बाबांच्या मोठेपणाची आणखी गोष्ट मला, त्यांनी नाही, पण दुसर्या कोणी सांगितली. बाबांचे लहानपणापासूनचे जानीदोस्त भगवानदादा पालव ह्यांना अलबेला चित्रपट बनवायचा होता. त्यांची धडपड, धावपळ चालू होती आणि एक दिवस ते बाबांना भेटले. खूप काळजीत दिसले.
बाबांनी विचारलं, "काय झालं?"
तर म्हणाले, "नेहमीचीच रड. पैसे कमी पडतायत. कोणीतरी मला प्रॉमिस केलं आणि आयत्यावेळी शेपूट घातलं."
बाबा भगवानदादांना 'शहाशिवाजी' ह्या स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. तिजोरी उघडून बाबांनी अनेक दिवसांचा जमलेला सर्व गल्ला बाहेर काढला आणि म्हणाले,
"घेऊन जा. मी गल्ला मोजलेला नाही. अंदाजे पंचवीस सव्वीस हजार रुपये असावेत. तुला उपयोगी पडतील." भगवानदादांनी बाबांचे हात हातात घेतले. त्यांना आभाराचे शब्द सुचेनात.
गळा भरुन आलेल्या आपल्या मित्राच्या पाठीवर थोपटत बाबांनी सांगितलं, "पालव, माझी एकच अट आहे.
मला स्वतःला कधीतरी फिल्म बनवायची आहे. मराठी फिल्म. माझ्या स्वतःच्या आयुष्यावर....
त्यात हिरो म्हणून तुम्ही काम करायच." भगवानदादांनी आश्वासन दिलं. 'हो, नक्की!'
नंतर 'अलबेला' पूर्ण झाला. थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. त्यांच्या ठेक्यावर अख्खी दुनिया नाचायला लागली. भगवानदादांनी अमाप पैसे मिळवले आणि इमाने इतबारे वडिलांचे पैसे परतही केले.
बरेच दिवस गेले. मग एका संध्याकाळी आमच्या घरी गच्चीत बैठक जमली होती. वडिलांनी भगवानदादांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करुन दिली.
"दादा, आता आपली फिल्म सुरु करायची ना?"
दादा गप्प!
वडील उत्साहानं सांगायला लागले, "माझ्या आयुष्याची गोष्ट मी गदिमांना सांगितली. ते म्हणाले,
"सुंदर चित्रपट होईल."
आम्ही दोघांनी मिळून काही कामही सुरु केलंय. हे पहा."
वडिलांनी सोमनाथ चित्र अशा बॅनरखाली एक चित्रपटसंस्था रजिस्टर केली होती. ह्या संस्थेच्या लेटरहेडवर बरीचशी पटकथा तयार होती. वडिलांनी हे कागद भगवानदादांपुढे धरले. ते न पाहता दादा म्हणाले, "राजारामशेठ, मुझसे ये काम नही होगा" वातावरण सुन्न झालं. भगवानदादांनी स्पष्टीकरण दिलं,
"देखो, अभी मै हिंदी फिल्म्स का हिरो हूं| अभी मै मराठी फिम मे काम कैसे करु?
मेरा नुकसान होगा!"
'नफा नुकसान' हे शब्द मत्रीत बसतात? वडिलांनी दादांकडे अविश्वासानं पाहिलं, क्षणभरच! मग मात्र ते सर्व समजले. जगात व्यवहारच खरा! नातीगोती मैत्रीच्या आणाभाका सर्व नंतर!
दादा अजिजीनं म्हणाले,
"नाराज होनेकी क्या बात है? तुम मराठीमेसे कोई अच्छा हिरो ले लो..."
'नाही.' वडिलांच्या आवाजाला धार होती.
"तुम्ही नसाल तर मला दुसरा हिरो नको आणि मला फिल्म बनवायची नाही."
क्षणार्धात बाबांनी हातातले पेपर फाडले आणि उचलून गच्चीतल्या बंबात फेकले.
उपस्थित मंडळी आश्चर्यचकित झाली. सुन्न झाली. तेवढ्यात बाबा ताडताड खाली निघून गेले आणि पाठोपाठ बाकीची मंडळीही पांगली.
गच्चीच्या एका कोपर्यात आम्ही भावंडं खेळत होतो. बाबांचा आवाज चढला, तेव्हा खेळ थांबवून आम्ही हे नाटक पाहिलं. सर्वजण खाली निघून गेले, तरी आम्ही बावचळल्यासारखे उभे होतो. मग मात्र मी ताडकन् उठलो आणि भावंडांना म्हणालो,
"एSS चला. पटकन बंबात हात घाला. मिळतील ते कागद बाहेर काढू यां."
आमच्या सुदैवाने बंबात फुललेले निखारे फारसे नव्हते. कागद पूर्ण पेटले नव्हते. भराभरा हात घालून आम्ही जमतील तेवढे कागद बाहेर काढले. काही धड, काही अर्धवट जळके.
त्यावेळी फारसं काही कळत नव्हतं. पण एवढं जाणवलं की वडिलांना ज्याचं अनमोल महत्त्व आहे, अशी एक गोष्ट आपण वाचवतो आहोत. ह्या कागदांची फाईल मी आजतागायत जपून ठेवली आहे.
ह्या संदर्भात शेवटचा योगायोग असा की काही दिवसांनंतर 'चिमणी पाखरं' नावाचा एक मराठी चित्रपट आला. तो खूप गाजला. त्याची कथा वडिलांच्या लहानपणाशी हुबेहुब साधर्म्य म्हणावी अशी! असो.
*****
सत्य आणि स्वप्नांच्या रस्सीखेचीत, मधल्यामध्ये माझी ओढाताण, होरपळ. हे सगळं विसरायला कधी स्वतःला अभ्यासात बुडवायचं, कधी व्यायाम आणि खेळात झोकून द्यायचं आणि काही नाही तर सुखकर्ता दु:खहर्ता असा मित्रांचा कंपू होताच. तो आसरा सुदैवानं फार मोठा होता. मित्रांच्या संगतीत बसून खाणं पिणं चहा ढोसणं हा माझ्या संपूर्ण दिवसातला हायलाईट असायचा. चहा पिता पिता मी सिगरेट कधी ओढायला लागलो मला कळलंही नाही. आणि मग एक दिवस...
आदल्या रात्री मूड होता, खूप उशिरापर्यंत मन लावून अभ्यास केला होता. त्यामुळे असेल, दुपारी जेवल्यानंतर कधी नव्हे ती गपागप झोप आली. बाहेरच्या खोलीतल्या दिवाणावर मी मस्त ताणून दिली.
दुपारी वडील आले. त्यांनी कपडे बदलले आणि आपली पांढरी पँट बाहेरच्या खोलीतल्या खुंटीवर लावली. शेजारच्या खुंटीवर माझी पँट लटकवलेली तीही पांढरीच!
बाबा जेवून, आपल्या खोलीत झोपायला गेले. वामकुक्षी आटपून ते परत आले. तेव्हाही मी झोपलेलाच होतो. सिगरेट काढण्यासाठी त्यांनी पँटच्या खिशात हात घातला, ती नेमकी माझी पॅंट होती. त्यांच्या आधी लक्षात आलं नाही. पण जेव्हा हातात चारमिनार सिगरेटचं पाकीट आलं. तेव्हा आश्चर्यानं पाहत राहिले. मग त्यांच्या सगळं लक्षात आलं.
त्यांनी शांतपणे स्वतःची पॅंट चढवली. स्वतःच्या खिशातलं गोल्डफ्लेकचं पाकिट बाहेर काढलं. चारमिनार आणि गोल्डफ्लेक अशी सिगरेटची दोन्ही पाकिटं टीपॉयवर ठेवली आणि मी उठायची वाट पाहत समोर बसून राहिले.
त्यांच्या हालचालीने मला जाग आली. मी पटकन उठून बसलो. टीपॉयवरची सिगरेटची पाकिटं मला दिसली आणि मी मनात म्हणालो, "बोंबला."
पटकन उठून मी खोलीबाहेर जायला लागलो, तर बाबांनी मला हातानंच रोखलं,
"बसा, बसा, उदयकुमार शांतपणे बसा."
"आलोच. तोंड धुऊन येतो."
"कशाला? एवढे कष्ट कशाला?
मी इथेच मागवतो ना! बादली, टॉवेल...
आणखी काही?"
त्यांच्या स्वरातला उपरोध, हाताच्या फटक्यापेक्षाही जास्त लागणारा होता.
मी खजील होऊन, मान खाली घालून, त्यांच्यासमोर बसलो. बाबा बोलायला लागले,
"हे चारमिनारचं पाकिट!
हे तुझ्या खिशात सापडलं, त्याअर्थी ते तुझंच आहे. तू खिशात अख्खं पाकीट बाळगतोस. त्याअर्थी "मी दिवसातनं एक किंवा दोनच सिगरेट्स ओढतो" अशी सबब तुला सांगता येणार नाही."
"काय रे? आता गप्प?
तुला काही बोलायचं नाही?"
मी कसला बोलतोय? माझं तोंड शिवल्यासारखं झालं होतं.
"बरं, नको बोलूस. मला सर्व समजलं आहे.
तू एकच गोष्ट लक्षात घे.
चारमिनार ही सिगरेट स्वस्त आहे, पण प्रकृतीला अतिशय हानीकारक आहे. तशी कुठचीही सिगरेट प्रकृतीसाठी वाईटच असते. तरीही त्यातल्या त्यात तुलनेनं, गोल्डफ्लेक कमी हानिकारक!
गोल्डफ्लेक खूप महाग आहे.
तुला परवडत नसेल, तर दहा चारमिनार ऐवजी दोन गोल्डफ्लेक ओढ.
आणि तेवढेही पैसे नसतील, तर माझ्या खिशातून घे."
आता आश्चर्यचकित होण्याची माझी पाळी. "हे मी फार आनंदानं सांगत नाहीये. नाईलाज म्हणून! बाप म्हणून तुझी काळजी वाटते, ह्यासाठी सांगतोय."
सिगरेटची दोन्ही पाकिटं टेबलावर ठेवून बाबा निघून गेले.
ते वागले ते बरोबर की चूक, हे सांगता येणार नाही. मला तो अधिकारही नाही. ह्या प्रसंगातून माझ्या लक्षात आली, ती त्यांची जगण्याची वृत्ती!
'खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी!' हा त्यांचा मंत्र होता. तो त्यांनी स्वतः पाळला आणि आम्हालाही शिकवला.
मात्र ह्या संदर्भात दुर्दैवाने असाही एक दिवस उजाडला. मध्ये काही काळ गेला. उताराला लागलेली परिस्थिती गडगडत अधिकाधिक वाईट झालेली.
कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून मी रत्नागिरीहून परत आलो होतो. माझ्या परीने शर्थीने कामाला लागलो होतो. गडगडणारा कौटुंबिक डोलारा सावरण्याचा प्रयत्न करीत होतो.
एकदा मी घरी आलो, तर खिडकीत एक अत्यंत स्वस्त असं विडीचं बंडल. मी पाहतच राहिलो.
"कधी काळी राजासारखं आयुष्य जगलेले माझे बाबा!
गाडीत इव्हिनिंग इन पॅरिस शिंपडण्यापासून, उंची विलायती दारु पिण्यापासून, ते गोल्डफ्लेक किंवा फाईव्ह फाईव्ह फाईव्ह अशा दर्जेदार सिगरेट्स ओढण्यापर्यंत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला क्लास असायचा.
आणि आज आता... ही विडी?"
न राहावून मी त्यांना विचारलं,
"बाबा, ह्या विड्या कोणाच्या?"
तर माझी नजर चुकवीत म्हणाले,
"गंमत म्हणून ओढतो रे!
कधी कधी विडीचीच तल्लफ येते."
माझ्या डोळ्यात पाणी आलं.
मीही आज काय बरोबर आणि काय चूक? असा विचार केला नाही.
मला एवढंच वाटलं,
"बाबांचे शेवटचे दिवस आहेत, बहुधा!
ते आनंदात जायला हवेत."
मी त्यांच्यासाठी घरात गोल्डफ्लेकचं पाकीट आणि चांगली व्हिस्की आणून ठेवायला लागलो. त्यांना मनातून आनंद झाला असणार.
पण वरकरणी निरिच्छपणे म्हणायचे, "आता 'हेच हवं
आणि तेच हवं' असं माझं काही राहिलं नाही रे!"
मी उदासपणे हसायचो.
मधल्या काळात मी हॉटेलच्या धंद्याबरोबर, ट्रान्सपोर्टचा बिझनेसही नव्याने परत सुरु केला होता. मी घेतलेल्या टेंपोला आमच्या भागातल्या स्टुडिओंची बरीच भाडी मिळत होती. थोडक्यात काय, तर मी अधिक सेटल झालो होतो आणि लग्नासाठी अधिक उतावळा.
ह्यावेळी मामानं गोरेगावचं एक स्थळ आणलं होतं. ही मुलगी चांगली शिकलेली होती, नोकरी करीत होती. मी गोरेगावातल्या त्यांच्या घरी पोचलो.
मुलगी, तिचे वडील आणि दोन काका अशी मंडळी उपस्थित होती. सुरुवातीला जरा इकडच्या तिकडच्या हवापाण्याच्या गप्पा झाल्या. मी बोलत होतो पण मुलगी सोडून इतरांच्याशी. तिच्याशी बोलायला, तिला काही प्रश्न विचारायला मला लाज वाटत होती.
नाही म्हणायला, चहापानाच्या वेळी मी मुलीकडे जरा नीट पाहून घेतलं. मुलगी खूप छान होती, मुख्य म्हणजे मला शोभेलशी उंचनिंच होती. हुश्य! मी सुटकेचा नि:श्वास टाकला. ह्यावेळी निदान उंचीच्या कारणावरुन मला नकार मिळायला नको.
मुलगी चहाचे कप उचलून आत निघून गेली आणि मग माझा इंटरव्ह्यू सुरु झाला.
मुलीचा एक काका इतिहासाचा प्राध्यापक होता. त्यानं प्रथम सूत्रं हाती घेतली.
'किती शिकलात?'
'जास्त नाही, इंटर सायन्स झालो. पुढे इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष पूर्ण केलं नाही.'
"का?'
मी काहीही न लपवता, त्यावेळची घरची परिस्थिती सांगितली.
"अच्छा!
बरं, शाळेत, कॉलेजात तुमचे आवडते विषय कोणते होते?"
"शाळेत असताना मला संस्कृत आणि इतिहास हे विषय आवडायचे."
"अरेच्या! मग तुम्ही कॉलेजमध्ये सायन्सला का गेलात?"
"कारण आवडत्या विषयात करीअर करायला फारसा वाव नाही, असं मला वाटलं."
हे बोलून मी इतिहासाच्या प्राध्यापकाला डिवचलंय, हे माझ्या लक्षातही आलं नाही.
त्यानं आता चेव आल्याप्रमाणे माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
'इतिहास आवडता विषय होत काय? बघतोच मी!' असं म्हणून तो सुरु झाला.
"शिवाजीचा जन्म कधी झाला?
आणि मृत्यू?"
असे बाळबोध शाळकरी प्रश्न आधी आले आणि मग 'अशोकाच्या मुलीचं नाव काय?' इथपासून वर्धन डायनॅस्टी, मौर्य आणि गुप्त डायनॅस्टी असा सगळा तुलनात्मक आढावा घेणं सुरु झालं.
सुदैवानं माझं इतिहासाचं प्रेम शाळेतल्या पाठ्यपुस्तकांपुरतंच मर्यादित नव्हतं. त्यामुए इतिहासावरच्या आडव्या तिडव्या चर्चेत मी छान भाग घेऊ शकलो. इतिहासाच्या प्राध्यापकांचं मत माझ्याबद्दल अनुकूल झालं, एवढं मला कळलं.
आता दुसरे काका पुढे सरसावले. हे राजकारणी काका. मृणाल गोरे ह्यांच्या पक्षाचं काम करणारे.
"तुम्हाला राजकारणात कितपत इंटरेस्ट आहे?"
"खूप! पण ह्या दलदलीत स्वतः फसण्याची मला यत्किंचित इच्छा नाही."
झालं. माझ्या ह्या स्टेटमेंटवर राजकारणासंबंधी जोरदार ऊहापोह झाला. सध्याचे करप्ट राजकारणी, त्यांची आपापसातली सुंदोपसुंदी अशा अनेक मुद्द्यांवर वाद रंगला. लोकशाही योग्य की हुकूमशाही असेही उभे आडवे फाटे फुटले. चालू राजकारणावर सणसणीत ताशेरे झोडले गेले. मुलीचा काका विरोधी पक्षाचा असल्याकारणाने सत्ताधारी पक्षावर टीका झाली, ती त्याला चांगलीच मानवली.
आता मुलीच्या संगीतप्रेमी वडिलांनी संभाषणात भाग घेतला आणि गप्पांचा ओघ राजकारणावरुन संगीताकडे वळला. मीही संगीतप्रेमी.
त्यामुळे किशोरीताईंची गायकी श्रेष्ठ की प्रभाताईंची? जयपूर घराणं की किराणा घराणं? आजकालचे उभरते गायक, त्यांची अदाकारी आणि जानेमाने जुने कलाकार ह्यांची तुलना, अशा अनेक विषयांवर आम्ही समरसून बोललो.
एकूण तास दोन तासांनंतर तिघांचा तिरंगी इंटरव्ह्यू संपला. वरपरीक्षेत मी पास झालो आहे, असा तिघांचाही सूर मला दिसला. मी खूष!
मुलीइतकंच तिच्या घरातलं सांस्कृतिक वातावरण मला आवडलं. मुलीशी फार मोठं बोलणं झालंच नाही. पण त्यासाठी उभा जन्म होताच की! घराबाहेर पडताना मी सहज मागे वळून पाहिलं, तर मुलगी खिडकीत उभी होती आणि सुहास्यमुद्रेनं मला टाटा करीत होती. मी अधिकच खूष झालो. हात हलवून मीही तिचा निरोप घेतला. घरी येताना मी हवेतून चालत होतो. 'आपलं लग्न जमलं' ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नव्हती.
दोनचार दिवसानंतर केव्हातरी मुलीचे एक काका मला भेटायला म्हणून दादरला आले. 'उदय लाड कुठे राहतात?' हे विचारायला ते आमच्या हॉटेलपाशी थांबले.
हॉटेलच्या बाहेर दत्तू मोगरे नावाचा एक नमुना टाईपचा माणूस, पानाची गादी चालवायचा. काकांनी त्याच्याकडे माझी चौकशी केले.
दत्तूनं आमचं घर दाखवलं आणि वर उत्साहानं त्यांना माझ्याबद्दलची अधिक (उणे?) माहितीही पुरवली. त्यांनी न विचारता!
"हो हो! उदयदादाला मी चांगला ओळखतो. मीच कशाला? ह्या एरियात त्याला सगळेच ओळखतात. फार चांगला माणूस!"
त्याला खरं म्हणजे शिकायचं होतं हो. पण जमलं नाही. वडिलांचे सगळे धंदे बुडाले मग एवढ्या दहा मुलांच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यावरच आली. काय करणार बिचारा? चार पैसे जास्त कमाई व्हावी, ह्यासाठी हॉटेलमध्ये चोरुन मारुन दारु प्यायला देतो लोकांना ! म्हणूनच चालतंय हॉटेल.
पण बाकी म्हणाल, तर अगदी सज्जन सरळ माणूस ! परवा बघा, ह्या रस्त्यावर कोणी तरी चोरानं एका बाईची पर्स खेचली. हा धावला. ह्यानं चोराला पकडला आणि असा बेदम मारला, विचारु नका.
ह्याचा हात कसला हो? हातोडा आहे, हातोडा! हॉटेलमध्ये सुद्धा कोणी गुंडागर्दी केली, तर एकटा पुढे होतो आणि पाचदहा जणांना बदडून काढतो. त्याच्यामुळेच ह्या रस्त्यावरची दादागिरी कमी झाली.
पण पोलिस? ते उलटा ह्यालाच चौकीत बोलावून दम देतात. आजकाल खर्याची दुनिया राहिली नाही बघा.
दानधर्म करण्यातही ह्याचा अगदी पहिला नंबर! रस्त्यावर बेवारशी प्रेत पडलं असलं तर जातपात बघणार नाही. क्रियाकर्मासाठी स्वतःच्या खिशातनं पैसे काढून देणार. आम्हाला सर्वांना आधार आहे त्याचा! इथे काही राडा झाला, तर उदयदादा तो निस्तरणार, अशी खात्री असते आमची! अगदी दिलदार राजा माणूस!"
दत्तूची मुक्ताफळं ऐकून मुलीचे काका मला न भेटताच निघून गेले. नंतर दोन दिवसांनी त्यांचा निरोप आला,
"क्षमस्व ! पत्रिका जुळत नाही."
दत्तूकडून मला त्यानं म्हटलेला स्तुती (?) पाठ कळला होता. तेव्हाच मी कपाळावर हात मारला आणि मग हा आडमार्गानं मिळालेला आणखी एक नकार!
काळेकाकांसारखंच जिनं माझ्यावर जिवापाड प्रेम आणि फक्त प्रेमच केलं, ती म्हणजे माझी बहीण, चंपूताई. ही धाकट्या आईची सर्वात मोठी मुलगी. म्हणजे जनरीतीप्रमाणे माझी धाकटी सावत्र बहीण.
पण त्या काळात आमच्या घरी सख्खं सावत्र, असं काही नव्हतं आणि चंपूताईबद्दल माझ्या मनात इतकी आदराची भावना होती की मी तिला सख्ख्या मोठ्या बहिणीसारखाच मान देत असे. एरवी बिनदिक्कतपणे भसाभसा सिगरेट ओढणारा मी, तिच्यासमोर मात्र कधीही सिगरेट ओढली नाही.
घरातली ही एकुलती एक व्यक्ती, जिनं मला नेहमी समजून घेतलं, मला भावनिक आधार दिला, मला योग्य मार्ग दाखविला आणि वेळोवेळी स्पष्टवक्तेपणानं माझ्या दोषांवर बोट ठेवलं.
माझ्या ह्या शांत, सात्त्विक, सोज्वळ बहिणीला नशिबानं मात्र साथ दिली नाही. तिच्या वाट्याला आली एक असाध्य अशी शारीरिक व्याधी. तीही अशा काळात की जेव्हा घरात खायला पुरेसं अन्न नव्हतं, तर औषधाला पैसे कुठले?
हा वडिलांचा उतरता काळ होता. त्यांना लिव्हरचं दुखणं, तर चंपूताईला श्वसनाचा, फुप्फुसांचा आजार. खोकून खोकून बिचारी हैराण व्हायची. कधीतरी रक्ताची उलटीही व्हायची.
त्याही परिस्थितीत चंपूताई शिकवण्या करायची. कुटुंबाला हातभार लावायची. मी रत्नागिरीहून शिक्षण सोडून नुकताच परत आलेला. एकीकडे मी वडिलांचा ढासळलेला कारभार सांभाळतोय. दुसरीकडे नोकरी किंवा इतर व्यवसायासाठी खटपट करतोय. त्यावेळी घरात ही दोन आजारी माणसं. एवढं टेन्शन कमी होतं म्हणूनच की काय, चंपूताईसाठी वरसंशोधनाची मोहीमही जोरात सुरु होती.
चंपूताई बिचारी राजी नसायची, पण धाकट्या आईला वाटायचं, 'पोरीचं आता लग्न व्हायला हवं.' आई म्हणून तिचीही धडपड समजण्यासारखी.
ते दिवस मला अजून आठवतात. कधीकधी सकाळि घरात एकदम धावपळ सुरु व्हायची. बसायची उठायची बाहेरची खोली, एकदम चकाचक दिसायला लागायची. 'संध्याकाली चहाबरोबर खायला काय करुया?'
'चंपूताईने कुठली साडी नेसावी?' अशा विषयांवर चर्चा सुरु व्हायची. एकूण वातावरण एकदम उत्साहाचं.
संध्याकाळी पाव्हणे मंडळी चंपूताईला पाहायला यायची. गप्पाटप्पा व्हायच्या. खाणंपिणं पार पडायचं. हे लोक परत गेले, तरी ह्या निमित्ताने निर्माण झालेलं घरातलं आनंदाचं वातावरण पुढचे काही दिवस टिकून राहायचं.
मग एक दिवस मुलाकडून नम्रपणे नकार यायचा आणि फुग्याला टाचणी लावल्यासारखा घरातला आनंद क्षणात विरुन जायचा.
कधी पत्रिका जुळत नाही, हे कारण! तर कधी 'वाटाघाटी मनासारख्या झाल्या नाहीत' अशी स्पष्टोक्ती. वरपक्षाला अपेक्षित असलेला हुंडा किंवा मानपान आपण करु शकत नाही.
'मुलीला पंचवीस तोळे सोनं घाला' असा वरपक्षाचा आदेश आपण मान्य करु शकत नाही. ह्या गोष्टींचा मला फार त्रास व्हायचा.
कधी कधी दुहेरी टोचणी लागायची. कारण चंपूताईला बघायला येणारी मंडळी, आमच्या ओळखीतली तर असायचीच. पण ह्या मंडळींनी वडिलांच्या भरभराटीच्या काळात त्यांचा भरपूर लाभ उठविलेला असायचा. घरचा पाहुणचार घेण्यापासून, पैसे उधार घेण्यापर्यंत!
आता मात्र स्वतःचा वरपक्ष आहे, म्हणून ते जुन्या गोष्टी जाणूनबुजून विसरले होते. चंपूताईच्या चेहर्यावरची दारुण निराशा मी पाहायचो आणि प्रत्येक वेळी मन आक्रंदून उठायचं.
"आज तुझ्याकडे पैसा असता, तर ही वेळ आली नसती."
ह्या अशा प्रत्येक क्षणी माझा विश्वास दृढ व्हायचा की 'माणसाकडे पैसा पाहिजे. फक्त पैसा. तो कुठल्याही मार्गाने मिळवलेला असो. तोच तुम्हाला तारतो. तोच तुम्हाला जगवतो. तोच तुमच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करतो.'
अर्थात् तेव्हा हा फक्त माझ्या मनातला विचार! प्रत्यक्षात 'पैसे कसे मिळवावेत' हा प्रश्न सुटायचाच होता. तेवढ्यात चंपूताईची तब्येत इतकी खालावली की तिचं फुप्फुसाचं ऑपरेशन करण्यावाचून पर्याय उरला नाही.
ऑपरेशनसाठी कुठल्या महागड्या किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिला नेणं शक्य नव्हतं. तेव्हा शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं ठरलं.
ऑपरेशनसाठी किमान दोन बाटल्या रक्त आधी तयार ठेवायचं होतं. 'ते विकत घेण्यापेक्षा घरच्यांनी दिलं तर बरं' असा डॉक्टरांनी सल्ला दिला. सुदैवानं माझा आणि चंपूताईचा रक्तगट एक होता. म्हणून मीच रक्त दिलं.
रक्त देण्याच्या निमित्ताने दोन नवे अनुभव मिळाले. एक तर 'चक्कर येणे' हा काय प्रकार असतो, हे प्रथमच कळलं आणि नंतर भरपूर साखर घातलेली आयुष्यातली पहिली कॉफी मी तिथे प्यायलो.
चंपूताईच्या फुप्फुसाचा खराब झालेला एक पार्ट कापून काढावा लागला. पण सुदैवाने ती वाचली आणि हळूहळू परत बरी व्हायला लागली.
धाकट्या आईने परत एकदा चंपूताईसाठी वरसंशोधनाची मोहीम सुरु केली.
ह्यावेळी मात्र चंपूताईने एक आग्रह धरला की 'वरपक्षाला माझ्या आजाराबद्दल, ऑपरेशनबद्दल सर्व स्पष्टपणे सांगायचं आणि मगच पुढे जायचं.'
चंपूताईच्या अटीनुसार वागल्यानंतर, तिचं लग्न जमणं अधिकच कठीण झालं. कारण आता तिला पाहायला येणार्या मुलांची संख्या एकदमच घटली. त्यातूनही एखादा मुलगा आला आणि माझ्या सात्त्विक सुस्वरुप बहिणीला त्यानं पसंत केलं, तरी पूर्वीचे मानपान आणि हुंडा हे अडथळे होतेच.
मध्यंतरीच्या काळात माझं लग्न झालं, तेव्हा चंपूताईलाच मी माझं सिक्रेट पहिल्यांदा सांगितलं आणि तिनं मला संपूर्ण पाठिंबा दिला.
आणखी काही दिवस गेले. चंपूताईच्या लग्नाची फारशी आशा उरली नव्हती आणि मग अचानक 'मुलगी पसंत आहे' असा एक होकार आला.
हा मुलगा एका शाळेत ड्रॉईंग टीचर होता. सभ्य, सुसंस्कृत होता. त्याला हुंड्यापांड्यात रस नव्हता. त्याला चंपूताईचं आजारपणही माहीत होतं. पण तरीही तो लग्नाला तयार झाला, कारण त्याला चंपूताई मनापासून आवडली होती. लग्न सहा महिन्यांनी करायचं, असं ठरलं आणि आमच्या घरात आनंदी आनंद पसरला.
लग्नाची तयारी जोरात सुरु झाली. चंपूताईचा भावी नवरा घरी यायला लागला.
दोघं खुषीत होते, एकमेकांच्या प्रेमात होते आणि एक दिवस काही वेगळाच उगवला.
ह्या दिवशी चंपूताई सकाळी उठलीच नाही. 'हे असं काय झालं?' म्हणून घरची मंडळी तिला उठवायला गेली, तर तिच्या उशाशी झोपेच्या गोळ्यांची रिकामी बाटली आणि एक चिठ्ठी!
चिठ्ठीत तिने घरच्या सर्वांना लिहिलं होतं, "तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं.
मला सुख मिळावं म्हणून खूप खटपट केली. माझं नशीब इतकं थोर, की माझं आजारपण माहीत असूनही मला स्वीकारणारा, चांगल्या मनाचा जोडीदार मला भेटला.
पण मी भाग्यवान ठरले, तरी त्याचं भाग्य डागाळू नये, असं मला मनापासून वाटतं. मी परत आजारी पडले, तर ह्या सज्जन माणसाचा उभा जन्म माझा आजार निस्तरण्यात जाईल.
ही गोष्ट मला नको आहे.
गेले काही दिवस मी खूप विचार केला. शेवटी हा मार्ग शोधला. त्यासाठी झोपेच्या गोळ्या साठवल्या आणि आज तुमचा निरोप घेते आहे.
मी तुम्हा सर्वांची ऋणी आहे.
तुमच्यावर खूप प्रेम करणारी, तुमचीच..."
चंपूताई गेली. पण आम्हा सर्वांसाठी प्रेमाचा, नि:स्वार्थीपणाचा एक आदर्श ठेवून गेली. हा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला एक काळाकुट्ट दिवस.
परमेश्वरानं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, काही सुख, काही दु:ख, अशी वाटणी केलेली असते. पण प्रियजनांच्या मृत्यूचं दु:ख माझ्या वाट्याला जरा जास्तच आलं, असं मला वाटतं.
बाबा गेले. चंपूताई गेली. हे दोन्ही आघात झाले, तेव्हा मी अगदी तरुण होतो. वरवर पाहता हे घाव मी पचवले. काळजात खोलवर झालेल्या जखमा कधी कोणाला दिसू दिल्या नाहीत.
एक दिवस अचानक मला मोठमोठ्या मराठी कलाकारांचे फोन यायला लागले,
"दादा, नवीन सिनेमा काढताय ना? आम्ही जाहिरात वाचली. आम्हाला तुमच्या सिनेमात काम करण्यात इंटरेस्ट आहे."
किंवा
"हार्दिक अभिनंदन! तुमची नवीन सिनेमाबद्दलची जाहिरात वाचली."
किंवा
"दादा, आज नवीन सिनेमाबद्दलची मीटिंग आहे ना? तुमच्या ऑफिसमधून फोन आला होता." मी त्यावेळी नवीन सिनेमाचा विचारही करीत नव्हतो. मग ही जाहिरात कुठली? हा कुठला सिनेमा?
कोण काढतोय? आणि सर्वांना माझ्या ऑफिसच्या नावानं फोन का जातायत? माझा प्रचंड गोंधळ. एकेकाला स्पष्टीकरण देताना माझ्या नाकी नऊ आले.
काही दिवसानंतर मला एका नाटकाला येण्याचं निमंत्रण मिळालं.
नाटकाचं नाव, 'चोराला भेटला पांडुरंग.'
मी तिकीट काढून नाटकाला गेलो.
गेल्यागेल्याच आयोजकांनी मला भेटून सांगितलं,
"दादा आम्ही तुमचा नाटकाआधी सत्कार करणार आहोत. अनेक क्रीडासंस्था आणि सामाजिक संस्थांचे प्रमुख अधिकारी म्हणून तुम्ही इतकं काम केलंय, त्यासाठी आम्हाला तुमचं जाहीर कौतुक करायचं आहे."
माझ्या नाही नको ला त्यांनी जुमानलं नाही. प्रयोगाआधी रंगमंचावरचा दर्शनी पडदा दूर झाला आणि आयोजकांनी मला रंगमंचावर निमंत्रित केलं.
मी प्रेक्षकांमधून उठलो. रंगमंचावरच्या पायर्या चढायला लागलो. त्याचवेळी विंगेतून एका माणसाने एंट्री घेतली. आम्ही दोघं आमनेसामने उभे राहिओ आणि आयोजक गडबडले.
कारण मी उदय लाड. तसाच विंगेतून आलेला माणूसही उदय लाड होता. तो ह्या नाटकाचा दिग्दर्शक होता. मग अर्थात प्रसंगावधान राखून आयोजकांनी आमचा दोघांचाही सत्कार केला.
ह्या उदय लाडशी बोलतांना, नंतर कळलं, की तो गिरणी कामगारांची नाटकं बसवायचा. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात नवीन सिनेमासंबंधी जाहिरात आली होती, तीही त्याचीच!
एकाच नावामुळे समजुतीचा कसा घोटाळा होतो, ती गंमत मी अनेकांना सांगितली. हा किस्सा मी प्रमोद पवारलाही सांगितला. तेव्हा प्रथम तो हसला. पण मग गंभीरपणे म्हणाला,
"दादा, ही एक छोटीशी मजा झाली. ती सोडा. पण एकाच नावामुळे काही गंभीर असे घोटाळेही होऊ शकतात. तर तुम्ही नाव बदलत का नाही? नाहीतरी तुम्हाला सर्वजण उदय दादा लाड म्हणूनच ओळखतात, तर तुम्ही अधिकृतरीत्या तेच नाव का घेत नाही?'
त्याची सूचना मला आवडली, पटली. मग मी अधिकृतरीत्या नाव बदललं. आता व्यवहारात आणि कागदोपत्री सर्व ठिकाणी मी आहे 'उदय दादा लाड.'
'मी माझ्या सोबत इतरही कित्येकांना वेळोवेळी चार सुखाचे क्षण दिले असतील...' तर तीच माझी खरी कमाई आहे.
पैशांच्या कमाईची आपण नोंद करतो. त्याचे हिशेब मांडतो, हिशेब ठेवतो. पण माझ्या खर्या कमाईची मी कधीच नोंद ठेवली नाही.
डोळे बंद करुन, आयुष्याचा पट उलगडायला लागलो की असे अनेक प्रसंग आठवतात.
मी हिंद पंजाब हॉटेल चालवत होतो. त्या काळात माझ्याकडे कोकणातला नरहरी नावाचा एक मुलगा कामाला होता. हॉटेलमध्ये नोकर असलेला नरहरी अतिशय साधा सरळ पापभीरु आणि मुख्य म्हणजे कामसू.
त्याच्या वागण्याने थोड्याच दिवसात तो माझ्या मर्जीतला विश्वासू माणूस झाला. नरहरीवर कुठलंही काम सोपवा, तो ते छान पार पाडणार, इतकी माझी खात्री.
मग एक दिवस नरहरी सकाळपासून दिसला नाही. त्याच दिवशी हॉटेलचा गल्ला तपासताना माझ्या लक्षात आलं की मोजून ठेवलेल्या पैशांपैकी एक मोठी रक्कम नाहीशी झाली आहे.
नरहरी आणि रक्कम दोन्ही एकाच दिवशी गायब होतात, ह्याचा अर्थ उघड होता. मी प्रचंड संतापलो. एकतर आपल्या विश्वासातल्या माणसानं आपल्याला फसवावं, हे दु:ख. आणि जेव्हा मी मोठ्या कष्टाने एक एक रुपया कमवतो आहे, तेव्हा नरहरीने उचललेली ही रक्कम म्हणजे माझ्यासाठी फार मोठा फटका होता.
मी ठरवलं नरहरीला शोधायचं आणि आपले पैसे वसूल करायचे. माझं तरुण वय होतं, अंगात रग होती, गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी रक्त उसळलं होतं. मी अगदी पोलिसी खाक्यानं तपास सुरु केला.
प्रथम नरहरीला ओळखणार्या लोकांशी बोललो. त्याच्या गावचा पत्ता मिळवला. मग बरोबर माझ्यासारख्याच दोन आडदांड पहिलवान मित्रांना घेतलं आणि मेटॅडोर टेंपोमधून नरहरीच्या गावाला जायला निघालो.
नरहरी कोकणातल्या एका आडगावचा रहिवासी. मुख्य रस्ता मागे टाकून कच्च्या रस्त्यावरुन खडखडत आमचा टेंपो गावच्या वेशीपाशी पोचला.
गावात शिरण्याआधी, रस्त्यावरच्याच एका माणसाकडे चौकशी केली, तेव्हा कळलं की 'मुंबईचा चाकरमानी नरहरी गावात परत आला आहे आणि आज त्याच्या घरात लग्न आहे.'
मी मनाशी म्हटलं, "अच्छा, माझे पैसे लुबाडून हा लग्न करतोय काय? दाखवतो आता मजा!"
आम्ही मेटॅडोर मधून नरहरीच्या दारात पोचलो. कुडाचं छोटंसं घर. बाहेरचं अंगण शेणानं सारवलेलं. अंगणात एक मंडप आणि त्यावर लाल हिरव्या पताकांची सजावट.
हे सगळं वातावरण माझ्या डोळ्यांनी टिपलं, पण मेंदूनं त्याची दखल घेतली नाही. माझ्या डोक्यात आग पेटली होती.
मला फसवून लुबाडून पळून आलेल्या नरहरीची मानगूट पकडायची. त्यानं बर्या बोलानं पैसे दिले तर ठीक, नाहीतर त्याला बडवायचं आणि पैसे वसूल करायचे... हेच विचार डोक्यात भरलेले. माझे मित्रही तापले होते.
आम्ही टेंपोच्या ड्रायव्हरला टेंपोतच बसायला सांगितलं. न जाणो तशीच वेळ आणि पटकन पळून जायला लागलं, तर आपली तयारी असावी. सिनेमातल्या सारखा माझा सर्व प्लॅन ठरला होता.
मी आणि माझे मित्र नरहरीच्या घराच्या दारात उभे राहिलो. मी हाक मारली, "नरहरी SS."
नरहरी बाहेरच्या खोलीत आला. मला पाहून चपापला. त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला. पटकन पुढे होऊन त्यानं दाराला कडी घातली आणि माझ्या पायावर लोळण घेतली.
मी संतापाने थरथरत त्याची गचांडी पकडली. स्वतःची मान सोडवून घेण्याचा प्रयत्नही न करता, तो गयावया करीत म्हणाला,
"शेट, मला फक्त दोन मिनिटं द्या.
माझी गोष्ट ऐकून घ्या."
माझी पकड किंचित सैल झाली. तो उठला आणि मधल्या भिंतीच्या दारापाशी गेला. त्यानं दार उघडलं. आतल्या खोलीत, एका झरोक्यातून अंधुकसा प्रकाश येत होता.
मी पाहिलं. तिथे एका फाटक्या जुनाट घोंगडीवर एक म्हातारी बसली होती. बहुधा नरहरीची आई. घरातल्या लग्नासाठी तयार झाली होती. त्यातल्या त्यात बरी, धडुतं म्हणावं अशी एक साडी ती नेसली होती. दार उघडल्याचा आवाज झाला आणि तिनं आमच्या दिशेनं वळून पाहिलं. ती आंधळी होती.
उत्सुकतेनं भरलेल्या तिच्या आनंदी चेहर्याकडे पाहतांना, माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. मनात अपराधीपणाची भावना आली. क्षणभरच! मग मात्र मी स्वतःला सावरलं आणि नरहरीचा हात झपकन पकडला.
म्हातारीनं विचारलं,
"नरु? काय रे? भट इलो?"
म्हातारीच्या प्रश्नाचे उत्तर न देता नरहरी वळला आणि चालायला लागला. त्याच्या पाठोपाठ त्याचा हात न सोडता मी! आम्ही मांडवात आलो.
अचानक माझं लक्ष गेलं. रस्त्यावर काही लोक लाठ्या काठ्या घेऊन जमले होते. बाहेरगावाहून आलेला टेंपो, आतमध्ये पैलवानी थाटाची माणसं, ह्यावरुन गावकर्यांना अंदाज आला असावा. लग्न घरात काही गडबड होऊ नये, ह्यासाठी ते जय्यत तयारीनिशी आले होते.
इकडे नरहरीने कोणाला तरी सांगितलं.
"अरे, मुलीला दोन मिनिटांसाठी घेऊन या."
मी आणि माझे मित्र सर्व नाटक पाहात होते. घरातून चार माणसं बाहेर आली. त्यांच्या खांद्यावर एक खुर्ची आणि खुर्चीत बसलेली नवरीमुलगी. त्या माणसांनी खुर्ची खाली ठेवली.
आता प्रथमच नरहरी भडाभडा बोलायला लागला.
"दादा, ही माझी बहीण!"
मी उडालो.
"आज तिचं लग्न आहे. आजच्या दिवस मला माफ करा. मी तुम्हाला हात जोडतो.
उद्या तुम्ही माझी खांडोळी केलीत तरी चालेल."
डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी पुसत तो म्हणाला, "माझी बहीण पोलिओ पेशंट आहे."
मस्तकावर विजेचा लोळ पडावा, तसा मी नखशिखान्त थरथरलो.
नकळत मी त्या मुलीच्या पायांकडे पाहिलं. मुलगी लाजून पायांवरची साडी नीट करीत होती. तरीही मला दिसले, पोलिओचा बळी ठरलेले काटक्यांसारखे दोन निर्जीव पाय.
माझ्या डोळ्यांना पाण्याच्या धारा केव्हा लागल्या, मला कळलंच नाही. नरहरी माझा हात सोडवून पुढे गेला. दारातून आलेल्या नवर्या मुलाच्या वरातीचं त्यानं स्वागत केलं. आणि मग लग्नाची एकच धामधूम उडाली.
सुन्न होऊन मी एका कोपर्यात उभा. माझे मित्रही बावचळल्यासारखे गप्प. काय करायला आलो होतो? आणि घडलं काय?
एका बाजूला नरहरीच्या पांगळ्या बहिणीचं लग्न पार पडत होतं. नरहरी कृतकृत्य झालेला आणि त्याच्या आंधळ्या आईच्या चेहर्यावरुन समाधान ओसंडून वाहातंय.
तर मी मात्र मनातल्या मनात हजार मरणं मेलेला, चंपूताईच्या आठवणीने कासावीस झालेला. चंपूताईने आत्महत्या केली, त्या गोष्टीला जेमतेम सहा महिने होत होते.
मी नरहरीच्या जागी स्वतःला पाहायला लागलो. त्याच्या चेहर्यावरचा आनंद पाहताना माझं हृदय भरलं.
नरहरीच्या बहिणीचं लग्न लागलं. खुर्चीत बसून, नरहरीची बहीण सासरी गेली आणि नरहरीनं माझे पाय धरले.
"दादा, तुम्ही माझ्या बहिणीचं लग्न पार पडेपर्यंत थांबलात. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही.
मी कबुली देतो. मी चुकलो. मी चोरी केली. पण माझ्या पांगळ्या बहिणीला चांगला नवरा मिळावा, तिचं भलं व्हावं, म्हणून मी पाप केलं.
माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची पै न पै फेडीन मी."
एक शब्दही न उच्चारता मी तिथून बाहेर पडलो. आम्ही मुंबईला परत आलो.
पंधरा दिवसांनी नरहरी परत आला. मी त्याला कामावर ठेवला. तो पूर्वीसारखंच इमाने इतबारे काम करायला लागला. प्रत्येक महिन्याचा पगार घेताना म्हणायचा,
"शेट, तुमचे पैसे थोडे थोडे तरी कापून घ्या ना!"
मी त्याचे पैसे कधीही कापले नाहीत. त्यानं उचललेली रक्कम त्या काळात माझ्यासाठी खूप मोठी होती. पण एका बहिणीचं लग्न झालं हे समाधान त्याहीपेक्षा मोठं होतं.
पुढे नरहरी आपल्या गावाला परत गेला. मध्ये बरीच वर्षंही गेली. एकदा मी कामासाठी कोकणात निघालो होतो. वाटेत चहा घ्यायला थांबलो, तर मला नरहरी दिसला.
मी त्याला हाक मारली, तशी तो धावत आला आणि माझ्या पाया पडला. मी त्याच्याकडे पाहातच राहिलो. किती बदलला होता तो? भरलेली शरीरयष्टी, नीटनेटके परीटघडीचे कपडे, व्यक्तिमत्त्वातला आत्मविश्वास! एकदम प्रतिष्ठीत सुखवस्तू माणूस दिसत होता. मला बरं वाटलं.
मी त्याच्याकडे पाहतो आहे, हे लक्षात येऊन, तो थोडासा लाजला. मग म्हणाला,
"शेट, मी आता गावचा सरपंच आहे. माझी शेतीवाडी चांगली चालली आहे."
मी म्हणालो, "अभिनंदन! सरपंच शोभतोयस् खरा!
पण काय रे? तुझी बहीण कशी आहे?"
तो आनंदानं म्हणाला,
"खूप सुखात आहे. दोन मुलं आहेत तिला. तिचं अपंगत्व लक्षात घेऊन, तिला जपणारा खूप चांगला नवरा मिळाला तिला."
नकळत माझ्या डोळ्यांत अश्रू आले. नरहरी माझ्याकडे आश्चर्यानं पाहात राहिला.
"दादा, काय झालं?"
मी मान हलवली आणि रुमालानं डोळे पुसले. मनात आलं, 'दादाही एक माणूस असतो, हे कधी कळेल का कोणाला?'
दादा नावाचा माणूस
अर्थात् उदय राजाराम लाड
लेखिका: शोभा बोंद्रे
नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठे: २८८
मूल्यः रुपये २७०/-

आता मुलगी पाहाणे किंवा मुलीने मला पाहणे, ह्यातला आणखी एक नमुनेदार प्रसंग!मधल्या काळात मी हॉटेलच्या धंद्याबरोबर, ट्रान्सपोर्टचा बिझनेसही नव्याने परत सुरु केला होता. मी घेतलेल्या टेंपोला आमच्या भागातल्या स्टुडिओंची बरीच भाडी मिळत होती. थोडक्यात काय, तर मी अधिक सेटल झालो होतो आणि लग्नासाठी अधिक उतावळा.

शेवटी 'तुमच्या आयुष्याची कमाई काय?' असं मला कोणी विचारलं तर मी म्हणेन,'मी माझ्या सोबत इतरही कित्येकांना वेळोवेळी चार सुखाचे क्षण दिले असतील...' तर तीच माझी खरी कमाई आहे.