Thursday, June 16, 2016

नीलू नीलिमा निलोफर

तिकडे गोल खिडकीच्या खाली बसलेल्या स्त्रियांमध्ये लग्नाबद्दल चवीनं बोलणं चाललं होतं.  सेक्रेटरीची बायको खेळकर स्वभावाची होती.  ती हसून हसून बोलत होती, "नवरा हिला स्कँडल पॉईंटवर घेऊन जाईल, आईस्क्रीम खाऊ घालेल, हिच्या केसात फुलं माळेल आणि कानात हळूच म्हणेल, 'तू माझ्या हृदयाची राणी आहेस!' यापेक्षा आयुष्यात अजून काय असतं!  मन रमवण्यासाठी तास दोन तास ज्या गोष्टी केल्या जातील त्याच खर्‍या.  बाकी सगळं खोटंच असतं हे मलाही मान्य आहे.  पण ते खोटंच खूप सुंदर असतं.  अशा खोट्या प्रेमात स्वतःला गुंतवून ठेवण्यात गैर काय आहे?"


सेठी त्या स्त्रिया काय बोलताहेत हे कान देऊन ऐकत होता.  तो झटकन म्हणाला -

आए कुछ अब्र, कुछ शराब आए |  इसके बाद आए तो अजाब आए ||

सेक्रेटरीची बायको म्हणत होती - "जर कुणी अशी माझी तारीफ केली तर मी त्याच्याबरोबर आजदेखील पळून जाईन."
"का सेक्रेटरी तुमची तारीफ करीत नाहीत?"
"तो माणूस खूप कंटाळवाणा आहे.  मला चटपटीत लोक आवडतात.  तोंड टाकून बसणारे पुस्तकी लोक मला आवडत नाहीत.  चटपटीत लोकांच्या गोड गोड बोलण्याला काही अर्थ नसेना का पण तसं बोलणं मला आवडतं."
यावर वर्माच्या पत्नीने हळूच म्हटलं, - "मुलीच्या हातात तर काहीच नाही.  फक्त काचेच्या चार बांगड्या.  नवी नवरी अशी असते का?"
"प्रवास करुन आले आहेत ना!" सेक्रेटरीची बायको म्हणाली - "प्रवासात दागिने उतरवून ठेवले असतील."
"पण पार्टीत बसताना तर दागिने घालून यायला हरकत नव्हती.... दागिने असतील तर घालणार ना!"
यावर एक स्त्री अजून खालच्या आवाजात म्हणाली - "अशी लग्नं दोन दिवसदेखील टिकत नाहीत."

सेक्रेटरीच्या बायकोने वळून पाहिलं आणि मग हात हलवत म्हणाली - "अरे, दोन दिवस ती हसली खिदळली तर काय हरकत आहे? नंतर बायकांच्या नशिबी फक्त कष्टच लिहिलेले असतात.  या वेळी तरी तो तिला बरोबर घेऊन हिंडेल फिरेल... मग ति लग्न करुन आलीय का? हे लग्न दोन दिवस तरी टिकेल का?  या सगळ्यांचं आपल्याला काय करायचंय?  मी तर म्हणते, ती पळून आली असली तरी छान आहे आणि प्रेमविवाह करुन आली असली तरी छानच आहे.  हा दोन दिवस तर तिला आनंदात हिंडवेल, फिरवेल."
"तुला असं कुणी फिरवलं नाही?"
"माझं काय विचारतेस? मी लग्न करुन आले पण पहिल्या रात्री माझा नवरा पुस्तक उघडून वाचत बसला."
बायकांच्यामधून हास्याचा फवारा उडाला.
"तेव्हापासून हा पुस्तकंच वाचतोय."
"आमचे जीजाजी पुस्तकच वाचत राहिले, मग ही तीन तीन मुलं कुठून आली?"
"मी हिंमत केली म्हणून, अजून काय? मी एका रात्री पुस्तक ओढून घेतलं आणि फरशीवर फेकून दिलं..." यावर त्या सगळ्या मैत्रिणी खळखळून हसत राहिल्या. 

*****

"माणूस चुका करतो कारण तो चुकाच करू शकतो.  चूक ही काही माहिती नाही म्हणून किंवा अनुभव नाही म्हणून घडणारी गोष्ट नाही.  माणसाच्या स्वभावातच अशी काही खोड असते की त्यामुळे त्याच्या हातून चुका घडतात.  सुधीरला नंतर पश्चात्ताप होईल की नाही हे सांगता येत नाही पण त्यानंतरही तो चुका करेलच."
"काय बोलताय?"
"प्रत्येक चुकीचं पाऊल हे विचारपूर्वकच उचललेलं असतं, हे जीवनातलं एक भयानक सत्य आहे."
"तुमचं तत्त्वज्ञान जरा बाजूला ठेवा.  आधीच बारा वाजून गेले आहेत.  म्हणून तुमच्या अशा पार्ट्यांचा मला राग येतो."
पण डॉ. गणेश यांची बुद्धी तल्लख झालेली होती. 
"ही माणसाची नियती आहे.  सुधीरने सर्व गोष्टींचा विचार करूनच लग्न केलेलं आहे."
"पण तुम्ही त्याला त्याने केलेली चूक असं म्हणता आहात.  मला मात्र ती चूक आहे असं वाटत नाही.  ते एकमेकांवर प्रेम करतात.  त्यांनी लग्न केलंय."

डॉ. गणेश यावर काही बोलले नाहीत.  ते आपल्याच विचारात खोलीत इकडून तिकडे फेर्‍या मारीत राहिले.  आता ते कितीही वेळ फेर्‍या मारू शकतात याची जाणीव त्यांच्या पत्नीला झाली.  अशा फेर्‍या मारताना त्यांना नवेनवे विचार सूचत रहातात.  फेर्‍या मारता मारता ते एखाद्या वेळी खोलीच्या मधोमध उभे रहातात.  आपला डावा हात मानेवर ठेवतात आणि डोळे फरशीवर खिळवून ठेवतात.  त्या वेळी त्यांच्या मनामध्ये कोणतातरी नवा विचार जन्म घेतो आहे हे पत्नीला समजतं.  असं उभं असताना अचानक ते मानेवर हाताने जोराने मारतात.  जणू ते डास मारतात.  त्या वेळी नव्या विचाराचा जन्म झालाय हे पत्नीच्या लक्षात येतं.  ही प्रक्रिया कितीतरी वेळ चालत रहाते.  

पत्नी पलंगावर बसली होती.  आपल्या झोपेचं खोबरं झालं असंच तिला वाटलं.  कारण आपल्या पतीच्या डोक्यात किती वेळ नवीन विचार येत रहातील हे काही सांगता येत नव्हतं. 
"प्रत्येक विचाराचं आपलं स्वतःचं म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व असतं."  डॉ. गणेश म्हणत असत - "जन्म घेतल्यावर तो नवजात अर्भकाप्रमाणे वाढू लागतो.  एखादं नवं झाड वाढावं तसा त्याचा विकास होऊ लागतो.  मग त्या विचाराला नवे नवे अंकूर फुटतात आणि तो विचार स्वतःच्या पायावर उभा रहातो."
अशा वेळी त्यांची पत्नी पलंगावर पालथी मांडी घालून गुपचूप बसून रहाते आणि एक एक विचार कसा जन्म घेतो हे पहात रहाते...  यांना हेच आवडत असेल तर तसं का होईना! कधीतरी थकून झोपतील आणि मग मलाही सुखाने झोपता येईल...  ती मनातल्या मनात विचार करत रहाते.
"एक एक विचार एकेका जिवंत माणसासारखा असतो.  फरक इतकाच की माणूस नष्ट होतो, पण विचार कधीच नष्ट होत नाही.  त्यावर काळाची धूळ जमा होईल पण तो मरत नाही.  गौतम बुद्धाचे विचार काय मेले आहेत?  गौतम बुद्ध आज आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत."
त्यांची पत्नी मनातल्या मनात म्हणते - 'पण काही विचार इतके मुर्दाड असतात की, ते जिवंत आहेत असं कुणीही म्हणणार नाही किंवा ते जन्मतःच मरून जातात.'  पण ती हे उघडपणे कधीही बोलणार नाही.  ती आपल्या विचारांची चेष्टा करतेय असंच नवर्‍याला वाटेल म्हणून ती गप्पच रहाते. 
डॉ. गणेश यांनी मानेवर हात मारला.  त्यांची पत्नी सावध झाली. 
"अंजली, मी चुकीचं काहीच सांगत नव्हतो.  आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूचा नाश करण्याची प्रवृत्ती माणसांमध्ये असते.  तो प्रत्यक्षात असं काही करीत नसेलही पण मनातल्या मनात ही प्रवृत्ती त्याला तसं करायला प्रोत्साहन देत असते."
पत्नी त्यांचं बोलणं ऐकून वैतागली.
"आतल्या आत ही प्रवृत्ती त्याला धक्के देत असते.  जाहीरपणे तो आपल्या प्रेयसीवर प्रेम करीत असतो.  तिच्यावर जीव ओवाळून टाकत असतो.  पण मनातून तो तिला कुस्करून टाकू इच्छित असतो.
पत्नीला धक्का बसला... हे कसले विचार यांच्या मनात येत रहातात?
अंधारात डॉ. गणेश त्यांच्या पलंगासमोर येऊन उभे राहिले होते. 
"फूल किती सुंदर असतं! तू ऐकतेयस ना अंजली? फुलाला पाहून लहान मुलाचा चेहरा आनंदानं फुलून येतो.  तो झटकन ते फूल उचलून घेतो.  पण नंतर तो फुलाची पाकळी तोडून टाकू लागतो.  तू कधी मुलांना अशी फुलांची हत्या करताना बघितलंयस?  जोपर्यंत तो ते फूल नष्ट करीत नाही तोपर्यंत तो ते सोडत नाही.  तो फुलाचा नाश करतो... त्याला सुंदर बाहुली द्या, तो त्या बाहुलीचे केस ओढेल, कपडे फाडेल... मी या वृत्तीबद्दल बोलतोय.  मुलाचं हे वागणं स्वयंस्फूर्त असतं.  ते मूल अजूनपर्यंत समाजाच्या नियमांच्या जाळ्यात अडकलेलं नसतं.  त्यामुळे त्याची ही वृत्ती दबलेली नसते.  म्हणूनच तो फुलाची पाकळी पाकळी वेगळी करतो.  मोठ्या माणसांचं वागणं स्वयंस्फूर्त असू शकत नाही.  त्यामुळे त्यांची ही वृत्ती समाजाच्या विधिनिषेधाच्या ढिगार्‍याखाली दडपली गेलेली असते.  पण संधी मिळताच ती आपलं विनाशकारी काम करू लागते."
त्यांचं हे बोलणं ऐकून पत्नी शहारली... यांना काय होतं कुणास ठाऊक? मग त्यांना दुसर्‍या विषयाकडे वळविण्यासाठी ती म्हणाली - "बरं झालं आपला प्रेमविवाह नाही झाला ते.  नाहीतर एखाद्या दिवशी तुम्ही माझा गळा घोटला असता." 
पण डॉक्टर गणेश बोलतच होते... "मी माणसाच्या वृत्तीबद्दल बोलतोय अंजली.  मी त्याच्या या वृत्तीवर अंकुश लावण्याची गोष्ट करीत नाहीये.  पण त्यांना बेलगाम सोडावं असंही माझं म्हणणं नाही."
"बस्स झालं.  मला आता काहीही ऐकायचं नाहीये.  रोज काहीतरी विषय घेऊन बसता.  माणसाच्या वागणुकीत दोष नाहीये, तुमच्या विचारात दोष आहे.  तुमच्या डोक्यात कसलातरी किडा आहे.  आता या आणि झोपा."
"तू तर मलाच दोष द्यायला लागलीस अंजली.  हा संशोधनाचा विषय आहे.  हा एक अद्भुत विचार मला सुचलाय असं नाही तुला वाटत?"
"तुम्ही संशोधन करीत रहा.  पण या वेळी शांतपणे झोपा.  ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण सुखी करायचा प्रयत्न करतो की, त्याची हत्या करू इच्छितो?  तुमच्या विचाराला काही शेंडाबुडखाच नसतो.  आता प्लीज झोपायला या."
अंजलीला मनातून खूप राग आला होता.  त्या प्रेमी युगुलाच्या बाबतीत विचार करताना तिच्या मनात कसले कसले विचार येत होते... एकमेकांचा हात पकडून घरातून निघून आले आहेत... आपल्या प्रेमाच्या बळावर... आणि तेही आजच्या जमान्यात... छोटीशी नाव आणि सागरांच्या मोठ्या लाटांच्या थपडा... त्यांचं मनोबल वाढवायचं तर... ह्यांना प्रेमी हत्यारा आणि प्रेमिका बळीचा बकरा दिसतेय...

नीलू नीलिमा निलोफर
मूळ हिंदी लेखक : भीष्म साहनी
मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठे - २०८
मूल्य - १९०/- रुपये.

Wednesday, April 20, 2016

दक्षिणरंग

पुंता अरीनासला येण्याची मुख्य कारणं दोन.  उत्तरेचं नॅशनल पार्क आणि इथल्या प्लाता नदीमधल्या बेटावर असणारी पेन्ग्विन पक्ष्यांची वसाहत.  'इव्हिनिंग सूट'  घातलेल्या ढेरपोट्या, गंभीर व्यापार्‍यांसारखे वाटणारे हे पक्षी आजपर्यंत फक्त प्राणिसंग्रहालयातच दिसले होते.  त्यांच्या वसाहतींवरचे निसर्गपट टी. व्ही. वर मन लावून पाहिले होते.  बर्फाच्या शुभ्र गालिच्यावर ताठ घसरत जाणारे, त्यातल्या फटीतून चटकन सूर मारून मासे पकडणारे पक्षी त्यात लाखांनी एकत्र दिसले होते.  पण चित्रात पाहणं वेगळं आणि त्यांना प्रत्यक्ष पाहणं फार वेगळं.  प्रजोत्पादनासाठी पेन्ग्विन अँटार्क्टिकाहून इथल्या नदीमधल्या बेटावर येतात.  ते पाहण्याची तीव्र इच्छा होती.  तिला पुंता अरीनासच्या विमानतळावरच शह मिळाला.

'या दिवसात कुठले पेन्ग्विन्स?'  आम्हांला भाड्याची गाडी देणारा कंपनी प्रतिनिधी म्हणाला होता, "आता त्या कॉलनीत कुणी नाही.  हा ऑगस्ट महिना.  अजून ते अँटार्क्टिकात आहेत.  उन्हाळा आला की नोव्हेंबरमध्ये ते तिकडून इकडे येतात."

या नवलाईच्या पण तद्दन बुद्दू पक्ष्यांना आता काय म्हणावं?  सध्या तिथं बर्फाच्या लाद्यांखाली पुरून बसण्यापेक्षा इथं पुंता अरीनासला नाही का यायचं?  त्यांनाही (त्या मानानं) गरम हवा मिळाली असती आणि आम्हांलाही ते पाह्यला मिळाले असते.  हे पक्षी निसर्गतः फक्त तीन ठिकाणी राहतात.  इथं अँटार्क्टिकाजवळ, न्यूझीलंडला किंवा विषुववृत्तावरच्या गालापागोस बेटांवर.  पैकी इथल्या वसाहती सर्वांत भरदार.  काळापांढरा टेलकोट घालून बो टाय लावल्यासारख्या काळ्या कंठाचे, पिवळ्या चोचींचे, ठुमकत चालणारे हे पक्षी कळपांनी बघायची हौस होती.  पण त्यांचा हंगाम कोणता हे पुता अरीनासला येऊन पोचेपर्यंत आम्हांला माहीत नव्हतं.  पेन्ग्विन्सचं वेळापत्रक अगदी चोख आखलेलं असतं. 

दरवर्षी ठीक १० नोव्हेंबरला नरांची 'पायलट टीम' नदीतून वर पोहत जाते.  हा चाचणी गट बेटावर पोहोचला, की उरलेल्यांची वाट पाहत तिथं थांबतो.  २४ नोव्हेंबरला बाकीचे नर येतात आणि तिथं असलेल्या आपल्या जुन्या बिळांचा ताबा घेऊन त्याची डागडुजी करतात.  चकचकीत दगड-शिंपांनी घरं सजवून आपापल्या माद्यांची वाट बघत असतात.  यथावकाश माद्यांचा मेळावा आला की त्यांच्या पन्नास-पन्नास हजार जोड्या जमून या बेटावर रमतात. 

पेन्ग्विन जन्मभर एकपत्नीव्रत पाळतो.  प्रत्येक जोडी ठरावीक जमीन आपल्या मालकीची समजून तिथून बाकीच्यांना हुसकावून लावते.  मग मादी तिथं दोन-तीन अंडी घालते.  नर पेन्ग्विन आदर्श पिताही असतो.  तो अंडी उबविण्यापासून मासे मारण्यापर्यंत सगळ्या कामात सिंहाचा वाटा उचलतो.  अंडी उभ्यानंच उबवावी लागतात.  बर्फासारख्या गार जमिनीवर ती ठेवली तर थंडीनं करपून जातील म्हणून ती त्यांना आपल्या पायांवर अलगद तोलावी लागतात.  उबेसाठी अंगच्या पिसांनी झाकावी लागतात.  पुढे त्यांतून पिल्लं बाहेर पडली की तो त्यांना मासेही चारतो.  पेन्ग्विनीण बाई खर्‍या सुखी म्हणायच्या. 

त्यांचा हा आदर्श संसार एप्रिलमध्ये संपतो.  मुलं मोठी होऊन स्वतःचं पाहू लागतात.  थंडीची पहिली चाहूल लागली की सगळेजण परत अँटार्क्टिकाच्या बर्फावर घसरगुंड्या खेळायला निघून जातात.  अशा या एकमार्गी निरुपद्रवी निष्पाप पक्ष्याला मारावंसं कुणाला वाटेल?

पण १५९३ साली जॉन डेव्हिस नावाच्या इंग्लिश कॅप्टननं आणि त्याच्या खलाशांनी पोटासाठी ते पाप केलं.  त्यांनी वीस हजार पेन्ग्विन्सची इथं कत्तल केली.  तोवर या निरागस पक्ष्यांना शत्रू कसा तो माहीत नव्हता.  त्यामुळे त्यांना पकडून मारणं फार सोपं होतं.  एवढे पक्षी मारून,  वाळवून, खारवून त्यांनी आपल्या परतीच्या प्रवासाची तरतूद केली.  हे झालं ऑक्टोबर महिन्यात.  डिसेंबरमध्ये त्यांचं जहाज विषुववृत्तावर पोचलं.  हवा गरम झाली आणि पेन्ग्विन्सनी सूड उगवला.

त्यांच्या खारावलेल्या मांसात बोटबोट लांबीच्या आळ्या पडल्या.  लोखंड सोडता बाकीच्या सगळ्या गोष्टी फस्त करून टाकायचा या आळ्यांनी सपाटा लावला.  कपडे, बिछाने, बुट्स, हॅट्स, चामडी पट्टे आणि खलाशांचे हातपाय जे समोर येईल ते स्वाहा होऊ लागलं.  त्यांनी बोटीचं लाकूडसुद्धा कुरतडल्यामुळे बोट बुडायची पाळी आली.  माराव्यात तितक्या जास्तच तयार. 

कर्कवृत्तापर्यंत येईतो बोटीवरच्या खलाशांना स्कर्वी रोगानं पछाडलं.  अंगावर अशी सूज आली की त्यांना झोपणंसुद्धा अशक्य झालं.  ते पटापट मरायला लागले.  शहात्तरपैकी फक्त पाचजण उरले.  त्यांचं तारू भरकटत कसंतरी इंग्लंडला पोचलं.  डेव्हिसनं स्वतःच्या डायरीत लिहून ठेवलेल्या या इत्थंभूत वृत्तांताच्या आधारे पुढे इंग्लिश कवी कोलरिजनं 'द राइम ऑफ द एन्शन्ट मॅरीनर' हे अमर काव्य लिहिलं. 

असा चित्तथरारक साहित्यिक इतिहास असलेल्या या पक्ष्यांनी दगा दिल्यावर 'कुठल्याही ऋतूत आलो तरी काहीतरी पाहायचं हुकणारच' असं मनाचं समाधान करून घेत नॅशनल पार्कच्या दिशेनं मोर्चा वळवला.   

*****

गावात 'मालव्हीनास'चं मोठं प्रस्थ.  मालव्हीनास म्हणजे 'फॉकलंड्स बेट'.  १९८२ साली त्याच्या मालकीसाठी आर्जेंटिनानं ब्रिटनशी युद्ध पुकारलं आणि सपाटून मार खाल्ला.  बेटं दोनशे वर्षं ब्रिटिश होती ती पुन्हा ब्रिटिशच राहिली.  कोट्यावधी पौंड खर्च झाल्यावर ब्रिटिश साम्राज्याचा एक चामखीळ वाचला.  टिचभर आकार आणी भयानक हवामान यांमुळे हजारो मैल दूरच्या ब्रिटनला किंवा शेजारच्या आर्जेंटिनाला ती बेटं सारखीच निरुपयोगी आहेत.  'न्यूयॉर्कर' या अमेरिकन साप्ताहिकानं या युद्धाचं यथोचित वर्णन केलं होतं - 'एका कंगव्यासाठी लागलेलं दोन टकल्यांचं भांडण.'

पण देशाभिमान ही काही और चीज असते.  त्या विजयाच्या जोरावर ब्रिटनची मार्ग्रेट थॅचर पुन्हा निवडून आली.  उलट आर्जेंटिना ती लढाई आपण जिंकल्याचा दावा करतो.  इथल्या नकाशात मालव्हीनास बेटं आर्जेंटिनाची म्हणून चितारण्यात येतात.  उश्वायाच्या मुख्य रस्त्याचं आणि प्रमुख चौकाचं नाव मालव्हीनास.  मधोमध विजयस्तंभ.  त्यावर लोखंडी जाळीत आर्जेंटियन नकाशा.  याची ब्रिटनला दखल आहे की नाही कोण जाणे.  कदाचित त्याकडे जाणूनबुजूनही काणाडोळा केलेला असेल.  कारण फॉकलंड्स बेटावर सारे मिळून तीस रहिवासी.  तेवढ्यासाठी पुन्हा युद्धाची खिटखिट नको.  त्या चौकाचे, पाट्यांचे आणि नकाशाचे फोटो आमच्या इंग्लिश मित्रांना खिजविण्यासाठी खास काढून घेतले आणि पुढे निघालो.  

*****
टँगो डान्स ही आर्जेंटिनानं जगाला दिलेली देणगी आहे.  तो चुकवणं म्हणजे केरळात जाऊन कथ्थकली न पाहणं.  रात्री तिथल्या एका नावाजलेल्या क्लबमध्ये गेलो.  तिकिटं भरपूर महाग.  तरी ते छोटं सभागृह गच्च भरलेलं होतं.  अ‍ॅकॉर्डियनच्या वरखाली उडणार्‍या बेलाग सुरावटींवर हिंदकाळत होतं.  खुर्चीशी खिळवून टँगो-नृत्य पाहण्यासाठी सगळे अधीर झालेले. 

जाळीदार काळ्या कपड्यातल्या सडपातळ नर्तिका आणि काळ्यापांढर्‍या टेलकोट्समधले, पोमेड लावून उलट्या फिरवलेल्या तुकतुकीत केसांचे नर्तक स्टेजवर आले.  वाद्यांच्या उत्कट साथीत त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली.  त्यांच्या हालचाली धीट, आक्रमक, उत्तेजक आणि उन्मादक.  स्त्री-पुरुषांनी मिठीत येऊन तोंडमिळवणी करत नाचायचं.  मांड्यांपासूनचे पाय इतके एकमेकांत की नाचताना घोटाळा होऊन एकाची टाच दुसर्‍याला कशी ठोकरत नाही याचं आश्चर्य वाटावं.  प्रत्येक पदन्यास कडक.  बाहुपाशात येतायेता दूर व्हायचं.  चुंबनाला आतुरलेले ओठ, पण ते कधीच मिळत नाहीत.  चेहर्‍यावर अनावर, अगतिक प्रेमाची अतीव दुखरी भावना उफाळून येत होती.  नाचण्यात कमालीची चपलता.  जोडीदारणीला बाहुलीसारखी उचलून उलटीसुद्धा फिरवत होते.  दोन तास दहा जोडप्यांनी आणि टँगोच्या त्या विशिष्ट सुरावटींनी पार भारून टाकलं.

मूळचं हे नृत्य समाजाच्या तळातल्या वर्गाचं आणि वेश्यावस्तीतलं.  पण विसाव्या शतकात त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली कार्लोस गार्डेल या नर्तकानं.  कुमारी मातेच्या पोटी जन्मलेल्या या निर्वासित फ्रेंच मुलानं काबाडकष्ट करत ते शिकून घेतलं आणि आपल्या नाचगाण्यानं ब्वेनोझायरेसमधल्या तरुण पिढीला वेड लावलं.  ते नृत्य न्यूयॉर्क-लंडन-पॅरिसपर्यंत पोहोचवलं.  त्याला जगभर मान्यता मिळाल्यानंतरच कुठे आर्जेंटिनातल्या ढुढ्ढाचार्यांच्या माना हलल्या.  टँगो शिष्टसंमत समजलं गेलं.  १९३५ मध्ये विमान अपघातात गार्डेल वारला.  पण त्याला अजून जिवंत असल्यासारखा मानतात.  दुपारी लाव्हाले रस्त्याच्या कोपर्‍याकोपर्‍यावर भेटत होता तो देखणा हसरा चेहरा गार्डेलचा.  एल्व्हिस प्रेज्लीसारखा त्याच्या चाहत्यांचा इथं फार मोठा संप्रदाय आहे. 

क्लबबमधून बाहेर पडलो तेव्हा साडेदहा वाजले होते.  पाहिलेल्या नाचानं मंत्रमुग्ध झाल्यानं आपणही चार पावलं टाकून पाहावीत अशी वर्षा आशूला तीव्र इच्छा झाली.  अशा नवशिक्यांसाठी असलेल्या क्लबमध्ये त्यांना जायचं होतं.  मी एकटीच हॉटेलमध्ये परत यायला निघाले.  टॅक्सीत बसवून देताना आशूनं पाच आणि दोन डॉलर्सची एकेक नोट माझ्या हातावर ठेवली.  मी एकटी निघाले खरी पण मनात अस्वस्थ होते.  नवखं शहर.  अनोळखी रस्ते.  हॉटेल कुठे आहे कोण जाणे.  आपल्याला खूप फिरवलं तर? किंवा भलतीकडेच नेलं तर? निरखून बाहेर बघत होते.  येताना पाहिलेल्या काही खुणा दिसताहेत का त्याचा अंदाज घेत होते. 

काही विपरीत न घडता लगेच हॉटेलवर पोहोचले.  टॅक्सी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला अंधारात उभी राहिली.  मीटरवर तीन डॉलर्स झाले होते म्हणून मी पाच डॉलर्स टॅक्सी ड्रायव्हरच्या हातात देऊन मोडीची वाट पाहत असताना त्याने आणखी पैशासाठी हात पुढे केला.  मी खुणेनं कसले म्हणून विचारताच त्यानं त्याच्या हातातली दोन डॉलर्सची नोट दाखवली.  तेव्हा आशूनं चुकून मला दोन्ही दोन डॉलर्सच्या नोटा दिल्या असाव्यात अशा समजुतीनं मी दुसरी नोट त्याच्या हाती ठेवली.  एक डॉलर टिप दिलीसं समजून मी बाहेर पडले पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.

दुसर्‍या दिवशी मी आशूला विचारलं.  त्यानं मला सात डॉलर्सच दिले होते.  टॅक्सी ड्रायव्हरनं हातचलाखी करून माझ्या पाचाच्या जागी दोनची नोट दाखवली होती.  अंधाराचा आणि माझ्या भांबावण्याचा फायदा घेऊन मला हातोहात फसवलं होतं.  दक्षिण अमेरिकेत हातचलाखीच्या अशा लांड्यालबाड्या खूप चालतात.  सुदैवानं त्यांची ही एकच चुणूक मला मिळाली.  

*****

पुढच्या खडकाळ कड्यालगतच्या दगडांवर अ‍ॅल्बट्रॉस पक्षी वस्तीला होते.  समुद्राचा राजा असलेल्या या मोठ्या पक्ष्याला उडण्याच्या सुरुवातीला उंच कड्याचा आधार लागतो.  त्याला जमिनीवर भरभर पळून वेग घेता येत नाही.  कड्याच्या शेवटी उडी मारून उड्डाण करावं लागतं.  अशी एकदोन उड्डाणं बघायला मिळाली. 

पाचफुटी पंखांचा एवढा प्रचंड पक्षी कड्यावरून टुणकन उडी मारून झेपावतो.  पण त्याला त्याची भीती वाटत असावी.  कड्याच्या टोकाला बराच वेळ तो 'उडू की नको' या संभ्रमात बसलेला दिसतो.  इतर पक्षी पुटकन येतात नि उडून जातात, हा तिथेच.  पण एकदा झेप घेतली की या सर्वात मोठ्या समुद्रपक्ष्याचं शुभ्रपंखी देखणेपण मोहून टाकतं.  तो दिसेनासा होईतो डोळे त्याचा पाठलाग करत राहतात. 

त्याची आणखी मोहक गोष्ट म्हणजे त्यांचं प्रियाराधन.  डावीकडे चिल्लर झुडुपांतून गेलेली एक पायवाट होती.  तिथं ते बहराला आलं होतं.  गळ्यात गळा घालणं काय, पंख फुलवणं काय, चोचीत चोच काय, विचारू नका.  तासतासभर त्यातच गुंग.  आम्ही आसपास आहोत याचं भानही नाही.  हाईडपार्कमधल्या मानवी युगुलांची आठवण येत होती.  फारच रोमँटिक.  वर्षातून अंडी एकदाच घालतात.  मीलन मात्र सारखं. 

त्यांच्या ५०-५५ वर्षांच्या सहजीवनासाठी हे पक्षी एकदाच आणि एकच जोडीदार निवडतात.  जोडप्यापैकी नर वा मादी कुणीही आधी मेलं की दुसरा अन्नपाण्याचा त्याग करून थोड्या दिवसांत तीच वाट धरतो.  एक पति-पत्नीव्रताचं हे काटेकोर पालन ऐकून माझा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो न दुणावतो तो मार्टिननं त्यांच्याबद्दलचं आणखी एक सत्य सांगितलं. 

जमिनीवरील प्रजननाचं काम डिसेंबरमधे संपलं की जानेवारी ते एप्रिल हे चार महिने अ‍ॅल्बट्रॉस पक्षी समुदावर काढतात.  डिसेंबरच्या अखेरीचं हे घाऊक प्रयाण बघण्यासारखं असतं.  लढावू विमानं जशी धावपट्टीवरून लागोपाठ सुटतात तसे हे एकूण एक पक्षी कड्यावरून झेप घेत आकाशगामी होतात.  एप्रिलमध्ये परतताना आधी मोठे नर, मग त्यांच्या माद्या, मग या मोसमातले नवे नर आणि सरतेशेवटी नव्या माद्या या क्रमानं येतात.  एकेका आठवड्याला एकेक गट इथं उतरतो. 

आधीचे तीन महिने समुद्रावर काढल्यानं त्यांच्या पंखांचे स्नायू तयार झालेले असतात.  पण वापरले न गेल्यानं पायांचे कमजोर होतात.  खडकांवर उतरणं त्यांना कठीण होतं.  ते कोलमडतात.  धडपडतात.  खुरडत खुरडत पुढे सरकतात.  पण लवकरच सावरतात.  आतापर्यंत ते जमिनीला चांगले सरावलेले असतात.  तरुण माद्यांचा हा शेवटचा गट आला की हे नर त्यांच्यावर झडप घालून, त्यांना हलता येत नसण्याच्या स्थितीत त्यांचा यथेच्छ उपभोग घेतात आणि पुन्हा आपलं 'एकपत्नीव्रत' पाळायला साळसूदासारखे निघून जातात.  ते असं का करतात या कोड्याचं उत्तर जीवशास्त्रज्ञांना सापडत नाही.  - पुरुष! दुसरं काय? 

*****

लेखिकेचं हे प्रवासवर्णन अतिशय वाचनीय आणि थक्क करून सोडणारं आहे.  विशेषतः यात स्थळवर्णनाबरोबरच अगदी सहजपणे त्या स्थळाची ऐतिहासिक, भौगोलिक आणि जैवविविधतेची माहिती ही तर केवळ अविश्वसनीय वाटावी अशीच कमालीची रंजक आहे.  दोनशे पंच्याण्णव पानांचं हे पुस्तक एकदा हाती घेतलं की एका बैठकीत संपूर्णतः वाचून काढल्याखेरीज खाली ठेवलं जात नाही. 

पण...

इतक्या लांबच्या प्रदेशांत जाऊन आपण या माहितीची सत्यासत्यता तपासू शकत नाही.  लेखिकेवर पूर्णतः विसंबून राहण्याखेरीज आपल्याला गत्यंतर नाही.  तसा विश्वास वाचक टाकतोही पण अचानक एके ठिकाणी या विश्वासालाच तडा जातो.  रीओ द जनैरो - ब्राझिल इथल्या येशूच्या भव्य पुतळ्याशी तुलना करताना लेखिका जेव्हा श्रवणबेळगोळ येथील महावीराचा पुतळा असा उल्लेख करते तेव्हा या अज्ञानाविषयी एकाच वेळी आश्चर्य, खेद, संताप आणि कणव या भावना दाटून येतात.  श्रवणबेळगोळ येथील पुतळा महावीरांचा नसून गोमटेश्वर बाहुबलीचा आहे हेदेखील इतकी प्रचंड भटकंती केलेल्या या लेखिकेला ठाऊक नसावं?  महावीर हे जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर.  तर बाहुबली हा पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचा पुत्र.  आपला ज्येष्ठ बंधू भरत याला बाहुबलीने केवळ प्रचंड शारिरीक बळावर द्वंद्वात हरविलं आणि नंतर वैराग्य येऊन उभ्यानेच एक तप (बारा वर्षे) साधना केली.  या बारा वर्षांत त्यांच्या कमरेपर्यंत वेली चढल्याचंही पुतळ्याच्या रचनेत स्पष्ट दिसतं.  तसेच बाहुबली हा त्याच्या प्रचंड आकाराकरिता प्रसिद्ध असल्यानेच हा तब्बल सत्तावन्न फुटी पुतळा उभारण्यात आला आहे.  श्रवणबेळगोळला भेट देतेवेळी लेखिकेला इतकी सामान्य व सर्वज्ञात माहिती मिळू शकली नाही काय?  पुतळ्याच्या शरीराचा आकार आणि भोवती लगटलेल्या लतावेली या कशाचेही महावीरांशी काहीच साम्य नाही, शिवाय काळही अत्यंत वेगळा.  भारतातल्या एका सुप्रसिद्ध स्थळाविषयी लेखिकेला इतकी चुकीची माहिती असेल तर मग या दूरच्या प्रदेशाविषयी लेखिकेने दिलेल्या माहितीवर विश्वास तरी कसा ठेवावा? 

असो.  अज्ञान प्रकट करून लेखिका थांबली असती तरी एकवेळ समजून घेता आले असते.  परंतु इथे तर लेखिकेने आपला एका समाजाविषयीचा आकसच जाहीर रीत्या प्रकट केला आहे.  शीखांना एक्वादोरमध्ये कुठलेही नागरिक असले तरी अजिबात प्रवेश नाही हे समजल्यावर कोणा व्यक्तीला तिच्या धर्मासाठी असं अडवणं हे लेखिकेला पटत नसल्याचं ती नमूद करत असली तरी स्वतः मात्र मारवाडी समाजाविषयी नकारात्मक मतप्रदर्शन सहज करते.  लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाना "मारवाडी रंग" म्हणून नाक मुरडण्याचा उल्लेख पुस्तकात चक्क वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा येतो.  हे वाचताना निश्चितच खटकते. 

दक्षिणरंग
मीना प्रभु
पुरंदरे प्रकाशन
मुल्य रु.३००/-

Saturday, March 12, 2016

मिरवणूक आणि लोकशाही

मिरवणूक हा खरं तर खाजगी असला तरी एक सार्वजनिक सोहळाच असतो आणि तो साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या थरातल्या माणसांची, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मदत लागते.  म्हणजे बँडवाले लागतात, वाजंत्री लागतात, घोडेवाला लागतो, रांगोळ्या काढणारे लागतात, सजावट करणारे लागतात, ट्रक टेम्पोवाले लागतात, टेम्पो सजवणारे फूलवाले लागतात, गुरुजी लागतात, पोलीस लागतात, कार्यकर्ते लागतात, नाचणारे लागतात, चालणारे लागतात,फटाके फोडणारे लागतात आणि मिरवणूक बघणारेही लागतात.

मिरवणुकीची आणखी एक गंमत असते.  मिरवणूक कुणी काढलीय, ती कोण चालवतोय, हे मिरवणूक पाहून कळत नाही.  ती पुढे कोणत्या वाटेनं जाणार, हे तर खूपदा मिरवणुकीतल्या लोकांनाही माहीत नसत;  पण कुणीतरी पडद्याआडच्या माणसानं ती आखणी आधीच केलेली असते.  त्यासाठी माणसं आणि साधनं विकत घेतलेली असतात.  आमंत्रणं-निमंत्रणं देऊन पोलीस, कार्यकर्ते, मित्रमंडळी बोलावलेली असतात, कामगार बोलावलेले असतात आणि मिरवणूक छान चाललेली असते.  पाहताना असं वाटतं, की ती स्वतःच चाललीय आनंदात तल्लीन होऊन - एकदिलानं, एकमतानं ठरवल्यासारखी, आपसूक, कुणीही न सांगता;  पण खरं तर तसं नसतं.  मिरवणूक - मग ती कसलीही असो - तिचा कर्ताकरविता कुणी वेगळाच असतो.  आपल्या लोकशाहीसारखीच असते ती एका अर्थानं.  सगळ्यांना वाटत असतं की ती आपणच चालवतोय किंवा चालतेय सगळ्यांच्या मतानं;  पण ती चालवणारे कुणी दुसरेच असतात, मोजके, पडद्यामागे. 

कथा:- झुंबर
लेखकः- किरण येले
हंस दिवाळी २०१५

Sunday, July 27, 2014

तुम्हाला पुणेकर व्हायचं का?

...आता तुम्हाला पुणेकर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो.

पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत, उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.अमेरिकेची आर्थिक आघाडी- ठोका.

दिवसातून एकदा तरी "चक चक पूर्वीचे पुणं राहिलं नाही, पूर्वीचे पुणं राहिलं नाही" हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, आमच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, कचेरी, ओमकारेश्वर, पेनशनर मारुतीची टेकडी, मंडई आणि शिशुविहार, कुठेही ऐकायला मिळेल, "आमच्या वेळी ते तस नव्हतं!"

मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. त्यात शुद्ध मराठी या नावाची एक पुणेरी बोली आहे. आता ह्या बोली मध्ये व्यासपीठावरची पुणेरी, घरातली पुणेरी, दुकानदाराची पुणेरी, ह्यातला फरक नीट समजावून घेतला पाहिजे. आता खासगी पुणेरी बोली भाषा आणि जाहीर बोली भाषा ह्यातल्या फरकाचा एक उदाहरण पहा. अशी कल्पना करा, की कोणीतरी एक प्राध्यापक भांबुर्डेकर हे प्राध्यापक येरकुंडकराबद्दल स्वतःच्या घरी बोलतायत:

"बोंबला! या यारकुंडवारशास्त्र्याचा सत्कार! च्यायला, येरकुंडकारचा सत्कार म्हणजे कमाल झाली. वास्तविक जोड्‍याने मारायला हवा याला. ऋग्वेदाचे भाषांतर म्हणे! कमाल आहे! अहो ऋग्वेदाचा बट्ट्याबोळ! आणि ह्यांना च्यायला सरकारी अनुदानं, पन्नास-पन्नास हजार रुपये!"
पुणेरी मराठीतून संताप व्यक्त करायला दुसर्‍याला मिळालेले पैसे, हा एक भाषिक वैशिष्ठ्याचा नमुना मानावा लागेल.

"ओढा! ओढा लेको पैसे! करा चैन! खा! रोज शिकरण खा! मटार उसळ खा!". अगदी चैनीची परमावादी. पुणेरी मराठीत इकडेच संपते- शिकरण, मटार उसळ वगेरे. "आहो! आहो चक्क वीस-वीस रुपये मिळवले" हे वाक्य वीस वीस लाख मिळवले ह्या ऐटीत उच्चारावे.
"आणि ह्यांचा म्हणे सत्कार करा! ह्यांना श्रीफळे द्या!" पुणेरी मराठीत नारळाला 'श्रीफळ' म्हणतात, आणि चादरीला 'महावस्त्र'

आता ह्याच खासगी पुणेरी बोलीचे जाहीर बोली भाषेतील रुपांतर पहा. हाच प्राध्यापक, ह्याच गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार.

"गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार, म्हणजे साक्षात विद्द्वात्तेच्या सूर्याचा सत्कार! मित्रहो, आजचा दिवस, पुणे महानगराच्या सांस्कॄतिक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हे माझे गुरु...म्हणजे मी त्यांना गुरूच मानत आलो आहे, ते मला शिष्य मानतात का नाही, हे मला ठाऊक नाही." इथे हशा. सार्वजनिक पुणेरी मराठी मध्ये, व्यासपीठावरच्या वक्त्यांनी तिसर्‍या वाक्यात जर हशा मिळवला नाही, तर तो फाउल धरतात. तेव्हा होतकरू पुणेकरांनी जाहीर पुणेरी बोलीचा अभ्यास करताना हे नीट लक्षात ठेवायला पाहिजे.

"आता, एका परीने तसा मी त्यांच्या शिष्यच आहे- कारण, ते मुन्सिपलाटीच्या शाळेत शिक्षक असताना, मी पहिल्या इयत्तेत त्यांचा विद्यार्थी होतो." म्हणजे, येरकुंडकर प्रोफेसर, हा एकेकाळी मुन्सिपालटी शाळामास्तर होता, हे जाता जाता ध्वनित करून जायचं.
"त्यांचे तीर्थरूप, सरदार पंचापात्रीकारांच्या वाड्यातील आहार विभागात सेवक होते." म्हणजे तिकडे वाड्यावर स्वयंपाकी होते, हे सांगून मोकळे व्हायचे.
"असो! अत्यंत दारिद्र्यात बालपण घालवल्यानंतर आता अरण्येश्वर कॉलनीतल्या आपल्या प्रशस्त बंगल्यात राहताना प्राध्यापक येरकुंडकरांना किती धन्यता वाटत असेल!" म्हणजे विद्वत्तेच्या नावावर पैसा कसा ओढला बघा! हे आलं त्याच्यामध्ये.

"प्राध्यापक येरकुंडकर, आणि आपले शिक्षण मंत्री, एकाच शाळेत शिकत असल्यापासूनचे स्नेही आहेत."- म्हणजे वशिला कसा लागला!

सार्वजनिक पुणेकर व्हायचे असेल, तर जाहीर पुणेरी मराठीचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल.
आता दैनंदिन व्यावहारिक पुणेरी शुद्ध मराठी बोलीला मात्र अनेक पैलू आहेत. त्यामुळे रोजच्या व्यवहारात देखील ही बोली वापरताना, वाक्यरचनेकडे नीट लक्ष द्यायला हवे. आता हेच बघा ना, टेलीफोन रिसीवर उचलल्यानंतर, "हेलो, हेलो", असे म्हणावे, हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण पुणेरी शुद्ध मराठीत, "हेलो" याच्या ऐवजी, दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला जो एक नैसर्गिक तुसडेपणा येत असतो, तो आणून, "हेलो" म्हणण्याच्या ऐवजी "कोणे?" असे वस्‌कन ओरडायचे. म्हणजे टेलीफोन‍ करण्याप्रमाणे ऐकण्यालादेखील पैसे पडले असते, तर माणूस जसा वैतागला असता, तसे वैतागायचे. मग तिकडून विचारतो कोणीतरी, " आहो, जरा प्लीज गोखल्यांना बोलावता का?" असं विचारलं रे विचारलं की पुण्याबाहेरचे तुम्ही आहात, हे पुणेरी पोर देखील ओळखेल. त्याच्या ऐवजी, "गोखल्यांना बोलवा" असा इथून हुकुम सोडायचा. मग पलीकडून आवाज येतो, "अहो इथे दहा गोखले आहेत! त्यातला कुठला हवाय?"

"तो कितवा तो मला काय ठाऊक! LIC मध्ये झोपा काढायला जातो त्याला बोलवा!!"
मग इकडून आवाज ऐकू येतो, " अरे गणू! इथे तुझ्यासाठी फोनवर कोणीतरी पेटलाय रे!" "च्यायला, ह्या गण्याचे दिवसाला शंभर फोन." हे सुद्धा आपल्याला ऐकू येते.

पुणेकर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. तो शिवछत्रपती किंवा लोकमान्य टिळकांचाच असला पाहिजे, असं मुळीच नाहीये. म्हणजे आपल्या अळीचा गणपती विसर्जनाच्या दिवशी रांगेत कितवा जावा, इथ्पासून पुणेरी गावरान शेंग ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे टिळक पुण्यातीथीच्या दिवशी आगरकरांविषयी चा जाज्ज्वल्य अभिमान, क्रिकेट च्या टेस्ट च्या वेळी देशी खेळांविषयीचा जाज्ज्वल्य अभिमान- अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून पुण्याचे संपूर्ण नागरिकत्त्व मिळत नाही. अधून मधून वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये एक पत्र पाठवावे लागते. त्यासाठी पत्रलेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे.

पुणेकर होण्यासाठी सायकल चालवणं, ही क्रिया एक खास कला म्हणूनच शिकायला हवी. सायकलवर बसता येणं, म्हणजे पुण्यात सायकल चालवता येणं, हे नाही. "चालवणे" इथे हत्त्यार चालवणे, किंवा चळवळ चालवणे, अशा अर्थाने वापरलं पाहिजे. सायकलचा मुख्य उपयोग, वाहन म्हणून न करता वाहत्या रस्त्यात मध्यभागी कोंडाळे करून गप्पा मारताना ’टेकायची सोय’ म्हणून करायला हवी. यातूनच पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचे शिक्षण मिळते! त्याचप्रमाणे, पाहुणे नामक गनीम येतात, त्यांना वाड्यामध्ये सहजासहजी एकदम प्रवेश मिळू नये, यासाठी मुख्य प्रवेशद्वारात सायकलींची बॅरीकेड रचता यायला हवी. त्या ढिगार्‍यातून नेमकी आपलीच सायकल बाहेर काढता येयला हवी. सायकल, हे एकट्याने बसून जायचे वाहन आहे, हे विसरायला हवे. किमान तिघांच्या संख्येनी, रस्त्याच्या मधून गप्पा मारत मारत जाता आले पाहिजे. नजर समोर न ठेवता, फुटपथावरील चालत्या-बोलत्या आणि इतर प्रेक्षणीय स्थळांच्या तिथे येणे जाणे चालू असतं तिथे ( --> ) असं पाहिजे. सायकल ला घंटी,दिवा, ब्रेक हे वगैरे असणं, हे म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे.

अशा रितीने पुणेकर होण्यातल्या प्रथम, द्वितीय, वगैरे परीक्षा उत्तीर्ण होत होत सार्वजनिक पुणेकर होण्याची पहिली परीक्षा म्हणजे कुठल्यातरी सौस्थेंच्या कार्यकारी मंडळामध्ये तिथे शिरायची धडपड सुरु ठेवायची. उगीचच काहीतरी, "श्रीमंत दुसरे बाजीराव साहेब ह्यांचे शुद्धलेखन" किंवा "बाजरीवरील कीड" असल्या फालतू व्याख्यानांना जाऊन सुद्धा हजेरी लावायची,आणि व्याख्यानानंतर, त्या व्याख्यात्याला भेटून "... या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायचीये" , असे चारचौघात म्हणून टाकावे . हा हा म्हणता आपण खासगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर होऊन जाल!

आता पुण्यात राहून दुकान वगैरे चालवायची इच्छा असेल, तर पुणेरी मराठी बोलीचा फारच अभ्यास वाढवायला लागेल. तरच किमान शब्दात गिर्‍हाईकाचा कमाल अपमान करता येईल. ती भाषा आली पाहिजे. कारण पुण्यात दुकान चालवणे, हे सायकल चालवणे, ह्या अर्थी चालवणे आहे. दुकानदारांनी गिर्‍हाईकावर सत्ता चालवायची असते. दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते. पुढे ते सिंध्या-बिन्ध्याला विकावे. जागेच्या पगडीत उरलेल्या आयुष्याची सोय होते, आणि आपण , "महाराष्ट्र व्यापारात मागे का?" या विषयावर भाषण द्यायला मोकळे!

थोडक्यात म्हणजे पुणेकर व्हायचं असेल, तर म्हातारपणाच्या सत्त्काराच्या दिशेने वाटचाल करायचा धोरण सांभाळावे लागते.

- पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)

Wednesday, July 23, 2014

लॉज ३४१ वर

"सध्यातरी शिल्लक रक्कम बर्‍यापैकी आहे." ट्रेझरनं पुढ्यात असलेल्या बॅंकबुकावर नजर टाकून माहिती दिली.  "अलीकडे फर्म्स बर्‍यापैकी उदार झाल्या आहेत.  मॅक्स लिंडर ऍंड कंपनीनेच पाचशे दिले आहेत.  वॉकर ब्रदर्सने शंभर पाठवले होते पण मी ते परत केले आणि पाचशे मागितले आहेत.  बुधवारपर्यंत मला त्यांच्याकडून काही समजलं नाही तर त्यांचे बाईंडिंग गिअर्स कामातून जातील.  गेल्या वर्षी आपल्याला त्यांचे ब्रेकर जाळावे लागले तेव्हा ते सुतासारखे सरळ आले.  वेस्ट सेक्शन कंपनीने आपली वार्षिक वर्गणी पाठवली आहे.  सध्या तरी आपल्या सार्‍या गरजा भागवता येतील एवढा पुरेसा पैसा शिल्लक आहे."
"आर्ची स्विंडनचं काय झालं?" एका ब्रदरनं प्रश्न केला.
"त्यानं आपली सारी मालमत्ता विकली आणि जिल्हा सोडून गेला.  जाता जाता थेरडा चिठ्ठी ठेवून गेला की इथे ब्लॅकमेलर्सच्या गराड्यात मोठा खाणमालक म्हणून मिरवण्यापेक्षा आपण न्यूयॉर्कमध्ये राहून तिथे रस्ते साफ करण्याचं काम मोठ्या खुशीनं करू.  तो चिठ्ठी आपल्या हाती पडण्यापूर्वीच इथून पसार झाला हे त्याच्या दृष्टीनं बरं झालं नाहीतर...? मला वाटतं पुन्हा तो या भागात तोंड दाखवण्याची हिंमत करणार नाही."
एवढ्यात टेबलाच्या दुसर्‍या टोकाजवळ असलेला एक प्रौढ इसम चेअरमनकडे तोंड करून उभा राहिला.  त्यानं आपली गुळगुळीत दाढी केली होती आणि चेहर्‍यावरून शांत व समंजस वाटत होता.
"मि. ट्रेझरर," तो म्हणाला, "मी एक प्रश्न विचारू का? आपण या जिल्ह्यातून हाकलून लावलेल्या त्या इसमाची मालमत्ता कुणी खरेदी केली?"
"होय, ब्रदर मॉरीस, ती मालमत्ता स्टेट ऍंड मर्टन कौंटी रेलरोड कंपनीनं विकत घेतली."
"याच पद्धतीनं गेल्या वर्षी टॉडमन आणि ली यांची मालमत्ता बाजारात आली होती, ती कुणी घेतली?"
"त्याच कंपनीनं घेतली ब्रदर मॉरीस!"
"त्याचप्रमाणे मॅन्सन, शूमन व्हॅन देहरे आणि ऍटवुड यांचे लोखंडाचे कारखाने विक्रीला निघाले होते ते कुणी घेतले?" 
"ते सारे वेस्ट गिल्मर्टन जनरल मायनिंग कंपनीनं घेतले."
"तुम्ही हे सारं कशासाठी विचारता हे मला कळत नाही ब्रदर मॉरीस."  चेअरमन म्हणाला.  "ते कुणी विकत घेतले याच्याशी आपल्याला काय देणंघेणं आहे.  ते कुणीही हा उद्योग जिल्ह्याबाहेर तर घेऊन जाणार नाहीत?" 
"माफ करा चेअरमन, पण मला वाटतं आपल्या दृष्टीने या घटनांशी अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा संबंध आहे.  गेली दहा वर्षे ही परंपरा चालू आहे.  आपण छोट्या-छोट्या व्यावसायिकांना इथून हाकलून लावत आहोत.  त्याचा परिणाम काय होतो?  त्याची जागा रेलरोड किंवा जनरल आयर्नसारख्या बड्या कंपन्या घेतात.  त्यांचे संचालक न्यूयॉर्क किंवा फिलाडेल्फियाला राहतात.  ते आपल्या धमक्यांना जराही भीक घालत नाहीत.  आपण फार तर त्यांच्या स्थानिक प्रमुख अधिकार्‍यांना हाकलवू शकतो पण त्यामुळे काय होतं?  त्यांच्या जागी दुसरे नवे अधिकारी येतात.  अशा तर्‍हेनं आपण आपल्यालाच मोठा धोका निर्माण करून घेत आहोत.  छोट्या माणसांकडून आपल्याला कसलाच धोका नसतो. त्यांच्याजवळ पैसा नसतो की ताकद नसते.  आपण त्यांचा पिळून अगदी चोथा करीत नाही तोपर्यंत ते इथेच राहणार आणि आपल्या धाकात राहणार.  मात्र आपण या मोठ्या कंपन्यांच्या दृष्टीनं त्यांच्या नफा मिळवण्याच्या मार्गातले अडथळेच ठरू.  ते पैसा खर्च करायला मागेपुढे बघणार नाहीत की चिकाटी सोडणार नाहीत.  ते आपल्या मागे कायद्याचं शुक्लकाष्ठ लावतील आणि आपल्याला कोर्टात खेचतील."
त्याचं ते अभद्र बोलणं ऐकून सर्वत्र एकदम स्मशानशांतता पसरली.  सर्वांचे चेहरे काळवंडले.  आपापसात सूचक नजरानजर झाली.  हे विचार इतके स्पष्ट होते, इतके ताकदवान होते की त्यांना आव्हान देणं शक्यच नव्हतं.  त्यांच्या मनात आपल्या गैरकृत्यांबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा विचार यापूर्वी कधीही आला नव्हता.  आता मात्र भीतीची थंडगार लाट सर्वांच्याच देहातून शिरशिरी आणून गेली.
"माझी एक सूचना आहे." तो ब्रदर पुढे बोलू लागला. "आपण त्या छोट्या उद्योजकांवरचं ओझं थोडं कमी करूया!  ते सारेच्या सारे या विभागातून बाहेर पळतील त्या दिवशी आपल्या संघटनेची ताकद पार धुळीला मिळालेली असेल."  
उघडपणे एवढं परखड सत्य ऐकवणं कुणालाच आवडत नाही.  सर्वांच्या संतापानं भरलेल्या नजरा झेलतच तो वक्ता परत आपल्या जागेवर बसला.  मॅकगिंटी त्याला उत्तर देण्यासाठी उभा राहिला तेव्हा त्याच्या कपाळावरही आठ्या दिसत होत्या.
"ब्रदर मॉरीस," त्यानं सुरूवात केली, "सतत रडत राहण्याची तुला सवयच आहे.  लॉजचे सर्व सभासद एकजुटीनं ठामपणे उभे आहेत तोपर्यंत संपूर्ण अमेरिकेत त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत होणार नाही.  आतापर्यंता आपल्याला अनेक वेळा कोर्टात खेचण्यात आलं नाही का?  मला वाटतं या मोठ्या कंपन्याही छोट्या कंपन्यांप्रमाणे आपल्याविरुद्ध लढा देण्याऐवजी पैसा खर्च करणंच जास्त पसंत करतील, आणि बंधूंनो आता" -बोलता-बोलता मॅकगिंटीनं आपल्या डोक्यावरची मखमली काळी टोपी आणि गळ्याभोवती गुंडाळलेला पट्टा काढून टाकला- "लॉजसमोर आज संध्याकाळि चर्चेसाठी असणारे विषय संपले आहेत.  आता फक्त एक गोष्ट बाकी आहे त्यावर आपण जाताजाता विचार करुया!  आता थोडंसं खाणं-पिणं आणि मजा करणं!" 

 माणसांचे स्वभावसुद्धा किती विचित्र असतात.  खूनखराबा या मंडळींच्या रक्तातच भिनलेला.  एखाद्या परिवारातल्या कर्त्या पुरूषाला पोहोचवणं, त्यांची रडणारी पत्नी, असहाय्य मुलंबाळं यांची जराही पर्वा न करता अथवा दयामाया न दाखवता आपली पाशवी कृत्यं पार पाडणं यांच्या हातचा मळ.  तरीही एखादं शोकगीत ऐकून मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी येत होतं.  मॅकमर्डोचा आवाज चांगलाच भारदार आणि तितकाच गोड होता.  यापूर्वी त्याला लॉजच्या सर्व सभासदांची मनं जिंकता आली नसली तरी यावेळी मात्र तो कमी पडला नाही.  पहिल्या रात्रीच त्यानं आपल्या सर्व भाऊबंदांची मनं जिंकली आणि आपल्या संघटनेत पुढे जाण्याच्या दृष्टीनं चांगलीच प्रगती केली.  चांगला सहकारी आणि उत्तम फ्रीमन होण्याच्या दृष्टीनं अनेक पात्रता अंगी असाव्या लागतात.  आपल्याजवळ त्या आहेत हे त्यानं त्या संध्याकाळी सिद्ध करून दाखवलं.  व्हिस्कीच्या बाटल्या या हातातून त्या हातात अशा पुढे सरकत होत्या.  सारे सभासद हास्यविनोदात गर्क झाले होते.  याच धामधूमीत बॉडीमास्टर पुन्हा एकदा बोलण्यासाठी उठून उभा राहिला.
"मित्रांनो," तो म्हणाला, "या गावातला एक इसम विनाकारण हात धुऊन आपल्या मागे लागला आहे.  त्याबद्दल त्याला कसा धडा शिकवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे.  मी 'हेरॉल्ड'च्या जोस स्टॅंगरबद्दल बोलतो आहे.  तो पुन्हा पुन्हा आपल्याविरोधी गरळ कसं ओकतो आहे हे तुम्हाला माहीत आहे ना?"
सर्वांकडून त्याच्या विधानाला पुष्टी देणारी कुजबूज झाली.  काहींच्या तोंडून इरसाल शिव्याही ऐकू आल्या.  मॅकगिंटीनं आपल्या जाकिटाच्या खिशातून एक घडी केलेला वर्तमानपत्राचा तुकडा बाहेर काढला आणि तो उलगडून वाचू लागला.
"कायदा आणि सुव्यवस्था!" तो म्हणतो, "कोळसा आणि लोहखनिजानं समृद्ध परिसरातील दहशतवादाचं साम्राज्य.  पहिला खून होऊन आमच्या भागात गुन्हेगारी संघटनेचं अस्तित्त्व सिद्ध झाल्याला आता एक तप उलटून गेलं.  तेव्हापासून सुरू झालेलं खूनखराब्याचं दुष्टचक्र कधी थांबलंच नाही.  या गोष्टी आता एवढ्या थराला गेल्या आहेत की आमच्या सभ्य सुसंस्कृत जीवनाला तो एक कलंक ठरला आहे.  युरोपातील जुलूम जबरदस्तीला कंटाळून जे लोक आमच्या देशाच्या आश्रयाला येतात त्यांचं स्वागत आमचा देश याच पद्धतीनं करणार का?  ज्यांचा मोठ्या विश्वासानं आसरा घ्यावा त्यांच्याच अत्याचारांना त्यांनी बळी पडावं कां?  स्वातंत्र्याची ग्वाही देणार्‍या आमच्या तारांकित ध्वजाखाली कायदा पायदळी तुडवून दहशत माजवणारं राज्य अशी आमची प्रतिमा त्यांच्यासमोर उभी राहावी का?  पूर्वेकडे माजलेल्या त्या अनागोंदी पुढे आमचे राज्यकर्ते पार हतबल झाले आहेत असं समजायचं का? सारे गुन्हेगार परिचयाचे आहेत.  त्यांची संघटना कोणती हे सर्वांना माहीत आहे.  हे सारं आम्ही किती दिवस सहन करणार आहोत की आम्ही कायमचं...  मला वाटतं या गटारगंगेतला पुरेसा नमुना मी तुमच्यासमोर ठेवला आहे."  चेअरमन हातातला कागद टेबलावर आपटत म्हणाला.  "आपल्याबद्दल हा इसम हे असं बोलतो.  माझा तुम्हाला प्रश्न आहे की आपण त्याचं काय करायचं?"
"त्याला ठार मारा!" डझनभर ब्रदर्स एकदम ओरडले.
"माझा याला विरोध आहे!"  गुळगुळीत दाढी केलेला मघाचाच मॉरीस म्हणाला.  "माझं ऐका बंधुंनो, या परिसरात आपली दहशत प्रचंड प्रमाणात वाढली आहे पण एक क्षण असा येईल की प्रत्येक सर्वसाधारण माणूस स्वत:च्या बचावासाठी एकत्र येईल आणि आपलं अस्तित्त्व संपवून टाकेल.  जेम्स स्टॅंगर एक वयस्कर माणूस आहे.  त्याला या गावात आणि परिसरात मान आहे.  त्याचं वृत्तपत्र सर्वसामान्यांचं वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध आहे.  अशा माणसाला मारलं तर सार्‍या राज्यात खळबळ माजेल आणि त्याचा विनाश हा अखेरीस आपला विनाश ठरेल."
"आणि ते आपला विनाश कसा घडवून आणतील ते तरी सांग पळपूट्या!"  मॅकगिर्टी ओरडला.  "पोलिसांकडून? त्यांच्यापैकी अर्ध्यांना आपण पोसतो आणि राहिलेले अर्धे आपलं नाव ऐकून चळाचळा कापतात.  कायद्याचा वापर करून न्यायाधीशाद्वारा शिक्षा ठोठावणार?  या मार्गाला आपण पूर्वी तोंड दिलं नाही?  त्यातून अखेर काय निष्पन्न झालं?"
"पण यावेळी कदाचित जज लिंच हे प्रकरण हाताळेल!"*  ब्रदर मॉरीसनं इशारा दिला.
त्याच्या या इशार्‍याविरुद्ध सभासदांमध्ये संतापाची लाटच उसळली.
"मी बोट उचलण्याचा अवकाश,"  मॅकगिंटी कडाडला.  "दोनशे माणसं गावात घुसतील आणि सारं होत्याचं नव्हतं करतील."  अचानक त्याचा आवाज आणखीनच चढला.  भुवया वर चढल्या.  "हे बघ ब्रदर मॉरीस, गेले कित्येक दिवस मी तुझ्यावर नजर ठेवून आहे.  तुझ्यात जराशीही हिंमत नाही आणि तू इतरांचंही खच्चीकरण करतो आहेस ब्रदर मॉरीस!  कदाचित एक वेळ अशी येईल की या कार्यक्रमपत्रिकेवर तुझंच नाव असेल.  तुला त्याची पूर्वकल्पना असावी म्हणून हे आधीच सांगतो आहे."

Friday, July 18, 2014

कर्मकांड

एका अरण्यात एका ऋषींचा आश्रम होता.  आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर व रम्य होता.  ऋषींबरोबर त्यांचे बरेच शिष्यही आश्रमात राहत होते.  रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सर्व जण आश्रमाची स्वच्छता, गोशाळेत गायींना चारा घालणे, दूध काढणे, नदीवरून पाणी आणणे इत्यादी कामे करीत असत.  आपल्या गुरूंवर त्यांची नितांत भक्ती होती.  गुरूजी रोज सकाळी आपल्या शिष्यांना शिकवीत असत.  श्लोकांचे पाठांतर करून घेत.  नंतर प्रवचन देत.  दररोज एक मांजर येऊन प्रवचन चालू असताना तिथे लुडबूड करीत असे.  शिष्यांचे लक्ष सारखे त्या मांजराकडे जाई.  तेव्हा गुरूजींनी एका शिष्याला असे सांगितले की, प्रवचनाच्या वेळी या मांजराला बांधून ठेवत जा.

आता दिवसभर मोकळे असणारे मांजर प्रवचनाच्या वेळी बांधून ठेवण्यात येऊ लागले.  पुढे गुरूजींचा स्वर्गवास झाला, तरी प्रवचनाच्या वेळी मांजराला बांधून ठेवणे चालूच राहिले.  

काही दिवसांनी ते मांजर मेले.  तेव्हा शिष्यांनी दुसरे मांजर आणून प्रवचनाच्या वेळी बांधून ठेवायला सुरूवात केली.  पुढे शेकडो वर्षांनी पुजा-प्रवचनाच्या वेळी मांजराला बांधून ठेवण्याचे महत्त्व व त्याबद्दलचा गूढार्थ या विषयी महान शिष्यांनी विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले.  

तात्पर्य: धार्मिक कार्यात कर्मकांड शिरते, तेव्हा मूळ हेतूचा विसर पडलेला असतो.

अंजली नानल
बोधकथा / दैनिक सकाळ
सोमवार दिनांक १९ नोव्हेंबर २०००

Tuesday, January 7, 2014

जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे


दहा वर्षांपूर्वीं ‘मी कसा झालो?’ हे माझे ‘वाङमयीन आत्मचरित्र’मी प्रसिद्ध केले. आज माझ्या जीवन-चरित्राचा पहिला खंड प्रसिद्ध होतो आहे. त्यामध्ये जन्मापासून तो वयांच्या तिसाव्या वर्षापर्यंतच्या वृत्तांत मी सांगितलेला आहे. असे निदान आठदहा तरी खंड प्रसिद्ध होतील. मराठी भाषेतच काय, पण जगामधील कोणत्याहि भाषेत एका माणसाचे  एवढे मोठे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याचे मला तरी निदान माहित नाही.
     
कोणी विचारील, की एका लहान माणसाने इतके मोठे आत्मचरित्र काय म्हणून लिहावे? त्याला उत्तर असे की, ह्यात ‘मी’ला महत्त्व नाही. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि वाङमयीन घडामोडी घडल्या, त्यांच्या इत्थंभूत वृत्तांत सांगण्यासाठी ‘आत्मचरित्र’ हे एक माझे निमित्त आहे. हे मराठी सामाजाचे चरित्र आहे. मी पाहिलेलया, मी ऐकलरल्या आणि मी अनुभवलेल्या अनेक व्यक्तीचे, घटनांचे, गोष्टींचे आणि अनुभवांचे हे चरित्र आहे. माझे काम पुष्कळसे प्रेक्षकाचे आणि निवेदकांचे आहे.
     
‘तुम्ही कोण?’ असे कोणी म्हणेल. मी कोण? मी एक जीवनाचा यात्रेकरु आहे. कसली वा कसली तरी पताका माझ्या खांद्यावर नेहेमी असतेच. जन्मापासून माझ्या पायाला जे  एकदा चक्र लागले आहे. ते एकसारखे फिरतेच आहे. कोणत्याहि एका ठिकाणी मी फार वेळ थांबत नाही. जिथे रंगतो, तिथे काही वेळ थांबतो. कंटाळलो की पुढे चालू लागतो.
     
कोणत्याहि एका व्यवसायांत मला रस नाही कारण, व्यवसाय हे काही माझें जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिेज, सारे मला समजलें पाहिजे? सारे मला आले पाहिजे, ही एकच माझ्या जिवाची तडफड असते.
     
आयुष्याला जीवन का म्हणतात? कारण, जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वहात राहिले, तरच ते जीवन.सांचून राहिलर तर ते डबके जीवन म्हणजे एक प्रंचड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ति कधी होत नाही.
     
रोज सकाळी सूर्योदयाबरोबर नवीन जीवन जन्माला येते. चिरंतन नावीन्य म्हणजेच जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही. मला जीवनाचा लोभ नाही पण ओढ आहे. चोहोकडून मला ते हाका मारते. आणि त्या ऐकू आल्या म्हणजे शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देहकण जीवनाकडे धावत सुटतात.
     
जीवनाचे हे विलक्षण वेड  माझ्यामध्ये कसे आले? लहानपणापासून निसर्गाचूी अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कर्‍हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखाद्यावर जेजूरीच्या खंडोबाच्या भंडार्‍याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवाजीमहाराजांचा पुरंदर किल्ला आष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपानदेवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे.
     
शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवड गांव. महाराष्ट्रातील संताच्या नि वीराच्या पदस्पर्शाने त्याचया भूमीचा कण न् कण पुनीत झालेला आहे. शिवशाहीचा नि पेशवाईचा महत्त्वाचा इतिहासच मुळी त्याच्या पंचक्रोशीत घडलेला आहे. आजहि सासवडच्या रस्त्यांतून जाऊ लागले. की उंच उंच वाडयांच्या पडक्या भितीवरुन दोनतीनशे वर्षांचा इतिहास तिमच्या कानांत कुजबुजू लागतो. ज्ञानोबाची पालखी दर वर्षीं सोपानदेवाचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते. त्यावेळी आमच्या गावात दिड्यापतकांची अशी गर्दी उडते आणि टाळमृदुंगाच्या नि ग्यानबातुकारामांच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणत! बालपणांत झालेल्या ह्या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.
     
जे रम्य आणि भव्य आहे, त्याचें सर्धन खेडेगांवातच घडते. पावलोपावली परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो तिथे. त्याची कृपा नदीच्या रुपाने तुमच्या घराजवळून वहात असते. शिवारामधल्या शेतांत डोलणार्‍या पिकावरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्र्वासच प्रतिक्षणी घेऊन येतो. शहरांत रहावयाला आलो, तरी निसर्गाची संगत मी कधीच सोडलेली नाही. मुंबईचा सागर आणि खंडाळयाचा डोंगर हे माझे सोबती आहेत.
     
जीवनाच्या आनंदामधूनच माझे वाङमय वेड निर्माण झाले आहे. वाङमयापेक्षा मला अधिक प्रिय काही नाही. वाङमय म्हणजे जीवनाचा अनुभव. जीवनाचा शोध जीवनाचे जेजे अनंत साक्षात्कार मला घडले, ते प्रकट करण्यासाठींच मी वाङमयाचा आसरा घेतला. मी आयुष्यांत पुष्कळच भटकलो. पण वाङमयाची सोबत कधी सोडली नाही. जीवनाची सेवा मी वाङमयाने केली.
     
मी उपदेशक नाही. उपासक आहे. सिद्ध नाही. साधक आहे. समाजातील अनंत दुःखाची आणि दन्यांची मला जाणीव आहे. त्यांजवर फुंकर घालण्याचाच माझ्या लेखणींने मी सतत प्रयत्न केला आहे. रंजल्यागांजल्याचा कैवार घेण्यांतच मी माझे सामर्थ्य खर्च केले आहे. जगातील म्लान वदने प्रफुल्लित कशी होतील ह्याचीच मी सदैव चिंता केली आहे. माझ्या दोषांची आणि चुकींची मला जाणीव आहे. पण सज्जनांच्या निदेचे पाप माझ्या हातून कधी घडलेले नाही. लोकगंगेचे जीवन गढूळ करण्याचे दुष्कर्म मी कधी केलेले नाही.
     
मी गुणांचा पूजक आहे. हे माझे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले रे दिसले की मी त्यांजवर तुटून पडतो. चांगल्या गोष्टीवर प्रेम करण्याची मला उपजतच आवड आहे. सद्गुणांच्या दाराशी जन्मभर मी जी माधुकरी मागितली, त्याच शिदोरीवर आजपर्यंत मी गुजराण करीत आलो आहे.

कर्‍हेचे पाणी
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे