Wednesday, July 23, 2014

लॉज ३४१ वर

"सध्यातरी शिल्लक रक्कम बर्‍यापैकी आहे." ट्रेझरनं पुढ्यात असलेल्या बॅंकबुकावर नजर टाकून माहिती दिली.  "अलीकडे फर्म्स बर्‍यापैकी उदार झाल्या आहेत.  मॅक्स लिंडर ऍंड कंपनीनेच पाचशे दिले आहेत.  वॉकर ब्रदर्सने शंभर पाठवले होते पण मी ते परत केले आणि पाचशे मागितले आहेत.  बुधवारपर्यंत मला त्यांच्याकडून काही समजलं नाही तर त्यांचे बाईंडिंग गिअर्स कामातून जातील.  गेल्या वर्षी आपल्याला त्यांचे ब्रेकर जाळावे लागले तेव्हा ते सुतासारखे सरळ आले.  वेस्ट सेक्शन कंपनीने आपली वार्षिक वर्गणी पाठवली आहे.  सध्या तरी आपल्या सार्‍या गरजा भागवता येतील एवढा पुरेसा पैसा शिल्लक आहे."
"आर्ची स्विंडनचं काय झालं?" एका ब्रदरनं प्रश्न केला.
"त्यानं आपली सारी मालमत्ता विकली आणि जिल्हा सोडून गेला.  जाता जाता थेरडा चिठ्ठी ठेवून गेला की इथे ब्लॅकमेलर्सच्या गराड्यात मोठा खाणमालक म्हणून मिरवण्यापेक्षा आपण न्यूयॉर्कमध्ये राहून तिथे रस्ते साफ करण्याचं काम मोठ्या खुशीनं करू.  तो चिठ्ठी आपल्या हाती पडण्यापूर्वीच इथून पसार झाला हे त्याच्या दृष्टीनं बरं झालं नाहीतर...? मला वाटतं पुन्हा तो या भागात तोंड दाखवण्याची हिंमत करणार नाही."
एवढ्यात टेबलाच्या दुसर्‍या टोकाजवळ असलेला एक प्रौढ इसम चेअरमनकडे तोंड करून उभा राहिला.  त्यानं आपली गुळगुळीत दाढी केली होती आणि चेहर्‍यावरून शांत व समंजस वाटत होता.
"मि. ट्रेझरर," तो म्हणाला, "मी एक प्रश्न विचारू का? आपण या जिल्ह्यातून हाकलून लावलेल्या त्या इसमाची मालमत्ता कुणी खरेदी केली?"
"होय, ब्रदर मॉरीस, ती मालमत्ता स्टेट ऍंड मर्टन कौंटी रेलरोड कंपनीनं विकत घेतली."
"याच पद्धतीनं गेल्या वर्षी टॉडमन आणि ली यांची मालमत्ता बाजारात आली होती, ती कुणी घेतली?"
"त्याच कंपनीनं घेतली ब्रदर मॉरीस!"
"त्याचप्रमाणे मॅन्सन, शूमन व्हॅन देहरे आणि ऍटवुड यांचे लोखंडाचे कारखाने विक्रीला निघाले होते ते कुणी घेतले?" 
"ते सारे वेस्ट गिल्मर्टन जनरल मायनिंग कंपनीनं घेतले."
"तुम्ही हे सारं कशासाठी विचारता हे मला कळत नाही ब्रदर मॉरीस."  चेअरमन म्हणाला.  "ते कुणी विकत घेतले याच्याशी आपल्याला काय देणंघेणं आहे.  ते कुणीही हा उद्योग जिल्ह्याबाहेर तर घेऊन जाणार नाहीत?" 
"माफ करा चेअरमन, पण मला वाटतं आपल्या दृष्टीने या घटनांशी अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा संबंध आहे.  गेली दहा वर्षे ही परंपरा चालू आहे.  आपण छोट्या-छोट्या व्यावसायिकांना इथून हाकलून लावत आहोत.  त्याचा परिणाम काय होतो?  त्याची जागा रेलरोड किंवा जनरल आयर्नसारख्या बड्या कंपन्या घेतात.  त्यांचे संचालक न्यूयॉर्क किंवा फिलाडेल्फियाला राहतात.  ते आपल्या धमक्यांना जराही भीक घालत नाहीत.  आपण फार तर त्यांच्या स्थानिक प्रमुख अधिकार्‍यांना हाकलवू शकतो पण त्यामुळे काय होतं?  त्यांच्या जागी दुसरे नवे अधिकारी येतात.  अशा तर्‍हेनं आपण आपल्यालाच मोठा धोका निर्माण करून घेत आहोत.  छोट्या माणसांकडून आपल्याला कसलाच धोका नसतो. त्यांच्याजवळ पैसा नसतो की ताकद नसते.  आपण त्यांचा पिळून अगदी चोथा करीत नाही तोपर्यंत ते इथेच राहणार आणि आपल्या धाकात राहणार.  मात्र आपण या मोठ्या कंपन्यांच्या दृष्टीनं त्यांच्या नफा मिळवण्याच्या मार्गातले अडथळेच ठरू.  ते पैसा खर्च करायला मागेपुढे बघणार नाहीत की चिकाटी सोडणार नाहीत.  ते आपल्या मागे कायद्याचं शुक्लकाष्ठ लावतील आणि आपल्याला कोर्टात खेचतील."
त्याचं ते अभद्र बोलणं ऐकून सर्वत्र एकदम स्मशानशांतता पसरली.  सर्वांचे चेहरे काळवंडले.  आपापसात सूचक नजरानजर झाली.  हे विचार इतके स्पष्ट होते, इतके ताकदवान होते की त्यांना आव्हान देणं शक्यच नव्हतं.  त्यांच्या मनात आपल्या गैरकृत्यांबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा विचार यापूर्वी कधीही आला नव्हता.  आता मात्र भीतीची थंडगार लाट सर्वांच्याच देहातून शिरशिरी आणून गेली.
"माझी एक सूचना आहे." तो ब्रदर पुढे बोलू लागला. "आपण त्या छोट्या उद्योजकांवरचं ओझं थोडं कमी करूया!  ते सारेच्या सारे या विभागातून बाहेर पळतील त्या दिवशी आपल्या संघटनेची ताकद पार धुळीला मिळालेली असेल."  
उघडपणे एवढं परखड सत्य ऐकवणं कुणालाच आवडत नाही.  सर्वांच्या संतापानं भरलेल्या नजरा झेलतच तो वक्ता परत आपल्या जागेवर बसला.  मॅकगिंटी त्याला उत्तर देण्यासाठी उभा राहिला तेव्हा त्याच्या कपाळावरही आठ्या दिसत होत्या.
"ब्रदर मॉरीस," त्यानं सुरूवात केली, "सतत रडत राहण्याची तुला सवयच आहे.  लॉजचे सर्व सभासद एकजुटीनं ठामपणे उभे आहेत तोपर्यंत संपूर्ण अमेरिकेत त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत होणार नाही.  आतापर्यंता आपल्याला अनेक वेळा कोर्टात खेचण्यात आलं नाही का?  मला वाटतं या मोठ्या कंपन्याही छोट्या कंपन्यांप्रमाणे आपल्याविरुद्ध लढा देण्याऐवजी पैसा खर्च करणंच जास्त पसंत करतील, आणि बंधूंनो आता" -बोलता-बोलता मॅकगिंटीनं आपल्या डोक्यावरची मखमली काळी टोपी आणि गळ्याभोवती गुंडाळलेला पट्टा काढून टाकला- "लॉजसमोर आज संध्याकाळि चर्चेसाठी असणारे विषय संपले आहेत.  आता फक्त एक गोष्ट बाकी आहे त्यावर आपण जाताजाता विचार करुया!  आता थोडंसं खाणं-पिणं आणि मजा करणं!" 

 माणसांचे स्वभावसुद्धा किती विचित्र असतात.  खूनखराबा या मंडळींच्या रक्तातच भिनलेला.  एखाद्या परिवारातल्या कर्त्या पुरूषाला पोहोचवणं, त्यांची रडणारी पत्नी, असहाय्य मुलंबाळं यांची जराही पर्वा न करता अथवा दयामाया न दाखवता आपली पाशवी कृत्यं पार पाडणं यांच्या हातचा मळ.  तरीही एखादं शोकगीत ऐकून मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी येत होतं.  मॅकमर्डोचा आवाज चांगलाच भारदार आणि तितकाच गोड होता.  यापूर्वी त्याला लॉजच्या सर्व सभासदांची मनं जिंकता आली नसली तरी यावेळी मात्र तो कमी पडला नाही.  पहिल्या रात्रीच त्यानं आपल्या सर्व भाऊबंदांची मनं जिंकली आणि आपल्या संघटनेत पुढे जाण्याच्या दृष्टीनं चांगलीच प्रगती केली.  चांगला सहकारी आणि उत्तम फ्रीमन होण्याच्या दृष्टीनं अनेक पात्रता अंगी असाव्या लागतात.  आपल्याजवळ त्या आहेत हे त्यानं त्या संध्याकाळी सिद्ध करून दाखवलं.  व्हिस्कीच्या बाटल्या या हातातून त्या हातात अशा पुढे सरकत होत्या.  सारे सभासद हास्यविनोदात गर्क झाले होते.  याच धामधूमीत बॉडीमास्टर पुन्हा एकदा बोलण्यासाठी उठून उभा राहिला.
"मित्रांनो," तो म्हणाला, "या गावातला एक इसम विनाकारण हात धुऊन आपल्या मागे लागला आहे.  त्याबद्दल त्याला कसा धडा शिकवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे.  मी 'हेरॉल्ड'च्या जोस स्टॅंगरबद्दल बोलतो आहे.  तो पुन्हा पुन्हा आपल्याविरोधी गरळ कसं ओकतो आहे हे तुम्हाला माहीत आहे ना?"
सर्वांकडून त्याच्या विधानाला पुष्टी देणारी कुजबूज झाली.  काहींच्या तोंडून इरसाल शिव्याही ऐकू आल्या.  मॅकगिंटीनं आपल्या जाकिटाच्या खिशातून एक घडी केलेला वर्तमानपत्राचा तुकडा बाहेर काढला आणि तो उलगडून वाचू लागला.
"कायदा आणि सुव्यवस्था!" तो म्हणतो, "कोळसा आणि लोहखनिजानं समृद्ध परिसरातील दहशतवादाचं साम्राज्य.  पहिला खून होऊन आमच्या भागात गुन्हेगारी संघटनेचं अस्तित्त्व सिद्ध झाल्याला आता एक तप उलटून गेलं.  तेव्हापासून सुरू झालेलं खूनखराब्याचं दुष्टचक्र कधी थांबलंच नाही.  या गोष्टी आता एवढ्या थराला गेल्या आहेत की आमच्या सभ्य सुसंस्कृत जीवनाला तो एक कलंक ठरला आहे.  युरोपातील जुलूम जबरदस्तीला कंटाळून जे लोक आमच्या देशाच्या आश्रयाला येतात त्यांचं स्वागत आमचा देश याच पद्धतीनं करणार का?  ज्यांचा मोठ्या विश्वासानं आसरा घ्यावा त्यांच्याच अत्याचारांना त्यांनी बळी पडावं कां?  स्वातंत्र्याची ग्वाही देणार्‍या आमच्या तारांकित ध्वजाखाली कायदा पायदळी तुडवून दहशत माजवणारं राज्य अशी आमची प्रतिमा त्यांच्यासमोर उभी राहावी का?  पूर्वेकडे माजलेल्या त्या अनागोंदी पुढे आमचे राज्यकर्ते पार हतबल झाले आहेत असं समजायचं का? सारे गुन्हेगार परिचयाचे आहेत.  त्यांची संघटना कोणती हे सर्वांना माहीत आहे.  हे सारं आम्ही किती दिवस सहन करणार आहोत की आम्ही कायमचं...  मला वाटतं या गटारगंगेतला पुरेसा नमुना मी तुमच्यासमोर ठेवला आहे."  चेअरमन हातातला कागद टेबलावर आपटत म्हणाला.  "आपल्याबद्दल हा इसम हे असं बोलतो.  माझा तुम्हाला प्रश्न आहे की आपण त्याचं काय करायचं?"
"त्याला ठार मारा!" डझनभर ब्रदर्स एकदम ओरडले.
"माझा याला विरोध आहे!"  गुळगुळीत दाढी केलेला मघाचाच मॉरीस म्हणाला.  "माझं ऐका बंधुंनो, या परिसरात आपली दहशत प्रचंड प्रमाणात वाढली आहे पण एक क्षण असा येईल की प्रत्येक सर्वसाधारण माणूस स्वत:च्या बचावासाठी एकत्र येईल आणि आपलं अस्तित्त्व संपवून टाकेल.  जेम्स स्टॅंगर एक वयस्कर माणूस आहे.  त्याला या गावात आणि परिसरात मान आहे.  त्याचं वृत्तपत्र सर्वसामान्यांचं वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध आहे.  अशा माणसाला मारलं तर सार्‍या राज्यात खळबळ माजेल आणि त्याचा विनाश हा अखेरीस आपला विनाश ठरेल."
"आणि ते आपला विनाश कसा घडवून आणतील ते तरी सांग पळपूट्या!"  मॅकगिर्टी ओरडला.  "पोलिसांकडून? त्यांच्यापैकी अर्ध्यांना आपण पोसतो आणि राहिलेले अर्धे आपलं नाव ऐकून चळाचळा कापतात.  कायद्याचा वापर करून न्यायाधीशाद्वारा शिक्षा ठोठावणार?  या मार्गाला आपण पूर्वी तोंड दिलं नाही?  त्यातून अखेर काय निष्पन्न झालं?"
"पण यावेळी कदाचित जज लिंच हे प्रकरण हाताळेल!"*  ब्रदर मॉरीसनं इशारा दिला.
त्याच्या या इशार्‍याविरुद्ध सभासदांमध्ये संतापाची लाटच उसळली.
"मी बोट उचलण्याचा अवकाश,"  मॅकगिंटी कडाडला.  "दोनशे माणसं गावात घुसतील आणि सारं होत्याचं नव्हतं करतील."  अचानक त्याचा आवाज आणखीनच चढला.  भुवया वर चढल्या.  "हे बघ ब्रदर मॉरीस, गेले कित्येक दिवस मी तुझ्यावर नजर ठेवून आहे.  तुझ्यात जराशीही हिंमत नाही आणि तू इतरांचंही खच्चीकरण करतो आहेस ब्रदर मॉरीस!  कदाचित एक वेळ अशी येईल की या कार्यक्रमपत्रिकेवर तुझंच नाव असेल.  तुला त्याची पूर्वकल्पना असावी म्हणून हे आधीच सांगतो आहे."

*हे वाक्य द्वयर्थी आहे.  एक म्हणजे लिंच नावाचा न्यायाधीश हे प्रकरण हाताळणार किंवा सर्वसामान्य जनता कायदा हातात घेऊन संघटनेचा बीमोड करेल.


व्हॅली ऑफ फिअर
सर ऑर्थर कॉनन डायल
अनुवाद विवेक जोशी
समन्वय प्रकाशन, कोल्हापूर
मूल्य: रूपये दोनशे फक्त

No comments:

Post a Comment