तिकडे गोल खिडकीच्या खाली बसलेल्या स्त्रियांमध्ये लग्नाबद्दल चवीनं बोलणं चाललं होतं. सेक्रेटरीची बायको खेळकर स्वभावाची होती. ती हसून हसून बोलत होती, "नवरा हिला स्कँडल पॉईंटवर घेऊन जाईल, आईस्क्रीम खाऊ घालेल, हिच्या केसात फुलं माळेल आणि कानात हळूच म्हणेल, 'तू माझ्या हृदयाची राणी आहेस!' यापेक्षा आयुष्यात अजून काय असतं! मन रमवण्यासाठी तास दोन तास ज्या गोष्टी केल्या जातील त्याच खर्या. बाकी सगळं खोटंच असतं हे मलाही मान्य आहे. पण ते खोटंच खूप सुंदर असतं. अशा खोट्या प्रेमात स्वतःला गुंतवून ठेवण्यात गैर काय आहे?"
सेठी त्या स्त्रिया काय बोलताहेत हे कान देऊन ऐकत होता. तो झटकन म्हणाला -
आए कुछ अब्र, कुछ शराब आए | इसके बाद आए तो अजाब आए ||
सेक्रेटरीची बायको म्हणत होती - "जर कुणी अशी माझी तारीफ केली तर मी त्याच्याबरोबर आजदेखील पळून जाईन."
"का सेक्रेटरी तुमची तारीफ करीत नाहीत?"
"तो माणूस खूप कंटाळवाणा आहे. मला चटपटीत लोक आवडतात. तोंड टाकून बसणारे पुस्तकी लोक मला आवडत नाहीत. चटपटीत लोकांच्या गोड गोड बोलण्याला काही अर्थ नसेना का पण तसं बोलणं मला आवडतं."
यावर वर्माच्या पत्नीने हळूच म्हटलं, - "मुलीच्या हातात तर काहीच नाही. फक्त काचेच्या चार बांगड्या. नवी नवरी अशी असते का?"
"प्रवास करुन आले आहेत ना!" सेक्रेटरीची बायको म्हणाली - "प्रवासात दागिने उतरवून ठेवले असतील."
"पण पार्टीत बसताना तर दागिने घालून यायला हरकत नव्हती.... दागिने असतील तर घालणार ना!"
यावर एक स्त्री अजून खालच्या आवाजात म्हणाली - "अशी लग्नं दोन दिवसदेखील टिकत नाहीत."
सेक्रेटरीच्या बायकोने वळून पाहिलं आणि मग हात हलवत म्हणाली - "अरे, दोन दिवस ती हसली खिदळली तर काय हरकत आहे? नंतर बायकांच्या नशिबी फक्त कष्टच लिहिलेले असतात. या वेळी तरी तो तिला बरोबर घेऊन हिंडेल फिरेल... मग ति लग्न करुन आलीय का? हे लग्न दोन दिवस तरी टिकेल का? या सगळ्यांचं आपल्याला काय करायचंय? मी तर म्हणते, ती पळून आली असली तरी छान आहे आणि प्रेमविवाह करुन आली असली तरी छानच आहे. हा दोन दिवस तर तिला आनंदात हिंडवेल, फिरवेल."
"तुला असं कुणी फिरवलं नाही?"
"माझं काय विचारतेस? मी लग्न करुन आले पण पहिल्या रात्री माझा नवरा पुस्तक उघडून वाचत बसला."
बायकांच्यामधून हास्याचा फवारा उडाला.
"तेव्हापासून हा पुस्तकंच वाचतोय."
"आमचे जीजाजी पुस्तकच वाचत राहिले, मग ही तीन तीन मुलं कुठून आली?"
"मी हिंमत केली म्हणून, अजून काय? मी एका रात्री पुस्तक ओढून घेतलं आणि फरशीवर फेकून दिलं..." यावर त्या सगळ्या मैत्रिणी खळखळून हसत राहिल्या.
*****
"माणूस चुका करतो कारण तो चुकाच करू शकतो. चूक ही काही माहिती नाही म्हणून किंवा अनुभव नाही म्हणून घडणारी गोष्ट नाही. माणसाच्या स्वभावातच अशी काही खोड असते की त्यामुळे त्याच्या हातून चुका घडतात. सुधीरला नंतर पश्चात्ताप होईल की नाही हे सांगता येत नाही पण त्यानंतरही तो चुका करेलच."
"काय बोलताय?"
"प्रत्येक चुकीचं पाऊल हे विचारपूर्वकच उचललेलं असतं, हे जीवनातलं एक भयानक सत्य आहे."
"तुमचं तत्त्वज्ञान जरा बाजूला ठेवा. आधीच बारा वाजून गेले आहेत. म्हणून तुमच्या अशा पार्ट्यांचा मला राग येतो."
पण डॉ. गणेश यांची बुद्धी तल्लख झालेली होती.
"ही माणसाची नियती आहे. सुधीरने सर्व गोष्टींचा विचार करूनच लग्न केलेलं आहे."
"पण तुम्ही त्याला त्याने केलेली चूक असं म्हणता आहात. मला मात्र ती चूक आहे असं वाटत नाही. ते एकमेकांवर प्रेम करतात. त्यांनी लग्न केलंय."
डॉ. गणेश यावर काही बोलले नाहीत. ते आपल्याच विचारात खोलीत इकडून तिकडे फेर्या मारीत राहिले. आता ते कितीही वेळ फेर्या मारू शकतात याची जाणीव त्यांच्या पत्नीला झाली. अशा फेर्या मारताना त्यांना नवेनवे विचार सूचत रहातात. फेर्या मारता मारता ते एखाद्या वेळी खोलीच्या मधोमध उभे रहातात. आपला डावा हात मानेवर ठेवतात आणि डोळे फरशीवर खिळवून ठेवतात. त्या वेळी त्यांच्या मनामध्ये कोणतातरी नवा विचार जन्म घेतो आहे हे पत्नीला समजतं. असं उभं असताना अचानक ते मानेवर हाताने जोराने मारतात. जणू ते डास मारतात. त्या वेळी नव्या विचाराचा जन्म झालाय हे पत्नीच्या लक्षात येतं. ही प्रक्रिया कितीतरी वेळ चालत रहाते.
पत्नी पलंगावर बसली होती. आपल्या झोपेचं खोबरं झालं असंच तिला वाटलं. कारण आपल्या पतीच्या डोक्यात किती वेळ नवीन विचार येत रहातील हे काही सांगता येत नव्हतं.
"प्रत्येक विचाराचं आपलं स्वतःचं म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व असतं." डॉ. गणेश म्हणत असत - "जन्म घेतल्यावर तो नवजात अर्भकाप्रमाणे वाढू लागतो. एखादं नवं झाड वाढावं तसा त्याचा विकास होऊ लागतो. मग त्या विचाराला नवे नवे अंकूर फुटतात आणि तो विचार स्वतःच्या पायावर उभा रहातो."
अशा वेळी त्यांची पत्नी पलंगावर पालथी मांडी घालून गुपचूप बसून रहाते आणि एक एक विचार कसा जन्म घेतो हे पहात रहाते... यांना हेच आवडत असेल तर तसं का होईना! कधीतरी थकून झोपतील आणि मग मलाही सुखाने झोपता येईल... ती मनातल्या मनात विचार करत रहाते.
"एक एक विचार एकेका जिवंत माणसासारखा असतो. फरक इतकाच की माणूस नष्ट होतो, पण विचार कधीच नष्ट होत नाही. त्यावर काळाची धूळ जमा होईल पण तो मरत नाही. गौतम बुद्धाचे विचार काय मेले आहेत? गौतम बुद्ध आज आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत."
त्यांची पत्नी मनातल्या मनात म्हणते - 'पण काही विचार इतके मुर्दाड असतात की, ते जिवंत आहेत असं कुणीही म्हणणार नाही किंवा ते जन्मतःच मरून जातात.' पण ती हे उघडपणे कधीही बोलणार नाही. ती आपल्या विचारांची चेष्टा करतेय असंच नवर्याला वाटेल म्हणून ती गप्पच रहाते.
डॉ. गणेश यांनी मानेवर हात मारला. त्यांची पत्नी सावध झाली.
"अंजली, मी चुकीचं काहीच सांगत नव्हतो. आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूचा नाश करण्याची प्रवृत्ती माणसांमध्ये असते. तो प्रत्यक्षात असं काही करीत नसेलही पण मनातल्या मनात ही प्रवृत्ती त्याला तसं करायला प्रोत्साहन देत असते."
पत्नी त्यांचं बोलणं ऐकून वैतागली.
"आतल्या आत ही प्रवृत्ती त्याला धक्के देत असते. जाहीरपणे तो आपल्या प्रेयसीवर प्रेम करीत असतो. तिच्यावर जीव ओवाळून टाकत असतो. पण मनातून तो तिला कुस्करून टाकू इच्छित असतो.
पत्नीला धक्का बसला... हे कसले विचार यांच्या मनात येत रहातात?
अंधारात डॉ. गणेश त्यांच्या पलंगासमोर येऊन उभे राहिले होते.
"फूल किती सुंदर असतं! तू ऐकतेयस ना अंजली? फुलाला पाहून लहान मुलाचा चेहरा आनंदानं फुलून येतो. तो झटकन ते फूल उचलून घेतो. पण नंतर तो फुलाची पाकळी तोडून टाकू लागतो. तू कधी मुलांना अशी फुलांची हत्या करताना बघितलंयस? जोपर्यंत तो ते फूल नष्ट करीत नाही तोपर्यंत तो ते सोडत नाही. तो फुलाचा नाश करतो... त्याला सुंदर बाहुली द्या, तो त्या बाहुलीचे केस ओढेल, कपडे फाडेल... मी या वृत्तीबद्दल बोलतोय. मुलाचं हे वागणं स्वयंस्फूर्त असतं. ते मूल अजूनपर्यंत समाजाच्या नियमांच्या जाळ्यात अडकलेलं नसतं. त्यामुळे त्याची ही वृत्ती दबलेली नसते. म्हणूनच तो फुलाची पाकळी पाकळी वेगळी करतो. मोठ्या माणसांचं वागणं स्वयंस्फूर्त असू शकत नाही. त्यामुळे त्यांची ही वृत्ती समाजाच्या विधिनिषेधाच्या ढिगार्याखाली दडपली गेलेली असते. पण संधी मिळताच ती आपलं विनाशकारी काम करू लागते."
त्यांचं हे बोलणं ऐकून पत्नी शहारली... यांना काय होतं कुणास ठाऊक? मग त्यांना दुसर्या विषयाकडे वळविण्यासाठी ती म्हणाली - "बरं झालं आपला प्रेमविवाह नाही झाला ते. नाहीतर एखाद्या दिवशी तुम्ही माझा गळा घोटला असता."
पण डॉक्टर गणेश बोलतच होते... "मी माणसाच्या वृत्तीबद्दल बोलतोय अंजली. मी त्याच्या या वृत्तीवर अंकुश लावण्याची गोष्ट करीत नाहीये. पण त्यांना बेलगाम सोडावं असंही माझं म्हणणं नाही."
"बस्स झालं. मला आता काहीही ऐकायचं नाहीये. रोज काहीतरी विषय घेऊन बसता. माणसाच्या वागणुकीत दोष नाहीये, तुमच्या विचारात दोष आहे. तुमच्या डोक्यात कसलातरी किडा आहे. आता या आणि झोपा."
"तू तर मलाच दोष द्यायला लागलीस अंजली. हा संशोधनाचा विषय आहे. हा एक अद्भुत विचार मला सुचलाय असं नाही तुला वाटत?"
"तुम्ही संशोधन करीत रहा. पण या वेळी शांतपणे झोपा. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण सुखी करायचा प्रयत्न करतो की, त्याची हत्या करू इच्छितो? तुमच्या विचाराला काही शेंडाबुडखाच नसतो. आता प्लीज झोपायला या."
अंजलीला मनातून खूप राग आला होता. त्या प्रेमी युगुलाच्या बाबतीत विचार करताना तिच्या मनात कसले कसले विचार येत होते... एकमेकांचा हात पकडून घरातून निघून आले आहेत... आपल्या प्रेमाच्या बळावर... आणि तेही आजच्या जमान्यात... छोटीशी नाव आणि सागरांच्या मोठ्या लाटांच्या थपडा... त्यांचं मनोबल वाढवायचं तर... ह्यांना प्रेमी हत्यारा आणि प्रेमिका बळीचा बकरा दिसतेय...
नीलू नीलिमा निलोफर
मूळ हिंदी लेखक : भीष्म साहनी
मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठे - २०८
मूल्य - १९०/- रुपये.

No comments:
Post a Comment