतत सरावाने आणि चिकाटीने मी अनेक तंत्रे हस्तगत केली आहेत पण जरा विचार केला तर समजेल की त्यात खरोखर अशक्य काय आहे?"
"पिस्तूल, रायफल, तलवार, जंबिया, चाकू, तीरकमठा ही शस्त्रे मी चांगली वापरतो.  सर्व गाड्या, सर्व दुचाकी-तिचाकीही वाहने, काही जातीची विमानं मी चालवू शकतो.  कुस्त्यांचे शास्त्रीय व अशास्त्रीय सर्व प्रकार मी जाणतो.  मी चांगले वेषांतर करतो, इतरांच्या आवाजाची सहीसही नक्कल मी करू शकतो, इतरांच्या हस्ताक्षराची नक्कल मी करू शकतो- माझे शरीर इतके काटक आहे, चपळ आहे.  पण या सर्वात दैवी किंवा अमानवी असं काय आहे? मी आयुष्याचा जो एक मार्ग निवडला त्यासाठी ही साधनं आवश्यक होती त्याखेरीज मी यशस्वी झालो नसतो."
"पूर्वी असा एक काळ होता की व्यक्तिगत अन्यायाला किंवा अपराधाला व्यक्तिगतच जवाब द्यावा लागे.  व्यक्तिच्या सुखाची, सुरक्षिततेची, सन्मानाची हमी द्यायला समाजच संघटित नव्हता.  माणसाला स्वत:पुरता कायदा करावा लागे आणि मनगटाच्या बळावर तो अंमलात आणावा लागे.  असं समज की माझ्यापुरता मी त्या युगात वावरतो.  या कल्पना इतरांना कदाचित कालबाह्य, जुनाट, बुरसटलेल्या, बेजबाबदार वाटतील.  पण मला नाही! माझ्या आयुष्याला काही अर्थ असला तर तोच आहे! माझ्या डोळ्यापुढे काही आदर्श असला, काही ध्येय असलं तर तेच आहे!"
आणि मग चेतन हसत एकदम उभा राहिला.
"केवढ मोठं व्याख्यान !" तो हसत म्हणाला, "तो बघ शंभू. जेवण तयार आहे  म्हणून सांगायला आला आहे- चल!" 
गीता सावकाश उठली.
चेतनचा गंभीरपणा मगाशीच गेला होता. जेवताना त्याची सारखी बडबड चालली होती.  त्या शभूवर, घोरपड्यांवर टीका होती.  इतरही अनेक असंबद्ध विधानं होती.  पण गीता आता जाणून होती की हे सर्व वरवरचं आहे- आत खोलवर, एक साहसाची ज्योत धगधगत आहे- आणि शेवटी तिने धीर धरून मनातला खरा प्रश्न विचारला.
"चेतन, परवाच्या अनुभवानंतर रोजचं आयुष्य किती नीरस वाटतं!"
चेतन एकदम स्तब्ध झाला होता.  
"चेतन, तुम्हाला राग आला?"
"नाही, गीता.  राग नाही आला."  चेतन गंभीर आवाजात म्हणाला, "मी मघाशीच सांगितले.  एखादी स्त्री साथीदार हवी असती तर मी तुझ्यासारखीच एखादी निवडली असती-- पण गीता, मी जो मार्ग स्वीकारला आहे तो सर्व परिणामांचा विचार करून मगच निवडला आहे.  सर्व परिणाम भोगायची तयारी ठेवूनच या वाटेवर पाऊल टाकलं आहे.  मृत्यू हा माझा कायमचा साथीदार आहे, तो माझ्यापासून हाकेच्या अंतरावर सतत वावरत असतो.  जीवनाच्या क्षणाक्षणात जी धुंदी येते ती मृत्यूच्या सान्निध्यानेच येते.  एक पाऊल चुकलं, एक अंदाज खोटा ठरला, कटप्रतिकटातील एक चाल जरी वाकडी पडली तरी सर्व खेळ खलास !  मृत्यूला क्षणाक्षणाला हुलकावणी देऊन, त्याच्या जबड्यातून खेचून आणलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण जणू सुवर्णाचा बनून येतो- पण हे सर्व माझ्यापुरतंच मर्यादित आहे- इतर कोणाला असा धोका पत्करायला सांगायचा मला कोणता हक्क आहे?"
"आणि इतर कोणी स्वखुशीने तयार झालं तर?"
चेतन बराच वेळ तिच्याकडे पाहात राहिला, आणि मग हसत म्हणाला,
"पाहू! पाहू! तशी वेळ आली तर तुलाही ती साद येईल!"
"चेतन, हे वचन समजू का?"
"हो! तशी वेळ आली तर तेही होईल!"
आणि मग गीतासाठी ते साधं जेवण राहिलं नाही.
त्याच्या सहवासात गीता सर्व काही विसरली होती.  चारचे ठोके कानावर येताच तिचं रोजचं सर्व आयुष्य चारी बाजुंनी तिच्याभोवती जमा झालं  चेतनचा निरोप घेण्यासाठी ती उठली.  तिचा हात चेतनने हाती घेतला, काही क्षण तसाच ठेवला, आणि मग किंचित दाबून सोडला.
"पुन्हा भेट होईपर्यंत नमस्कार, गीता!" तो म्हणाला.
"पुन्हा भेट होईपर्यंत!" गीता हसत म्हणाली व बाहेर पडली


चेतन (लेखक -  नारायण धारप)
पृष्ठे - १६८ 
मूल्य रूपये १६०/-
समन्वय प्रकाशन / अजब डिस्ट्रिब्युटर्स, कोल्हापूर



  

Sunday, December 15, 2013

कधीकाळी भारतात कचरा वाहतूक करायच्या रोल्स रॉयस

आजकाल प्रतिष्ठेचे चिह्न म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोल्स रॉयस कार कधीकाळी भारतात कचरा वाहण्यासाठी वापरल्या जात होत्या.  रोल्स रॉयस अन् कचरागाडी... वाचून विश्वास बसला नसला तरी हे खरे आहे.  भारतातील अलवर संस्थानचे राजे महाराजा जयसिंह हे ब्रिटनला गेले होते त्यावेळी त्यांचे लक्ष लंडनमधील बॉण्ड रस्त्यावरील रोल्स रॉयस कारच्या भव्य शोरूमकडे गेले.  त्यांनी तिथे जाऊन या कारबाबत चौकशी केली.  मात्र समोर भारतीय असल्याचे पाहून तिथल्या मॅनेजरने त्यांना गेट आऊट म्हणून अपमानित केले.  अपमानित झालेले महाराजा जयसिंह आपल्या हॉटेलमध्ये परत आले.  तिथून त्यांनी रोल्स रॉयसच्या त्या शोरूमवर फोन करून अल्वरचे महाराज काही कार खरेदी करण्यास येणार असल्याचे सांगितले.  थोड्या वेळाने महाराज खास राजेशाही पोशाखात सर्व लवाजम्यासह त्या शोरूममध्ये दाखल झाले.  यावेळी त्यांचे रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आले.  तेव्हा तोच मॅनेजर आपल्या स्टाफसह महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे अभिवादन करीत होता.  महाराजांनी तेव्हा शोरूममधील सर्व कार खरेदी करून त्यांची किंमत व भारतापर्यंतच्या वाहतूकीचा खर्च दिला.  भारतात आल्यावर महाराजांनी या सहाच्या सहा कार अल्वर नगरपालिकेला भेटरूपात दिल्या आणि त्यांचा रोजचा कचरा उचलण्यासाठी वापर केला जावा, असा आदेश दिला.  जगातील अव्वल समजल्या जाणार्‍या सुपरक्लास रोल्स रॉयसचा कचर्‍याच्या वाहतूकीसाठी वापर केला जात असल्याची माहिती वणव्यासारखी जगभर पसरली.  त्या काळी ब्रिटन, अमेरिकेतली एखादी व्यक्ती माझ्याकडे रोल्स रॉयस कार असल्याचे अभिमानाने सांगू लागला, तर समोरचा लगेच बोलत असे की, तीच ना जी भारतात कचरा वाहतुकीसाठी वापरली जाते.  या बदनामीमुळे रोल्स रॉयस कारची विक्री जगभर प्रचंड मंदावली होती.  त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला.  अखेर रोल्स रॉयस कंपनीने तत्काळ महाराज जयसिंह यांना तार पाठवून लेखी माफी मागितली.  कंपनीला धडा मिळाल्याची खात्री पटली तेव्हा महाराजांनी या कारचा कचरा वाहतुकीसाठी वापर थांबविला.

विश्वभ्रमण सदर / दैनिक पुण्यनगरी / दिनांक ११.१२.२०१३

Monday, December 2, 2013

पुढील पिढी आधीच्या पिढीची ’झेरॉक्स कॉपी’?

पुढील पिढी मागच्या पिढीची ’झेरॉक्स कॉपी’?

एक वयस्कर मनुष्य आपल्या छोट्याशा मुलाला बोटाला धरून एका वरातीचा सोहळा बघायला जातो.  वरातीत नवरदेव घोड्यावर बसलेला असतो.   घोडा नाचत असतो.  परंतु लोकांच्या गर्दीमुळे त्या मुलाला घोड्याचा नाच नीट दिसत नाही.  त्याची अडचण दूर करण्यासाठी वडील त्याला उचलून खांद्यावर घेतात.  आता त्या मुलाला घोड्याचा नाच चांगला दिसू लागला.  घोड्याच्या शेपटीचा गोंडा तुम्हाला दिसतोय का, असे त्याने वडिलांना विचारले.  पण तो गोंडा त्यांना काही दिसत नव्हता.  छोट्याशा मुलाला दिसणारा गोंडा त्याच्यापेक्षा कितीतरी उंच असलेल्या त्याच्या वडिलांना मात्र दिसत नाही, ही घटना आपल्याला एक नवी दृष्टी देऊन जाते.

आपल्या वडिलांना जो गोंडा दिसत नाही, तो आपल्याला दिसला म्हणून मुलाने घमेंड बाळगू नये आणि मला न दिसणारा गोंडा या खुंट्याएवढ्या कार्ट्याला कसा दिसेल, म्हणून वडिलांनीही त्याची कानउघाडणी करू नये.  खरे म्हणजे वडिलांची प्रत्यक्ष उंची ही मुलाच्या प्रत्यक्ष उंची पेक्षा जास्त आहे.  पण त्या बरोबरच वडिलांची ही उंची आयती मिळाल्यामुळे मुलाच्या डोळ्यांची पातळी वडिलांच्या डोळ्याच्या पातळीपेक्षा वरची झाली आहे.  त्यामूळे त्याला वडिलांपेक्षा अधिक दूरचे दिसणे स्वाभाविक आहे.  ही घटना खरे म्हणजे दोघांच्याही आनंदाची आहे.  आपल्या मुलाला आपल्यापेक्षा दूरचे दिसावे, त्याला आपल्यापेक्षा अधिक कळावे, अशीच आईवडिलांची इच्छा असायला हवी.  आपल्या मुलांचे आचारविचार तंतोतंत आपल्या सारखेच असावेत, अशी अपेक्षा करणे, म्हणजे पुढची पिढी ही आधीच्या पिढीची ’झेरॉक्स कॉपी’ असावी असे म्हणण्यासारखे आहे.  तसे झाल्यास मानवी समाजाची प्रगती होणारच नाही.  त्यांच्या त्रुटी, उणिवा दूर होणारच नाहीत. समाजजीवनाचे एक डबके तयार होईल.  खळाळता प्रवाह बनणार नाही.  म्हणूनच पुढच्या पिढीला नवनव्या आचारविचारांची ताजी टवटवीत पालवी फुटल्याचे दिसले, तर तिचे स्वागत करण्याची तयारी जुन्या पिढीने दाखवावी.  पण त्या पालवीतील एखादे पान किडलेले असले, तर सगळी पालवी खुडून टाकण्याचा अविचार न करता ते किडलेले पान अलगद काढून टाकावे - इतर कोवळ्या पानांना इजा होणार नाही इतक्या हळूवारपणाने!  आईवडिलांनी मुलांच्या बाबतीत जशी उदार भूमिका घेतली पाहिजे, तशीच शिक्षकांनी, गुरूजनांनीदेखील आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ’पुरो’गामी, ’भविष्यगामी’ दृष्टी ठेवली पाहिजे.  आपल्या विद्यार्थ्याला आपल्यापेक्षा जास्त कळू लागणे, हा त्यांनी आपल्या ’गुरूत्वा’चा विजय मानला पाहिजे.  ’शिष्याद् इच्छेत् पराजयम् - शिष्याकडून पराभवाची इच्छा बाळगावी’ हे सुभाषित त्या दृष्टीने आशयघन आहे.  ज्ञानाची ही प्रक्रियाच आपल्याला खर्‍या अर्थाने फुलवते.

मन निरभ्र : डॉ. आ. ह. साळुंखे, ’लोकायत’, १३ यशवंतनगर, गेंडा माळ, सातारा - ४१५ ००२.
प्रवाह पुरवणी पुण्यनगरी रविवार दि. ०१ डिसेंबर २०१३

पुण्यनगरी रविवार अंकाच्या प्रवाह पुरवणीतील इतर वाचनीय सदरे

  1. आरसा - अमर हबीब (भ्रमणध्वनी) ९४२२९३१९८६
  2. सत्य असत्याशी - सुनील यावलीकर  (भ्रमणध्वनी) ९४०४६८९५१७
  3. कोठे तरी चुकतंय - ऍड. अपर्णा रामतीर्थकर  (भ्रमणध्वनी) ९३७०४०४९९३
  4. उद्योग विश्व - वेणुगोपाल धूत
पुण्यनगरी रविवार मुख्य अंकातील वाचनीय सदरे


  1. पडद्यामागील वस्त्रहरण - गंगाराम गवाणकर
  2. हृदयीच्या गोष्टी - डॉ. विजया वाड
  3. फेरफटका - सोमनाथ पाटील
पुण्यनगरी रोजच्या अंकातील वाचनीय सदरे
  1. ओळख - सोमनाथ पाटील
  2. अंतिम पानावरील आंतरराष्ट्रीय बातम्या