एका अरण्यात एका ऋषींचा आश्रम होता. आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर व रम्य होता. ऋषींबरोबर त्यांचे बरेच शिष्यही आश्रमात राहत होते. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सर्व जण आश्रमाची स्वच्छता, गोशाळेत गायींना चारा घालणे, दूध काढणे, नदीवरून पाणी आणणे इत्यादी कामे करीत असत. आपल्या गुरूंवर त्यांची नितांत भक्ती होती. गुरूजी रोज सकाळी आपल्या शिष्यांना शिकवीत असत. श्लोकांचे पाठांतर करून घेत. नंतर प्रवचन देत. दररोज एक मांजर येऊन प्रवचन चालू असताना तिथे लुडबूड करीत असे. शिष्यांचे लक्ष सारखे त्या मांजराकडे जाई. तेव्हा गुरूजींनी एका शिष्याला असे सांगितले की, प्रवचनाच्या वेळी या मांजराला बांधून ठेवत जा.
आता दिवसभर मोकळे असणारे मांजर प्रवचनाच्या वेळी बांधून ठेवण्यात येऊ लागले. पुढे गुरूजींचा स्वर्गवास झाला, तरी प्रवचनाच्या वेळी मांजराला बांधून ठेवणे चालूच राहिले.
काही दिवसांनी ते मांजर मेले. तेव्हा शिष्यांनी दुसरे मांजर आणून प्रवचनाच्या वेळी बांधून ठेवायला सुरूवात केली. पुढे शेकडो वर्षांनी पुजा-प्रवचनाच्या वेळी मांजराला बांधून ठेवण्याचे महत्त्व व त्याबद्दलचा गूढार्थ या विषयी महान शिष्यांनी विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले.
तात्पर्य: धार्मिक कार्यात कर्मकांड शिरते, तेव्हा मूळ हेतूचा विसर पडलेला असतो.
अंजली नानल
बोधकथा / दैनिक सकाळ
सोमवार दिनांक १९ नोव्हेंबर २०००
No comments:
Post a Comment