आजकाल प्रतिष्ठेचे चिह्न म्हणून ओळखल्या जाणार्या रोल्स रॉयस कार कधीकाळी भारतात कचरा वाहण्यासाठी वापरल्या जात होत्या. रोल्स रॉयस अन् कचरागाडी... वाचून विश्वास बसला नसला तरी हे खरे आहे. भारतातील अलवर संस्थानचे राजे महाराजा जयसिंह हे ब्रिटनला गेले होते त्यावेळी त्यांचे लक्ष लंडनमधील बॉण्ड रस्त्यावरील रोल्स रॉयस कारच्या भव्य शोरूमकडे गेले. त्यांनी तिथे जाऊन या कारबाबत चौकशी केली. मात्र समोर भारतीय असल्याचे पाहून तिथल्या मॅनेजरने त्यांना गेट आऊट म्हणून अपमानित केले. अपमानित झालेले महाराजा जयसिंह आपल्या हॉटेलमध्ये परत आले. तिथून त्यांनी रोल्स रॉयसच्या त्या शोरूमवर फोन करून अल्वरचे महाराज काही कार खरेदी करण्यास येणार असल्याचे सांगितले. थोड्या वेळाने महाराज खास राजेशाही पोशाखात सर्व लवाजम्यासह त्या शोरूममध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आले. तेव्हा तोच मॅनेजर आपल्या स्टाफसह महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे अभिवादन करीत होता. महाराजांनी तेव्हा शोरूममधील सर्व कार खरेदी करून त्यांची किंमत व भारतापर्यंतच्या वाहतूकीचा खर्च दिला. भारतात आल्यावर महाराजांनी या सहाच्या सहा कार अल्वर नगरपालिकेला भेटरूपात दिल्या आणि त्यांचा रोजचा कचरा उचलण्यासाठी वापर केला जावा, असा आदेश दिला. जगातील अव्वल समजल्या जाणार्या सुपरक्लास रोल्स रॉयसचा कचर्याच्या वाहतूकीसाठी वापर केला जात असल्याची माहिती वणव्यासारखी जगभर पसरली. त्या काळी ब्रिटन, अमेरिकेतली एखादी व्यक्ती माझ्याकडे रोल्स रॉयस कार असल्याचे अभिमानाने सांगू लागला, तर समोरचा लगेच बोलत असे की, तीच ना जी भारतात कचरा वाहतुकीसाठी वापरली जाते. या बदनामीमुळे रोल्स रॉयस कारची विक्री जगभर प्रचंड मंदावली होती. त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला. अखेर रोल्स रॉयस कंपनीने तत्काळ महाराज जयसिंह यांना तार पाठवून लेखी माफी मागितली. कंपनीला धडा मिळाल्याची खात्री पटली तेव्हा महाराजांनी या कारचा कचरा वाहतुकीसाठी वापर थांबविला.
विश्वभ्रमण सदर / दैनिक पुण्यनगरी / दिनांक ११.१२.२०१३
https://www.loksatta.com/maharashtra-news/pimpri-fortuner-gift-for-pcmc-corporation-for-garbage-collection-1689393/
ReplyDelete