गैरसमज
शार्दूलसिंह जपानी सैन्याबरोबर ब्रह्मदेशात भटकत असता ब्रिटिश सैन्याची एक तुकडी समोर आली. रात्रीच्या वेळी मगरांचे भय न बाळगता शार्दुलसिंह नदी ओलांडून परत ब्रिटिश फौजेत दाखल झाला. त्याने आपल्याला कैद करणार्या तुकडीची संपूर्ण माहिती देताच इंग्रज फौजेने रात्रीच्याच वेळी जपानी तुकडीवर हल्ला करून जय मिळविला. शार्दूलसिंहाच्या ह्या धाडशी कृत्याबद्दल त्याला बढती मिळून ’कर्नल’ हुद्दा बहाल करण्यात आला. युद्ध संपल्यावर तो हिंदुस्थानात परत आला. बलवंतसिंहाला दिलेल्या वचनाची त्याला आठवण होती; परंतु त्याचा पत्ता शोध करूनही त्याला मिळाला नाही.
माईजी अंधार पडल्यावर धान्य आणण्यासाठी वाण्याच्या दुकानात गेल्या. तेथेही त्यांची बाकी थकलेली होती. त्यामुळे त्यांस काहीच मिळाले नाही. दुबळ्या मुलाला खायला काय घालू याची त्यांना चिंता पडली. रात्री जेमतेम मूठभर कणकीची रोटी भाजून त्यांनी मुलाला दिली आणि आपल्याला बुधवारचा उपवास आहे अशी थाप मारून थंडा फराळ करून त्या खाटेवर पडल्या. उपाशी पोटी झोप कशी येणार?
’बेटा, शार्दूलभाई तुझा दोस्त आहे असं तू म्हणत होतास. तो मेजर की कर्नल झालेला आहे असं मी ऐकलं. त्याच्याकडून का नाही तू मदत मिळवीत? तो कुठे आहे त्याचा पत्ता काढ अन् त्याला जाऊन भेट.’ माईजींनी उपदेश केला.
’माईजी, सारख्या दर्जाच्या माणसांतच दोस्ती राहू शकते. त्याला जर आणाशपथांची आठवण राहिली असती तर एव्हाना त्यानं माझा पत्ता काढला नसता का?’ बलवंतसिंह म्हणाला.
’तो तुझा शोध करीतही असेल. तू इथे ह्या भिकारी गावात कंगाल बिर्हाडात राहतो आहेस. तुझा पत्ता शोध करणाराला तरी कसा लागेल? तूच त्याचा शोध काढ. सुदामा कृष्णाजीचा शोध करीत द्वारकेला गेला होता; कृष्णाजी नाही आले आपल्या दरिद्री भक्त्ताचा पत्ता काढीत!’
दुसर्या दिवशी बलवंतसिंहाला त्याचा एक नातेवाईक येऊन भेटला. त्याच्या हातात एक वर्तमानपत्राचा ताजा अंक होता. त्यात खालील बातमी होती.
’रविवारी सायंकाळी ठीक सहा वाजता कर्नल शार्दूलसिंह यांच्या हस्ते पोलिस फुटबॊल टीमला बक्षिसे वाटण्याचा समारंभ पोलिस ग्राउंडवर होणार आहे.’
बातमी वाचताच आनंदाने तो उद्गारला, ’माईजी, शार्दूलसिंहाचा पत्ता लागला! रविवारी लाहोरास पोलिस ग्राउंडवर त्याच्या हातून बक्षीस समारंभ व्हायचा आहे. ठीक ठीक, मी तिथेच जाऊन त्यांना भेटतो.’
रविवारी बक्षीस समारंभाच्या जागी शार्दूलसिंह खुर्चीवर येऊन बसला होता. समारंभास पंधरा मिनिटे अवकाश होता. बलवंतसिंहाला त्याच्या नातेवाईकांनी धरून पोलिस ग्राउंडवर नेले होते. शार्दूलसिंहाला पाहताच त्याला प्रेमाचे भरते आले. धडका हात पुढे करून तसाच लंगडत तो शार्दूलसिंहापुढे जाऊन उभा राहिला. आपला हात तो घट्ट धरून तो प्रेमाने हालवील असे बलवंतसिंहास वाटले होते; परंतु हस्तांदोलन करण्याचे राहोच, त्याने बलवंतसिंहाकडून दुसरीकडे तोंड वळविले आणि शेजार्याशी काही बोलणे केले. पुन्हा एकदा बलवंतसिंहाकडे त्याने तोंड केले, पण ओळखही दिली नाही. हे पाहताच बलवंतसिंह माघारी फिरला. त्याच्या हृदयावर मोठाच आघात झाला. त्याच रात्री हातातील क्रुपाणानें त्याने स्वत:चा प्राणनाश करून घेतला!
बक्षीस समारंभाला प्रारंभ करताना पोलिस कमिशनर म्हणाले, ’मित्र हो, कर्नल सरदार शार्दूलसिंह ह्यांच्यासारख्या बहाद्दरांच्या हातून बक्षीस घेताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. कर्नलसाहेब जपानात लढत असताना ऎटम बॊम्बच्या हल्ल्यापासून जवळच पराक्रम गाजवीत होते. आपल्या सहजी लक्षात येणार नाही पण ऎटम बॊम्बच्या परिणामानं त्यांचे दोन्ही डोळे पूर्ण आंधळे झालेले आहेत आणि आंधळे झाल्यावरदेखील त्यांनी आपल्या सेनेला बहुमोल दिग्दर्शन केलेलं होतं. सर्वांच्या वतीनं मी त्यांना बक्षिसं देण्याची विनंती करतो.’