Tuesday, January 7, 2014

जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे


दहा वर्षांपूर्वीं ‘मी कसा झालो?’ हे माझे ‘वाङमयीन आत्मचरित्र’मी प्रसिद्ध केले. आज माझ्या जीवन-चरित्राचा पहिला खंड प्रसिद्ध होतो आहे. त्यामध्ये जन्मापासून तो वयांच्या तिसाव्या वर्षापर्यंतच्या वृत्तांत मी सांगितलेला आहे. असे निदान आठदहा तरी खंड प्रसिद्ध होतील. मराठी भाषेतच काय, पण जगामधील कोणत्याहि भाषेत एका माणसाचे  एवढे मोठे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याचे मला तरी निदान माहित नाही.
     
कोणी विचारील, की एका लहान माणसाने इतके मोठे आत्मचरित्र काय म्हणून लिहावे? त्याला उत्तर असे की, ह्यात ‘मी’ला महत्त्व नाही. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि वाङमयीन घडामोडी घडल्या, त्यांच्या इत्थंभूत वृत्तांत सांगण्यासाठी ‘आत्मचरित्र’ हे एक माझे निमित्त आहे. हे मराठी सामाजाचे चरित्र आहे. मी पाहिलेलया, मी ऐकलरल्या आणि मी अनुभवलेल्या अनेक व्यक्तीचे, घटनांचे, गोष्टींचे आणि अनुभवांचे हे चरित्र आहे. माझे काम पुष्कळसे प्रेक्षकाचे आणि निवेदकांचे आहे.
     
‘तुम्ही कोण?’ असे कोणी म्हणेल. मी कोण? मी एक जीवनाचा यात्रेकरु आहे. कसली वा कसली तरी पताका माझ्या खांद्यावर नेहेमी असतेच. जन्मापासून माझ्या पायाला जे  एकदा चक्र लागले आहे. ते एकसारखे फिरतेच आहे. कोणत्याहि एका ठिकाणी मी फार वेळ थांबत नाही. जिथे रंगतो, तिथे काही वेळ थांबतो. कंटाळलो की पुढे चालू लागतो.
     
कोणत्याहि एका व्यवसायांत मला रस नाही कारण, व्यवसाय हे काही माझें जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिेज, सारे मला समजलें पाहिजे? सारे मला आले पाहिजे, ही एकच माझ्या जिवाची तडफड असते.
     
आयुष्याला जीवन का म्हणतात? कारण, जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वहात राहिले, तरच ते जीवन.सांचून राहिलर तर ते डबके जीवन म्हणजे एक प्रंचड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ति कधी होत नाही.
     
रोज सकाळी सूर्योदयाबरोबर नवीन जीवन जन्माला येते. चिरंतन नावीन्य म्हणजेच जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही. मला जीवनाचा लोभ नाही पण ओढ आहे. चोहोकडून मला ते हाका मारते. आणि त्या ऐकू आल्या म्हणजे शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देहकण जीवनाकडे धावत सुटतात.
     
जीवनाचे हे विलक्षण वेड  माझ्यामध्ये कसे आले? लहानपणापासून निसर्गाचूी अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कर्‍हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखाद्यावर जेजूरीच्या खंडोबाच्या भंडार्‍याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवाजीमहाराजांचा पुरंदर किल्ला आष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपानदेवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे.
     
शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवड गांव. महाराष्ट्रातील संताच्या नि वीराच्या पदस्पर्शाने त्याचया भूमीचा कण न् कण पुनीत झालेला आहे. शिवशाहीचा नि पेशवाईचा महत्त्वाचा इतिहासच मुळी त्याच्या पंचक्रोशीत घडलेला आहे. आजहि सासवडच्या रस्त्यांतून जाऊ लागले. की उंच उंच वाडयांच्या पडक्या भितीवरुन दोनतीनशे वर्षांचा इतिहास तिमच्या कानांत कुजबुजू लागतो. ज्ञानोबाची पालखी दर वर्षीं सोपानदेवाचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते. त्यावेळी आमच्या गावात दिड्यापतकांची अशी गर्दी उडते आणि टाळमृदुंगाच्या नि ग्यानबातुकारामांच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणत! बालपणांत झालेल्या ह्या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.
     
जे रम्य आणि भव्य आहे, त्याचें सर्धन खेडेगांवातच घडते. पावलोपावली परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो तिथे. त्याची कृपा नदीच्या रुपाने तुमच्या घराजवळून वहात असते. शिवारामधल्या शेतांत डोलणार्‍या पिकावरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्र्वासच प्रतिक्षणी घेऊन येतो. शहरांत रहावयाला आलो, तरी निसर्गाची संगत मी कधीच सोडलेली नाही. मुंबईचा सागर आणि खंडाळयाचा डोंगर हे माझे सोबती आहेत.
     
जीवनाच्या आनंदामधूनच माझे वाङमय वेड निर्माण झाले आहे. वाङमयापेक्षा मला अधिक प्रिय काही नाही. वाङमय म्हणजे जीवनाचा अनुभव. जीवनाचा शोध जीवनाचे जेजे अनंत साक्षात्कार मला घडले, ते प्रकट करण्यासाठींच मी वाङमयाचा आसरा घेतला. मी आयुष्यांत पुष्कळच भटकलो. पण वाङमयाची सोबत कधी सोडली नाही. जीवनाची सेवा मी वाङमयाने केली.
     
मी उपदेशक नाही. उपासक आहे. सिद्ध नाही. साधक आहे. समाजातील अनंत दुःखाची आणि दन्यांची मला जाणीव आहे. त्यांजवर फुंकर घालण्याचाच माझ्या लेखणींने मी सतत प्रयत्न केला आहे. रंजल्यागांजल्याचा कैवार घेण्यांतच मी माझे सामर्थ्य खर्च केले आहे. जगातील म्लान वदने प्रफुल्लित कशी होतील ह्याचीच मी सदैव चिंता केली आहे. माझ्या दोषांची आणि चुकींची मला जाणीव आहे. पण सज्जनांच्या निदेचे पाप माझ्या हातून कधी घडलेले नाही. लोकगंगेचे जीवन गढूळ करण्याचे दुष्कर्म मी कधी केलेले नाही.
     
मी गुणांचा पूजक आहे. हे माझे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले रे दिसले की मी त्यांजवर तुटून पडतो. चांगल्या गोष्टीवर प्रेम करण्याची मला उपजतच आवड आहे. सद्गुणांच्या दाराशी जन्मभर मी जी माधुकरी मागितली, त्याच शिदोरीवर आजपर्यंत मी गुजराण करीत आलो आहे.

कर्‍हेचे पाणी
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

Wednesday, January 1, 2014

चतूर माधवराव

प्रस्तावना

दातार छापखाना स्थापन झाल्यापासून "शालिवाहन शक", "मोलकरीण" ही दोन पुस्तके पूर्वी प्रसिद्ध झाली; आणि आता हे तिसरे "चतूर माधवराव" वाचकांच्या सेवेला सादर होत आहे.  आम्ही लिहिलेल्या सर्व पुस्तकांहून याची रचना जरा निराळ्य़ा तर्‍हेची आहे.

आम्ही यापूर्वी ज्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबर्‍या लिहिल्या त्या सर्व आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबर्‍यांची रूपांतरे आहेत.  परंतू प्रस्तुत पुस्तक हे कोणत्याही पुस्तकाचे किंवा पुस्तकखंडाचे रूपांतर नसून या सर्व गोष्टी स्वतंत्रपणे लिहिल्या आहेत.

नुकतेच ख्रिस्तवासी झालेले सर ऑर्थर कॉनन डाईल यांच्या "शेरलॉक होम्स" च्या धर्तीवर या सर्व गोष्टी अगदी नवीन रचल्या आहेत.  निरीक्षणी, चातुर्य, तर्कशुद्ध विचारसरणी, कल्पकता यांच्या पायावर प्रत्येक गोष्टीची उभारणी केली आहे.  प्रत्येक गोष्टीत बहुधा काहीतरी नवीन तर्कसरणीचा आश्रय केलेला आढळून येईल आणि प्रथमत: कठीण वाटणार्‍या कोड्याचा तार्किक पद्धतीने केलेला उलगडा वाचकांचे मनोरंजन करून त्यांच्या तर्कशक्तीस चालना देण्यास साह्य करील, अशा दृष्टीने प्रत्येक गोष्टीची रचना केलेली आहे.  

या पुस्तकात ’आद्य’ रसाला जागाच नसल्यामुळे हे कित्येकांना रुक्ष वाटेल.  परंतु शृंगार, ग्राम्यता, किंवा अश्लीललता यांपासून या गोष्टी पूर्णपणे अलिप्त ठेवण्याची खबरदारी घेतलेली असल्यामुळे हे पुस्तक तरूणांच्या हाती बिनधोक देता येण्यासारखे आहे.  "कुटूंबातील लहान थोर माणसे एकत्र बसली असता सर्वांसमक्ष जे पुस्तक बिनधोक वाचता येईल, ते पुस्तक चांगले," अशी जी विद्वानांनी चांगल्या पुस्तकाची कसोटी ठरविली आहे त्या कसोटीस हे पुस्तक पूर्णपणे उतरेल असा आम्हास भरवसा वाटतो.

प्रत्येक गोष्टीत माधवराव आणि बळवंतराव अशी दोन पात्रे आहेत.  वाचकांनी आपणास माधवराव न समजता बळवंतराव समजून गोष्ट वाचावी, आणि प्रत्येक गोष्टीत जेथे पूर्वरंगाचे दुवे पुरे होतात, तेथे थोडा वेळ थांबून त्या दुव्यांवरून आपणांस अनुमानश्रुंखला कितपत तयार करता येते, याचा विचार करावा आणि नंतर उत्तररंग वाचावा म्हणजे आपल्या तर्कसरणीपेक्षा माधवरावांची तर्कसरणी कशी सूक्ष्म व शुद्ध आहे हे लक्षात येऊन मनाला समाधान वाटल्यावाचून राहणार नाही, असे आम्हास वाटते.  या कादंबरीतील सर्व गोष्टी ’मधुकर’ मासिकात वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झाल्या आहेत व ’हरवलेली नथ’ ही गोष्ट ’चित्रमय जगत’ व ’मधुकर’ या दोन्ही मासिकातून प्रसिद्ध झालेली आहे.  या गोष्टी जशा त्यावेळी वाचकांस आवडल्या, तशा आताही या स्थायी स्वरूपात आवडतील, अशी अपेक्षा धरणे अस्थानी होणार नाही.  अशा प्रकारच्या निरीक्षणविषयक स्वतंत्र लघुकथांची महाराष्ट्र वाङ्मयात फारच उणीव असल्यामुळे हा आमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी सरस्वतीमंदिराच्या या दालनात प्रवेश करणार्‍या वाङ्मयसेवकास ’मागच्याला ठेच पुढचा शहाणा’ या न्यायाने हा आमचा अल्प प्रयत्न मार्गदर्शक झाला तरी त्याने पुष्कळच काम केल्यासारखे होईल.

’शेरलॉक होम्स’ जसा इंग्रजी वाचकांस आवडला व त्याची नव्याजुन्या जगात प्रतिष्ठा झाली तसे भाग्य जरी ’माधवरावास’ लाभणे शक्य नाही तरी त्याच्या जनकाच्या या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्र वाचक त्याचा उपहास तरी करणार नाहीत, अशी आशा बाळगून ही प्रस्तावना पुरी करतो.  

सन् १९३०

गोविंद नारायण दातार

नवरदेवाचे पलायन

लग्न ठरल्यावर ते होऊन जाईपर्यंत वधूवरांची आईबापे त्यांना किती जपत असतात आणि त्यांचे किती लाड करत असतात, हे कोणास नव्याने सांगण्याची जरूरी नाही.  तेवढ्यापुरती आईबापांकडून अथवा सोयर्‍या धायर्‍यांकडून वधूवरांच्या शरीरप्रकृतीसंबंधाने जितकी काळजी व तत्परता दाखविली जाते, तिचा दशांश काळजी जर नेहमी दाखविली जाईल तर अकाली मृत्यूमुखी पडणार्‍या तरूणांची संख्या पुष्कळच कमी होईल, यात शंका नाही.
*******
मवाळांची गणना भित्र्यांमध्ये किंवा स्वार्थसाधूंमध्ये होत असल्यामुळे, आपणास मवाळ म्हणवून घेण्यापेक्षा जहाल म्हणवून घेणे पुष्कळास आवडते.  त्यामुळे जहाल म्हणविणारांची संख्या फुगलेली दिसते खरी, पण कर्तबगारीची वेळ आली की असल्या जहालांपैकी बरेच जण मवाळ तर, नाहीतच, अगदी गचाळ असतात असे आढळते.

पुत्रप्रेम की धनलोभ

माधवरावांना भरपूर काम असले म्हणजे ते करताना त्यांच्या अंगी मोठा हुरूप चढे, पण मनासारखे काम नसले म्हणजे त्यांचा स्वभाव अगदी उदास बने.  ही उदासीनता घालविण्यासाठी ते गंजिफा किंवा बुद्धिबळे खेळत.  तथापिअ त्यांच्या तोडीचा खेळणारा त्यांना नेहमी मिळत नसल्यामुळे खेळातसुद्धा त्यांची निराशाच होत असे.  अशावेळी वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिक पुस्तकामध्ये प्रसिद्ध होणारे बुद्धिबळाचे कठीण डाव सोडविण्यासाठी मी त्यांच्याकडे नेत असे.  परंतु मौज ही की, तासतास डोके खर्च करून आम्हास जे डाव सुटत नसत असले बिकटा डाव ते सहज चारपाच मिनीटांत सोडवीत.  हे तुम्हाला कसे साधते, असा त्यांना प्रश्न केला असता त्यांनी असे सांगितले:

’स्वाभाविकपणे घडून आलेल्या गोष्टी आणि कृत्रिम रीतीने घडवून आणलेल्या गोष्टी त्यातील भेद तुमच्या लक्षात येत नाहीत म्हणून असे होते.  प्रत्येक गोष्टीची स्वत:ची  -- निसर्गसिद्ध अशी काहीतरी मर्यादा असते.  म्हणून गोष्टी स्वाभाविकपणे घडून येत असता त्यामध्ये मर्यादेचे उल्लंघन झालेले दिसून येत नाही.  परंतु, जेव्हा कृत्रिम गोष्टी स्वाभाविक गोष्टीप्रमाणे भासवावयाच्या असतात, तेव्हा किती जरी खबरदारी घेतलेली असली, तरीदेखील, सूक्ष्म अवलोकन करणार्‍यास कृत्रिम गोष्टींमध्ये मर्यादेचे उल्लंघन झालेले हटकून आढळून येते.  एखाद्या कवीचे किंवा चित्रकाराचे उदाहरण घ्या.  या सृष्टीमध्ये एका ईश्वरावाचून सर्वगुणपरिपूर्ण -- दोषरहित असे काहीच नाही.  मनुष्य-प्राण्याच्या सर्व कृती सदोष असावयाच्याच.  "सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता:।" या सामान्य नियमाला दूर ढकलून कवी आणि चित्रकार आपापल्या कल्पनाशक्ती जोरावर निर्माण केलेल्या काव्यातील अथवा चित्रातील प्रधान वस्तूचे स्वरूप दाखविताना तिच्या ठिकाणी दोषांचा नुसता विटाळदेखील होऊ देत नाहीत.  अशा प्रसंगी ते आपल्या कलेचे घोडे इतके अमर्याद दामटतात की, त्याला तो वेग असह्य होऊन ते मध्येच तोंडघशी पडेल, ही साधी गोष्टसुद्धा त्याच्या लक्षात येत नाही.  प्रत्येक बाबतीत असेच आहे.’  अशा रीतीने त्यांचे तात्त्विक व्याख्यान सुरू झाले म्हणजे त्यांच्या निरीक्षणशक्तीचे व कार्यकारण संबंधाचे पृथक्करण करण्याच्या कौशल्याचे मला मोठे कौतुक वाटे.  

पुढील गोष्ट मी नोकरीस असताना घडलेली आहे.  ते त्यावेळी नुकतेच सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मोकळे झाले होते.  त्यांचे बुद्धिसामर्थ्य त्यांच्या वरिष्ठांपेक्षा अधिक होते, हेच त्यांना राजीनामा देण्याला कारण.  इतका ’फाजील’ बुद्धिवान नोकर वरिष्ठांना नको होता, आणि अधिकारमताने सर्वज्ञ बनलेल्या वरिष्ठांची खुशामत करण्याची माधवरावांची तयारी नव्हती, म्हणून झाले ते उभयपक्षी इष्टच झाले.  कायमची पेन्शनेबल नोकरी सोडली, म्हणून आम्ही स्नेह्यांनी त्यांना प्रथम दोष देण्यास बिलकूल अनमान केला नाही, पण लवकरच आमची चूक आमच्या लक्षात आली.  इस्लामाबादच्या बेगमसाहेबांच्या चोरीस गेलेल्या जवाहिराचा त्यांनी मोठ्या शिताफीने पत्ता लावून दिला, म्हणून बेगसाहेबांकडून त्यांना जे बक्षीस मिळाले, त्याचे व्याजच त्यांना अर्ध्या पगाराइतके येऊ लागले.
*******
एकदा दरवाज्यातून लांबवर दृष्टी पोचवून व आपले बोलणे आणखी कोणी ऐकत नाही अशी खात्री करून घेऊन तो हलक्या स्वराने बोलू लागला, "माधवराव, माझा सर्वस्वी नाश होण्याची वेळ जवळ आली की काय, अशी मला भीती वाटू लागली आहे.  पैशापरी पैसा जाणार आणि इतके दिवस मिळविलेली अब्रूही गमविण्याचा प्रसंग येतो की काय, असे मला भय पडले आहे..  लोक मला मारवाडी, कंजूष, कवडीचूंबक काय हवे ते म्हणोत, तथापि अनंत धोंडदेव लबाड माणूस आहे असे मात्र कोणाला म्हणता यावयाचे नाही.  लोकांसारखे चैनीत पैसे मी उधळीत नाही आणि कोणाकडे तोंड पसरायलाही जात नाही.  आजपर्यंत निदान पंचवीस वेळा तरी माझे हिशोब सरकारात गेले असतील, पण त्यात कधी तफावत निघाली असे कधीच झालेले नाही.  उलट माझे हिशोब चोख असतात असे एक सोडून दहा शेरे तुम्हाला पाहावयास मिळतील.  मी निढळच्या घामाने पैसे मिळवितो व काटकसरीने खर्च करतो, लोकांच्याने पाहावत नाही. मी व्याजच जबर सांगतो, ते वेळच्यावेळी मिळाले नाही तर व्याजावर व्याज घेतो, अंगभर वस्त्र वापरीत नाही, पोटभर जेवीत नाही, असे माझ्यावर लोकांचे विलक्षण आरोप आहेत."

"माझी खरी स्थिती काय आहे हे तुम्हाला समजल्याखेरीज सध्या मजवर प्रसंग कसा गुदरला आहे हे तुमच्या नीटसे ध्यानात येणार नाही.  लोक मला लक्षाधीश समजतात.  समजेनात! आणि मी जरी लक्षाधीश असलो तरी आणखी पैसा मिळवू नये असे कोणत्या शास्त्रात सांगितले आहे?  आज माझ्यावर जो प्रसंग आला आहे तो पैशाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा नाही.  आज माझी अब्रू जाण्याची वेळ आली आहे.
*******
मात्रा लागू पडली, पुत्राच्या अश्रूंनी जे कार्य घडून आले नाही, ते कार्य द्रव्यतृष्णतेने एका क्षणात करून दाखविले!  द्रव्यलोभाने त्या म्हातार्‍याचे मन पुरते व्यापून टाकले आहे, त्यात पुत्रप्रेमाला जागा मुळीच नाही हे माधवरावांनी प्रथमच ओळखले होते.  म्हणूनच त्यांनी मुद्दाम नानासाहेब इनामदारांना तेथे आणून बसवून ठेवले होते.  द्रव्य मिळवून त्याचा संग्रह करणे हेच आपल्या जन्माचे सार्थक असे मानणार्‍या त्या म्हातार्‍याने पुत्राचे कर्ज फेडण्याचे निरूपायाने कबूल केले.  लवकरच आवडीच्या गळ्यात सरी दिसू लागली.  हुंडा न घेता लग्न करण्याची विष्णूपंताची प्रतिज्ञा नानासाहेब इनामदारांनी पूर्ण केली.  त्याच जडावाच्या पाटल्या हाती असलेली नानासाहेबांची कन्या ज्या दिवशी सुनेच्या नात्याने अनंतराव मारवाड्याच्या पाया पडावयाला आली त्याच दिवशी त्या म्हातार्‍याच्या पोटात धुमसत असलेला क्रोधाग्नी पूर्णपणे शांत झाला असे माझ्या ऐकिवात आहे.

तांब्याची पट्टी

माधवराव म्हणाले, "रावसाहेब तुम्ही तर या गोसाव्याचे फारच उत्तम चित्र काढले! पण मी सांगतो, त्याचे पूर्वचरित्र बरेच विलक्षण असले पाहिजे, विरक्तीखेरीज दुसर्‍या कोणत्यातरी कारणाने याने हा वेष धारण केला असावा.  बाह्य आचरणाला व वेषाला गतानुगतिक लोक नेहमी फसत असतात."
मी म्हंटले, "माधवराव, माणसाकडे नुसते पाच-चार मिनीटे पाहून त्याच्याविषयी काहीतरी सिद्धांत ठोकून देणे हे वाजवी नव्हे.  आम्हा शिकलेल्या लोकांना साधुसंतांची अवहेलना करण्याची मोठी वाईट खोड लागली आहे, असे जुने लोक नेहमी म्हणत असतात--"
माझे भाषण पुरते संपण्यापूर्वीच माधवराव म्हणाले, "आणि ते पुष्कळ अंशी खरेही आहे.  तथापि अलीकडच्या लोकात चिकित्सकबुद्धी विशेष असल्यामुळे ते नुसत्या बाह्य देखाव्याला फारसे फसत नाहीत, ही गोष्टही तितकीच खरी आहे."

जुगाराचा भयंकर परिणाम

’सोडतीचे तिकीट घेण्यासंबंधाने तू माझा अभिप्राय विचारलास हे चांगले केलेस.  सोडत हा शुद्ध जुगार आहे, व जुगार हा काही द्रव्यसंपादनाचा नीतीचा मार्ग नव्हे.  सोडतीच्या पैशाने श्रीमंत होऊन चैन मारण्यापेक्षा भिक्षा मागितलेली शतपट बरी, असे माझे स्पष्ट मत आहे.  ईश्वरदयेने जे आपणास मिळत आहे ते काही कमी नाही.  जुगारात मिळालेला पैसा हरामाचा.  तो यशालाभास यावयाचा नाही.  सोडतीत पैसे घालणारा प्रत्येक जण मोठ्या आशेने पैसे घालीत असतो.  आपले पैसे व्यर्थ जाणार ही कल्पना जरी प्रत्येकाला असली, तरी भावी सुखाच्या कल्पना त्याच्या डोळ्यांपुढे नाचत असल्यामुळे केवळ तेवढ्या आशेवरच तो बेफिकीर असतो.  पण सोडतीचा निकाल होऊन निराशा झाली, म्हणजे आपल्या व्यर्थ गेलेल्या द्रव्याची खरी किंमत त्याला कळते, आणि त्याचा जीव तळमळू लागतो.  सोडतीत पैसा घालण्याचा विचार तुझ्यासारखे गर्भश्रीमंतच करते तर गोष्ट वेगळी होती, पण आजचा दिवस कसाबसा गेला, उद्याचा कसा जातो याची ज्यांना भ्रांत असते, असे लोकदेखील सोडतीत पैसा घालतात.  घरी बायकापोरे उपाशी मरत असता केवळ अनिश्चित आशेच्या भरी भरून, मारवाड्याचे कर्ज काढून सोडतीत पैसे घालणार्‍या लोकांची पाच सहा उदाहरणे माझ्या डोळ्यांसमोर आहेत.  सर्वच लोक कर्ज काढतात, किंवा सर्वांसच फुकट गेलेल्या पैशाबद्दल हळहळ वाटते असे माझे म्हणणे नाही.  पण ऐपत नसता सोडतीत पैसे घालणार्‍या लोकांचीच संख्या जास्त हे लोक आपल्या मूर्खपणामुळे तळमळत बसतात, त्याला लोकांनी काय करावे, असा यावर कित्येकांच्या तोंडचा आक्षेप मी ऐकला आहे, पण त्यात काही तथ्य नाही.  मूर्खांना उपदेश करून शहाणे करणे हे जाणत्या लोकांचे कर्तव्य आहे.  त्यांच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन आपण चैन मारण्याची इच्छा करणे, हे काही माणूसकीचे कृत्य नव्हे.  हा धडधडीत जुलूम आहे.  या सोडतीत घातलेल्या पैशातील अर्धी रक्कम एका धर्मकृत्याकडे जाणार आहे, म्हणून तिकीट घ्यावे असे तू लिहीतोस, यावरूनच तुझ्या मूर्खपणाची व अविचारीपणाची साक्ष पटते.  तुला जर धर्मकृत्याला मदत करावयाची असेल, तर ते एक सोडून दहा तिकिटांच्या किंमतीइतकी रक्कम सरळ धर्मकृत्यास देऊन टाक.  त्याला मी मूळीच नको म्हणणार नाही.  धर्म करावयाचा तो केवळ धर्माच्या सात्त्विक वासनेनेच केला पाहिजे.  त्यात लोभाला थोडादेखील थारा मिळता कामा नये.  लोभाला बळी पडून खर्चिलेला पैसा जरी खरोखरच्याच धर्मकृत्यात खर्ची पडला असला तरी त्यापासून पुण्यप्राप्ती होते असे मानणे म्हणजे आपली आपणच करून घेतलेली फसवणूक होय.  हा निव्वळ मूर्खपणा आहे.  असला मूर्खपणा तू करू नकोस.  सोडत हा निव्वळ जुगार आहे.  जुगार हा अविचार आहे.  जुगार हे अनीतीचे कृत्य आहे - पाप आहे.  सोडतीत मिळालेल्या पैशाबरोबरच गोरगरिबांच्या तळतळाटाचे ओझे डोक्यावर बसत असते.  असले पापाचे ओझे डोकीवर घेऊन त्यात आनंद मानणार्‍या नरपशूचे तोंडसुद्धा पाहू नये.  हे माझे लिहीणे कदाचित तुला कठोर वाटेल, पण याबाबतीत माझी मते काय आहेत हे कळविण्याची आज आयती आलेली संधी फूकट घालवू नये, म्हणून मी अगदी जिव्हाळ्याने लिहीत आहे.

मी सार्‍या जन्मात जुगार खेळलो नाही.  जुगार, मग तो कितीही क्षुल्लक असो, तो खेळणारांचा मला मोठा तिटकारा येत असतो.  जुगारी माणसाचे तोंड दृष्टीस पडले की माझ्या पायांची तिडीक मस्तकाला झोंबते, इतकी मला जुगाराची चीड आहे.’


चतूर माधवराव
मुंबई - कोकणात घडणार्‍या रहस्यमयी घटनांवर आधारित १३ चातुर्यकथांचा संग्रह
पृष्ठे - २४४
किंमत रूपये २५०/-
समन्वय प्रकाशन / अजब डिस्ट्रीब्युटर्स, कोल्हापूर 

Sunday, December 29, 2013

चेतन

खुर्चीतून उठलेली गीता परत खुर्चीत बसली.  खोलीवरून अजूनही तिची नजर फिरत होती.  एखाद्या तर्‍हेवाईक गर्भश्रीमंत तरुणाने लहरीप्रमाणे सजवलेली खोली - एवढंच त्या खोलीबद्दल म्हणता आलं असतं आणि मग तिचं लक्ष तिच्या समोरच एका खुर्चीत आरामात बसलेल्या चेतनकडे गेलं.  त्याने नुकतीच शिलगावलेली सिगारेट त्याच्या हातात होती आणि त्या धुरातून तो तिच्याकडे किंचित मिश्कील नजरेने पाहात होता.  तो श्रीमंत असेल, पण तर्‍हेवाईक? लहरी? मुळीच नाही !  पण वेगळा होता - तिच्या परिचयातल्या तरुणांहून किती वेगळा होता! आताचं त्याचं गुलहौशी रूप फसवं होतं.  त्याच्यातलं परिवर्तन तिने आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं होतं नाहीतर तिचा विश्वासच बसला नसता - रात्री त्या गुंडांच्या अड्ड्यात पोहोचताच चेतन त्याच्या खर्‍या स्वरूपात प्रकट झाला होता.  मेंढ्यांच्या कळपात शिरलेल्या चित्त्याने त्यांची दाणादाण उडवावी तसा त्याने त्या वाड्यात हाहाकार माजवला होता.  तिनं ऐकलेलं खरं असलं तर दोघांना त्याने समुद्रात बुडवून मारलं होतं, एकाला चाकूने, आणखी एकाला विजेच्या कुंपणावर फेकून, तर मुक्रानला चाबकाने फोडून आणि रसूलला गळफास लावून ठार मारलं होतं.  बालिश चेहर्‍याच्या, मध्यम शरीरयष्टीच्या या चेतनमध्ये ही धुमसती शक्ती आली होती? आताचाही त्याचा स्वस्थपणा फसवा होता - त्याच्या सान्निध्यात सर्व वस्तूंना, सर्व प्रसंगांना, सर्व शब्दांना एक नवा अर्थ येत होता, एक नवा उजाळा लाभत होता.  
"कसला एवढा गंभीर विचार?" चेतन हसत म्हणाला.
"मला तुमचं नवल वाटतं, चेतन-" गीता प्रांजळपणे म्हणाली.
"तू काही नवल करणारी पहिलीच नाहीस." तो अर्धवट थट्टेने म्हणाला.
"मी तुम्हाला एक विचारू?"
"अवश्य".
"तुम्ही अनेकांचा बळी घेतलात--"
"संरक्षणासाठी! नाहीतर त्यांनी माझा बळी घेतला असता!"
"मी समर्थन मागत नाही.  मला माहीत आहे ती सर्व माणसं कोणत्या लायकीची होती ते-- त्यांना केवळ मृत्यू हीच शिक्षा योग्य होती.  माझा प्रश्न वेगळाच आहे.  अनेकांना अशा गुन्हेगारांचा संताप येतो.  पण तुम्ही त्यांच्या पुढे जाता--कायदा गुंडाळून ठेवता-- हे कसं?"
"गीता, केवळ तूच विचारते आहेस म्हणून मी या प्रश्नाचे उत्तर देतो, कारण तू सर्व कसोट्यांना उतरली आहेस.  कधी काळी मी जर स्त्री साथीदार निवडली असती तर ती तुझ्यासारखीच असती तेव्हा तुला प्रश्न विचारण्याचा आणि त्याचे उत्तर मिळण्याचा हक्क आहे."
काही वेळ चेतन खिडकीबाहेर पाहात बसला.
"गीता, हे मी आजवर कुणापाशीही बोललो नाही.  माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी मला एक भयंकर अनुभव आला.  तो काय हे मी सांगत बसत नाही.  एवढं सांगतो की त्या अनुभवाने माझे डोळे उघडले.  तथाकथित कायदा व कायद्याचा न्याय किती अपुरा आहे हे मला समजलं.  हेही कळलं की असे अनेक गुन्हे आहेत की जे कायद्याच्या कक्षेत येतच नाहीत.  अन्याय ज्याच्यावर झालेला आहे अशा माणसाला दाद मागायची सुद्धा काही सोय नाही.  कदाचित सुधारलेल्या समाजाची ती एक खूण असेल-- पण सर्वच माणसे सुधारलेली नसतात.  काही माणसे समाजाच्या या सैल किंवा चूकीच्या नियंत्रणाचा गैरफायदा घेतात.  समाजातल्या पापभिरू, असहाय्य, सज्जन, दुबळ्या अशा घटकांवर आपली उपजीविका करतात."  लोकांनी कष्टाने पैसा पैसा जमवून उभी केलेली संपत्ती लुटतात.  अशा दुर्दैवी लोकांना वाली नाही.  समाज केवळ हळहळतो, प्रत्यक्ष काही करत नाही.  मलाही हा अनुभव आला.. ते संस्कारक्षम वय म्हणा, माझा स्वभाव म्हणा किंवा माझ्यावर झालेल्या अन्यायाचं खास राक्षसी रूप म्हणा-- कशाचा तरी परिणाम होऊन माझ्या मनाची घडण आमूलाग्र बदलली--"
"गुन्हेगारांविरुद्ध  नुसतं संतापून उपयोग नव्हता.  त्यांच्या मागे पैशांचं बळ होतं, समव्यवसायी लोकांची संघटना होती.  त्यांना धडा शिकवायचा तर मला मला त्यांच्यापेक्षा जास्त क्रूर, जास्त हिकमती, जास्त कुशल व्हायलं हवं होतं आणि माझ्या आयुष्याची अनेक वर्षे ही तांत्रिक कौशल्ये हस्तगत करण्यात घालवली आहेत-मीही साधा माणूसच आहे- पण सतत सरावाने आणि चिकाटीने मी अनेक तंत्रे हस्तगत केली आहेत पण जरा विचार केला तर समजेल की त्यात खरोखर अशक्य काय आहे?"
"पिस्तूल, रायफल, तलवार, जंबिया, चाकू, तीरकमठा ही शस्त्रे मी चांगली वापरतो.  सर्व गाड्या, सर्व दुचाकी-तिचाकीही वाहने, काही जातीची विमानं मी चालवू शकतो.  कुस्त्यांचे शास्त्रीय व अशास्त्रीय सर्व प्रकार मी जाणतो.  मी चांगले वेषांतर करतो, इतरांच्या आवाजाची सहीसही नक्कल मी करू शकतो, इतरांच्या हस्ताक्षराची नक्कल मी करू शकतो- माझे शरीर इतके काटक आहे, चपळ आहे.  पण या सर्वात दैवी किंवा अमानवी असं काय आहे? मी आयुष्याचा जो एक मार्ग निवडला त्यासाठी ही साधनं आवश्यक होती त्याखेरीज मी यशस्वी झालो नसतो."
"पूर्वी असा एक काळ होता की व्यक्तिगत अन्यायाला किंवा अपराधाला व्यक्तिगतच जवाब द्यावा लागे.  व्यक्तिच्या सुखाची, सुरक्षिततेची, सन्मानाची हमी द्यायला समाजच संघटित नव्हता.  माणसाला स्वत:पुरता कायदा करावा लागे आणि मनगटाच्या बळावर तो अंमलात आणावा लागे.  असं समज की माझ्यापुरता मी त्या युगात वावरतो.  या कल्पना इतरांना कदाचित कालबाह्य, जुनाट, बुरसटलेल्या, बेजबाबदार वाटतील.  पण मला नाही! माझ्या आयुष्याला काही अर्थ असला तर तोच आहे! माझ्या डोळ्यापुढे काही आदर्श असला, काही ध्येय असलं तर तेच आहे!"
आणि मग चेतन हसत एकदम उभा राहिला.
"केवढ मोठं व्याख्यान !" तो हसत म्हणाला, "तो बघ शंभू. जेवण तयार आहे  म्हणून सांगायला आला आहे- चल!" 
गीता सावकाश उठली.
चेतनचा गंभीरपणा मगाशीच गेला होता. जेवताना त्याची सारखी बडबड चालली होती.  त्या शभूवर, घोरपड्यांवर टीका होती.  इतरही अनेक असंबद्ध विधानं होती.  पण गीता आता जाणून होती की हे सर्व वरवरचं आहे- आत खोलवर, एक साहसाची ज्योत धगधगत आहे- आणि शेवटी तिने धीर धरून मनातला खरा प्रश्न विचारला.
"चेतन, परवाच्या अनुभवानंतर रोजचं आयुष्य किती नीरस वाटतं!"
चेतन एकदम स्तब्ध झाला होता.  
"चेतन, तुम्हाला राग आला?"
"नाही, गीता.  राग नाही आला."  चेतन गंभीर आवाजात म्हणाला, "मी मघाशीच सांगितले.  एखादी स्त्री साथीदार हवी असती तर मी तुझ्यासारखीच एखादी निवडली असती-- पण गीता, मी जो मार्ग स्वीकारला आहे तो सर्व परिणामांचा विचार करून मगच निवडला आहे.  सर्व परिणाम भोगायची तयारी ठेवूनच या वाटेवर पाऊल टाकलं आहे.  मृत्यू हा माझा कायमचा साथीदार आहे, तो माझ्यापासून हाकेच्या अंतरावर सतत वावरत असतो.  जीवनाच्या क्षणाक्षणात जी धुंदी येते ती मृत्यूच्या सान्निध्यानेच येते.  एक पाऊल चुकलं, एक अंदाज खोटा ठरला, कटप्रतिकटातील एक चाल जरी वाकडी पडली तरी सर्व खेळ खलास !  मृत्यूला क्षणाक्षणाला हुलकावणी देऊन, त्याच्या जबड्यातून खेचून आणलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण जणू सुवर्णाचा बनून येतो- पण हे सर्व माझ्यापुरतंच मर्यादित आहे- इतर कोणाला असा धोका पत्करायला सांगायचा मला कोणता हक्क आहे?"
"आणि इतर कोणी स्वखुशीने तयार झालं तर?"
चेतन बराच वेळ तिच्याकडे पाहात राहिला, आणि मग हसत म्हणाला,
"पाहू! पाहू! तशी वेळ आली तर तुलाही ती साद येईल!"
"चेतन, हे वचन समजू का?"
"हो! तशी वेळ आली तर तेही होईल!"
आणि मग गीतासाठी ते साधं जेवण राहिलं नाही.
त्याच्या सहवासात गीता सर्व काही विसरली होती.  चारचे ठोके कानावर येताच तिचं रोजचं सर्व आयुष्य चारी बाजुंनी तिच्याभोवती जमा झालं  चेतनचा निरोप घेण्यासाठी ती उठली.  तिचा हात चेतनने हाती घेतला, काही क्षण तसाच ठेवला, आणि मग किंचित दाबून सोडला.
"पुन्हा भेट होईपर्यंत नमस्कार, गीता!" तो म्हणाला.
"पुन्हा भेट होईपर्यंत!" गीता हसत म्हणाली व बाहेर पडली


चेतन (लेखक -  नारायण धारप)
पृष्ठे - १६८ 
मूल्य रूपये १६०/-
समन्वय प्रकाशन / अजब डिस्ट्रिब्युटर्स, कोल्हापूर



  

Sunday, December 15, 2013

कधीकाळी भारतात कचरा वाहतूक करायच्या रोल्स रॉयस

आजकाल प्रतिष्ठेचे चिह्न म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोल्स रॉयस कार कधीकाळी भारतात कचरा वाहण्यासाठी वापरल्या जात होत्या.  रोल्स रॉयस अन् कचरागाडी... वाचून विश्वास बसला नसला तरी हे खरे आहे.  भारतातील अलवर संस्थानचे राजे महाराजा जयसिंह हे ब्रिटनला गेले होते त्यावेळी त्यांचे लक्ष लंडनमधील बॉण्ड रस्त्यावरील रोल्स रॉयस कारच्या भव्य शोरूमकडे गेले.  त्यांनी तिथे जाऊन या कारबाबत चौकशी केली.  मात्र समोर भारतीय असल्याचे पाहून तिथल्या मॅनेजरने त्यांना गेट आऊट म्हणून अपमानित केले.  अपमानित झालेले महाराजा जयसिंह आपल्या हॉटेलमध्ये परत आले.  तिथून त्यांनी रोल्स रॉयसच्या त्या शोरूमवर फोन करून अल्वरचे महाराज काही कार खरेदी करण्यास येणार असल्याचे सांगितले.  थोड्या वेळाने महाराज खास राजेशाही पोशाखात सर्व लवाजम्यासह त्या शोरूममध्ये दाखल झाले.  यावेळी त्यांचे रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आले.  तेव्हा तोच मॅनेजर आपल्या स्टाफसह महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे अभिवादन करीत होता.  महाराजांनी तेव्हा शोरूममधील सर्व कार खरेदी करून त्यांची किंमत व भारतापर्यंतच्या वाहतूकीचा खर्च दिला.  भारतात आल्यावर महाराजांनी या सहाच्या सहा कार अल्वर नगरपालिकेला भेटरूपात दिल्या आणि त्यांचा रोजचा कचरा उचलण्यासाठी वापर केला जावा, असा आदेश दिला.  जगातील अव्वल समजल्या जाणार्‍या सुपरक्लास रोल्स रॉयसचा कचर्‍याच्या वाहतूकीसाठी वापर केला जात असल्याची माहिती वणव्यासारखी जगभर पसरली.  त्या काळी ब्रिटन, अमेरिकेतली एखादी व्यक्ती माझ्याकडे रोल्स रॉयस कार असल्याचे अभिमानाने सांगू लागला, तर समोरचा लगेच बोलत असे की, तीच ना जी भारतात कचरा वाहतुकीसाठी वापरली जाते.  या बदनामीमुळे रोल्स रॉयस कारची विक्री जगभर प्रचंड मंदावली होती.  त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला.  अखेर रोल्स रॉयस कंपनीने तत्काळ महाराज जयसिंह यांना तार पाठवून लेखी माफी मागितली.  कंपनीला धडा मिळाल्याची खात्री पटली तेव्हा महाराजांनी या कारचा कचरा वाहतुकीसाठी वापर थांबविला.

विश्वभ्रमण सदर / दैनिक पुण्यनगरी / दिनांक ११.१२.२०१३

Monday, December 2, 2013

पुढील पिढी आधीच्या पिढीची ’झेरॉक्स कॉपी’?

पुढील पिढी मागच्या पिढीची ’झेरॉक्स कॉपी’?

एक वयस्कर मनुष्य आपल्या छोट्याशा मुलाला बोटाला धरून एका वरातीचा सोहळा बघायला जातो.  वरातीत नवरदेव घोड्यावर बसलेला असतो.   घोडा नाचत असतो.  परंतु लोकांच्या गर्दीमुळे त्या मुलाला घोड्याचा नाच नीट दिसत नाही.  त्याची अडचण दूर करण्यासाठी वडील त्याला उचलून खांद्यावर घेतात.  आता त्या मुलाला घोड्याचा नाच चांगला दिसू लागला.  घोड्याच्या शेपटीचा गोंडा तुम्हाला दिसतोय का, असे त्याने वडिलांना विचारले.  पण तो गोंडा त्यांना काही दिसत नव्हता.  छोट्याशा मुलाला दिसणारा गोंडा त्याच्यापेक्षा कितीतरी उंच असलेल्या त्याच्या वडिलांना मात्र दिसत नाही, ही घटना आपल्याला एक नवी दृष्टी देऊन जाते.

आपल्या वडिलांना जो गोंडा दिसत नाही, तो आपल्याला दिसला म्हणून मुलाने घमेंड बाळगू नये आणि मला न दिसणारा गोंडा या खुंट्याएवढ्या कार्ट्याला कसा दिसेल, म्हणून वडिलांनीही त्याची कानउघाडणी करू नये.  खरे म्हणजे वडिलांची प्रत्यक्ष उंची ही मुलाच्या प्रत्यक्ष उंची पेक्षा जास्त आहे.  पण त्या बरोबरच वडिलांची ही उंची आयती मिळाल्यामुळे मुलाच्या डोळ्यांची पातळी वडिलांच्या डोळ्याच्या पातळीपेक्षा वरची झाली आहे.  त्यामूळे त्याला वडिलांपेक्षा अधिक दूरचे दिसणे स्वाभाविक आहे.  ही घटना खरे म्हणजे दोघांच्याही आनंदाची आहे.  आपल्या मुलाला आपल्यापेक्षा दूरचे दिसावे, त्याला आपल्यापेक्षा अधिक कळावे, अशीच आईवडिलांची इच्छा असायला हवी.  आपल्या मुलांचे आचारविचार तंतोतंत आपल्या सारखेच असावेत, अशी अपेक्षा करणे, म्हणजे पुढची पिढी ही आधीच्या पिढीची ’झेरॉक्स कॉपी’ असावी असे म्हणण्यासारखे आहे.  तसे झाल्यास मानवी समाजाची प्रगती होणारच नाही.  त्यांच्या त्रुटी, उणिवा दूर होणारच नाहीत. समाजजीवनाचे एक डबके तयार होईल.  खळाळता प्रवाह बनणार नाही.  म्हणूनच पुढच्या पिढीला नवनव्या आचारविचारांची ताजी टवटवीत पालवी फुटल्याचे दिसले, तर तिचे स्वागत करण्याची तयारी जुन्या पिढीने दाखवावी.  पण त्या पालवीतील एखादे पान किडलेले असले, तर सगळी पालवी खुडून टाकण्याचा अविचार न करता ते किडलेले पान अलगद काढून टाकावे - इतर कोवळ्या पानांना इजा होणार नाही इतक्या हळूवारपणाने!  आईवडिलांनी मुलांच्या बाबतीत जशी उदार भूमिका घेतली पाहिजे, तशीच शिक्षकांनी, गुरूजनांनीदेखील आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ’पुरो’गामी, ’भविष्यगामी’ दृष्टी ठेवली पाहिजे.  आपल्या विद्यार्थ्याला आपल्यापेक्षा जास्त कळू लागणे, हा त्यांनी आपल्या ’गुरूत्वा’चा विजय मानला पाहिजे.  ’शिष्याद् इच्छेत् पराजयम् - शिष्याकडून पराभवाची इच्छा बाळगावी’ हे सुभाषित त्या दृष्टीने आशयघन आहे.  ज्ञानाची ही प्रक्रियाच आपल्याला खर्‍या अर्थाने फुलवते.

मन निरभ्र : डॉ. आ. ह. साळुंखे, ’लोकायत’, १३ यशवंतनगर, गेंडा माळ, सातारा - ४१५ ००२.
प्रवाह पुरवणी पुण्यनगरी रविवार दि. ०१ डिसेंबर २०१३

पुण्यनगरी रविवार अंकाच्या प्रवाह पुरवणीतील इतर वाचनीय सदरे

  1. आरसा - अमर हबीब (भ्रमणध्वनी) ९४२२९३१९८६
  2. सत्य असत्याशी - सुनील यावलीकर  (भ्रमणध्वनी) ९४०४६८९५१७
  3. कोठे तरी चुकतंय - ऍड. अपर्णा रामतीर्थकर  (भ्रमणध्वनी) ९३७०४०४९९३
  4. उद्योग विश्व - वेणुगोपाल धूत
पुण्यनगरी रविवार मुख्य अंकातील वाचनीय सदरे


  1. पडद्यामागील वस्त्रहरण - गंगाराम गवाणकर
  2. हृदयीच्या गोष्टी - डॉ. विजया वाड
  3. फेरफटका - सोमनाथ पाटील
पुण्यनगरी रोजच्या अंकातील वाचनीय सदरे
  1. ओळख - सोमनाथ पाटील
  2. अंतिम पानावरील आंतरराष्ट्रीय बातम्या

Monday, November 21, 2011

आहे आणि नाही (लेखक :- विष्णू वामन शिरवाडकर)

पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही
शाळेत शिकविल्या जाणार्‍या कित्येक गोष्टी, शाळेचा उंबरठा ओलांडून आपण बाहेर आलो म्हणजे खोट्या किंवा चुकीच्या आहेत असं आपल्याला आढळून येतं.  शाळाकॉलेजांच्या संकुचित इमारतीबाहेर मानवी व्यवहाराचं जे विशाल विद्यापीठ पसरलेलं आहे त्यात शालेय सिद्धांताची कोणी पर्वा ठेवीत नाही असंच सामान्यत: दिसून येतं.  शाळेत शिकवलं जातं एक आणि वस्तुस्थितीत असतं काहीतरी वेगळंच.  आपलं चारित्र्य आणि शील पुष्ट होण्यासाठी कितीतरी नीतिपाठांची आसवं आणि अरिष्टं आपल्याला दिली जातात!  या सोज्वळ तत्त्वांचा हात धरून आपण जगात वावरलो  तर आपल्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाविषयी शंका बाळगायचं काहीही कारण नाही अशी आपली समजूत करून देण्यात येते.  परंतु अनुभव असा येतो की निदान ऐहिक कल्याणाच्या बाबतीत हे नीतिपाठ पुरे पडत नाहीत.  पुरे पडत नाहीत इतकंच नव्हे तर त्यांच्या ते आड येतात!  दिवाळीत अंगणामध्ये लावलेल्या पणत्या वार्‍याची झुळूक आली की विझून जातात त्याप्रमाणे या शालेय तत्त्वांची अवस्था होते.  जे या तत्त्वांची लोढणी गळ्यात घालून घेत नाहीत ते मात्र पृथ्वीवरील शर्यतीमध्ये आघाडीला जातात.  अर्थात पारलौकिक कल्याणासंबंधी मात्र काही सांगता येत नाही.  परंतु जे नाणे या पेठेत चालत नाही ते दुसर्‍या पेठेतही चालेल हे फारसं संभवनीय नाही.  तेव्हा शाळेत शिकवलं जातं ते सारं खरंच असतं असं नाही. 


Monday, October 24, 2011

आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध


आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध
आदित्य ही कादंबरी मी सर्वप्रथम ऑक्टोबर २००० मध्ये वाचली.  अरूण हेबळेकर यांच्या अनेक कथा कादंबर्‍या मी त्यापूर्वी वाचल्या होत्या आणि त्यानंतरही वाचल्या आहेत.  त्यापैकी जवळपास सर्वच रंजक आहेत पण आदित्यचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की त्यानंतर गेल्या अकरा वर्षांमध्ये मी ही कादंबरी एकूण बारा वेळा वाचून काढली आहे.  या कादंबरीत असे काय आहे?  म्हंटले तर विशेष काही नाही.  म्हणजे खटकेबाज संवाद, रोमांचक मारामारीची वर्णने, बोजड तत्वज्ञान, रोमॅंटिक / श्रुंगारिक वर्णन करणारी वाक्ये ही सहसा यशस्वी कादंबर्‍यांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये; पण आदित्य मध्ये यातले काहीच नाही.  तरीही या कादंबरीत अशी काही अद्भुत ताकद आहे की तुम्ही ती एकदा संपूर्ण वाचलीत की तुम्हाला अजुन एकदा तरी संपुर्णत: वाचल्याशिवाय पुन्हा खाली ठेवावीशी वाटत नाही.  या कादंबरीत एकही पात्र दुसर्‍या पात्राला साधी थप्पड लगावत आहे इतपत देखील हिंसेचा उल्लेख नाही तरीही ती वाचताना तुम्हाला एक युद्धवर्णन वाचल्याची जाणीव होते.  हे युद्ध आहे अंधाराविरूद्ध.  संकटपूर्व परिस्थिती, जी अगदीच थोडावेळ आहे; त्यानंतर येऊ घातलेल्या संकटाची चाहूल, मग संकटाची व्याप्ती समजताच मनाला होणारी हतबलतेची जाणीव, या निराशेतूनच मग अगदीच शेवटचा मार्ग म्हणून एका अनपेक्षित व्यक्तिची युद्धात घेतलेली तातडीची मदत, युद्धात आपण जिंकू की नाही याबद्दलची साशंकता, जिंकलोच तरी युद्ध किती काळ चालणार आणि किती हानी होणार याविषयी मनाशी बांधलेले आडाखे, त्याचप्रमाणे युद्ध सुरू होण्याआधीच आपण ते हरलोय हे मनाशी धरून युद्धोत्तर परिस्थितीला तोंड देण्याकरिता केलेली मानसिक तयारी, त्यानंतर प्रत्यक्षात युद्धाचे वर्णन आणि नंतर धक्कादायक शेवट ही या कादंबरीची बलस्थाने आहेत.
२४ डिसेंबर १९९४ ला रात्री पावणेबाराच्या आसपास कादंबरीतील कथानक सुरू होते आणि जवळपास दोन दिवस आणि काही तास झालेले असतात तेव्हा ते संपते.  पन्नासेक तासांच्या या प्रवासात वाचकाला अनेक पात्रं भेटतात.  कादंबरीचे शीर्षक ’आदित्य’ हे ज्यावरून आले आहे सर्वप्रथम त्याची ओळख करुन घेऊयात. 
’आदित्य’ भारताचा आणि जगाचा पहिलावाहिला वीजनिर्मितीसाठी बांधला गेलेला फ्यूजन रिऍक्टर.  सहा हजार हेक्टर जमिनीत कारवार अंकोला रस्त्याजवळच्या परिसरात याची स्थापना झालेली आहे.  एक मोठा सूर्याकृती, बारा आर्‍यांनी वेढलेला, अर्धा-एक किलोमीटरभर व्यासाचा ’आदित्य’ नजरेत भरतो.  आसावर ’आदित्य’चा गाभा.  गाभ्यापासून बारा आरे निघतात आणि ते पाचशे मेगावॅट जनरेटर्सच्या पोटात संपतात.  ’आदित्य’ चा अर्धाअधिक गाभा जमिनीत पुरलेला आहे.  त्याच्यावर पंचवीस फूट जाड कॉंक्रीटचा थर देऊन त्यावर पुन्हा पोलाद आणि शिश्याच्या पत्र्याचे आवरण घातलेले आहे.  ’आदित्य’ मध्ये हायड्रोजन आणि ऑर्फन वायूच्या साहाय्याने उच्च तापमानाला फ्यूजन प्रक्रियेद्वारे वीजनिर्मीती केली जाते.  ’आदित्य’ च्या परिसरातच जवळपास दीड हजार कर्मचार्‍यांच्या निवासाची सोय केलेली आहे.  या कर्मचार्‍यांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कारवार आणि अंकोल्याला जाण्यासाठी दिवसातून सहा वेळा बसेस सोडल्या जातात.
’आदित्य’ हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.  तेथील कर्मचार्‍यांमध्ये जवळजवळ संपूर्ण भारताचे प्रतिनिधीत्व झालेले आहे.  मिझोराम, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, आसामपासून राजस्थानपर्यंत.  काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत.  प्रत्येक राज्यातील, जवळजवळ प्रत्येक भागातील एक तरी कर्मचारी तिथे आहेच.  आदित्य चा कर्मचारी वर्ग, काही अपवाद सोडल्यास पूर्ण कार्यक्षम आहे.  युनियन आहेत, भांडणे आहेत परंतू संप झालेला नाहीय.  याचे कारणही लगेच समजते.  तिथे कर्मचारी वर्ग फारसा टिकत नाही.  सात वर्षापूर्वी जेव्हा आदित्य ची स्थापना झालेली असते तेव्हाच्या कर्मचार्‍यांपैकी केवळ तीस टक्के लोक सध्या कार्यरत असतात.  लोक येतात, प्रशिक्षण घेतात आणि दुसरीकडे बदली मागून घेतात.  त्यामुळे तीन युनियन असूनही कुठल्याही युनियनने जम बसविलेला नाहीये.  एकूण कर्मचार्‍यांपैकी केवळ अठ्ठेचाळीस टक्के कायम कर्मचारी आहेत.  लोक निघून जातात कारण : भीती.  ’आदित्य’ च्या एकंदर रचनेमुळे तिथे येणारा प्रत्येक माणूस बिचकतच येतो आणि जातो तो सुटकेचा नि:श्वास टाकून.  ही भीती निर्माण व्हायला राजकारणी आणि वर्तमानपत्रवाले सारखेच जबाबदार आहेत.  गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रत्येकच जण दरवेळी आदित्य च्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत असतो.  अर्थात आदित्य मध्ये आजपर्यंत एकही अपघात घडलेला नसतो.  त्याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही कौतुकाने म्हणतात, “देशातील इतर अण्विक प्रकल्पांच्या कार्यक्षमतेकडे पाहता मला सांगायला अभिमान वाटतो की ’आदित्य’  ने गेल्या सहासात वर्षांत एका दिवसाची देखील विश्रांती घेतलेली नाही की तो बंद पडलेला नाही.”
आता आदित्यमध्ये काम करणार्‍या प्रमुख कर्मचार्‍यांची आणि या कादंबरीतील इतर पात्रांची ओळख करून घेऊ.  सर्वप्रथम ’आदित्य’ चे विद्यमान संचालक डॉ. अनिरुद्धकुमार भारद्वाज.  फीजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पी. आर. एल.) अहमदाबाद इथून सायंटिस्ट ’एफ’ म्हणून तीन वर्षे काम केल्यावर त्यांची नियुक्ती ’आदित्य’ च्या संचालकपदावर दोन वर्षांपूर्वी झालेली असते.  ’आदित्य’ मध्ये काम करणार्‍या मोजक्याच संशोधकांपैकी ते एक.  भारद्वाज, सुंदर राघव राव, कुलदीप तन्ना, मेहेर दस्तूरजी, सर्वेश्वर आणि डेमियन सोडल्यास इतर सर्व कर्मचारीवर्ग तंत्रज्ञ आहे.  खरे तर दोन वर्षांपूर्वी संचालकपदाचा मान डॉ. सुंदर राघव राव यांना मिळायला हवा असतो; परंतु त्यावेळी केंद्रीय मंत्रालयातील ऊर्जा-विभागाचे सचिव प्रसन्नकुमार भारद्वाज आपले वजन खर्ची घालून आपले बंधू अनिरुद्धकुमार भारद्वाज यांची संचालक पदी नियुक्ती करून घेतात.  अर्थात डॉक्टर अनिरुद्धकुमार भारद्वाज हे एक अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ असल्याने त्यांनी केवळ वर्षभरातच आपल्या कर्मचारीवर्गावर छाप बसविलेली असते.  जरी सुरूवातीला भुवया उंचावल्या गेल्या असल्या तरी त्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांकडून विशेष विरोध होत नाही.  खुद्द सुंदर राघव रावही फारसे मनावर घेत नाही.  त्यामुळे भारद्वाज आपल्या पदावर खूष असतात.  समाधानी असतात. 
कादंबरीतील पुढचं महत्त्वाचं पात्र म्हणजे डॉक्टर स्टॅनिस्लास व्हेलरी डेमियन.  संचालकानंतरचं दुसरं महत्त्वाचं पद भुषविणारे हे शास्त्रज्ञ आदित्य मध्ये अगदी सुरूवातीच्या काळापासून कार्यरत आहेत.  पण तरीही... डेमियन तसा चांगला माणूस.  सरळ, निर्भीड परंतु थोडासा भावुक.  सबंध केंद्रात त्याला मोजकेच मित्र आहेत.  तसे पाहता तो जिभेचा तिखटदेखील नाहीय.  सबंध केंद्रात त्याने कुणाला दुखावलेले नाहीये.  कधी कुणाला पाडून बोललेला नाही.  आपल्या सहकार्‍यांचा त्याने चुकूनदेखील अपमान केलेला नाही.  तरीही त्याला मित्र असे फारसे नाहीत.  वेणू सोडला तर कोणीही नाही.  सायंटिस्ट बी वर्गातील एकही माणूस डेमियनकडे येत नाही.  त्याहीपेक्षा वरील श्रेणीतील तर सोडाच.  वेणू हा एकटाच असा आहे की जो सायंटिस्ट ई-टू असूनही डेमियनला भेटायला जात असे.  त्याच्याशी बोले.  इतर डेमियनला वाळीत घातल्यासारखे वागतात.  गेली सात वर्षे असेच चालु असते.  इतके असूनही डेमियन पर्वा न करता काम करतोय.  लोकांना भेटायचा प्रयत्न करतोय.  तसे लोक बोलतात त्याच्याशी - तो बोलला तरच!  त्याला गरज पडली तरच.  अगदी कामापुरते.  एरव्ही नाही.  डेमियनशी नीट बोलणारे लोक म्हणजे - त्याच्या विभागात नव्याने आलेले जॉन, कॉनी आणि डेव्हिड हे तिघे खालच्या श्रेणीतील कर्मचारी, वेणू आणि . . . खुद्द संचालक.  त्यांत वेणू एकटाच डेमियन शी मित्रत्वाने वागत असतो.  पण त्याचेही हल्ली काहीतरी बिनसलेले आहे.  काय ते त्याने सांगितलेले नाही, परंतु डेमियनला अंधुकशी जाणीव आहे.  आता वेणूही त्याच्यापासून दुरावु लागलाय. 
संचालक डेमियनशी बोलतात त्याचे कारण वेगळेच आहे.  कदाचित तेच कारण वेणूने न बोलण्याचे आहे.  जॉन, कॉनी आणि डेव्हिड हे चमचेगिरी करण्यापुरते जवळीक साधताहेत हे डेमियनलाही जाणवते परंतु त्याचा नाईलाज असल्याने तो ते चालवून घेतो.
डेमियनला त्याच्याशी अबोला धरलेल्या सहकार्‍यांचा विलक्षण राग येत असतो.  त्याला वाटते, ते त्याचा दोष नसताना त्याच्याशी वितुष्ट धरताहेत.  पण याबाबतीतही पुन्हा त्याचा नाईलाज असतो.  तो कुणाशीही उघडपणे चर्चादेखील करू शकत नाही.  कसा करणार?  कोणीही त्या विषयावर बोलायचेदेखील टाळताहेत.  सात वर्षांपूर्वी त्याने एक ’गुन्हा’ केलेला असतो.  इतरांच्या दृष्टीतून! आणि त्या ’गुन्ह्या’ची शिक्षा ते त्याला भोगायला लावीत असतात.  त्याच्याशी अबोला धरून.  वेणू, इतर सहकारी - एवढेच कशाला? ’आदित्य’ मधील इतर ख्रिश्चन कर्मचारी देखील डेमियनकडे नीट बोलत नसतात.  काही सात वर्षांआधीचे कर्मचारी असतात.  काही नवीन.  जुन्यांचे ठीक, परंतु नव्यांचे काय? कदाचित त्यांना जुने कर्मचारी शिकवून देत असतील.  एकूण काय? तर डेमियनला कोणी आपला समजत नाही. 
आणि हे सारे डेमियन सात वर्षांपासून सहन करीत आलेला असतो.  अनेकदा त्याला वाटतेही की सूड घ्यावा ह्या सर्वांचा!  सूडापोटी त्याला काही गोष्टी करणे शक्यही असते.  भारद्वाजांनंतर संचालक होणे ही गोष्टही त्याला जमण्यासारखी असते, नाही असे नाही; पण सर्वमान्यता मिळवून होणे मात्र केवळ अशक्य असते.  एक म्हणजे इतर असिस्टंट आणि डेप्युटी डायरेक्टर्सकडून विरोध होण्याची शक्यता असते.  त्याशिवाय इतर कर्मचारीही विरोधात जाण्याची शक्यता असते.  भारद्वाजांनंतर संचालकपदासाठी दोनच व्यक्ती स्पर्धेत असतात : जनरेटर्स ग्रूपचे डॉक्टर सुंदर राघव राव आणि रिऍक्टर मेंटेनन्स ग्रूपचे डॉक्टर दयाळ.
संचालकांनी हे जाणलेले असते आणि म्हणूनच ते डेमियनच्या अधिक जवळ येतात.  संचालक भारद्वाज जवळ येतात आणि वेणू दुरावतो. 
वेणू या कथानकातील अजून एक महत्त्वाचे पात्र.  वेणूचे डॉक्टर डेमियन यांच्याशी सुरूवातीपासून अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत.  डेमियनची पत्नी विनी बेंगलोरचीच म्हणजे वेणूच्याच गावची.  त्याला आपल्या धाकट्या भावासारखा मानत असते.  वेणू पन्नाशीला पोचलेला, अविवाहित.  वसाहतीत एकटाच राहत असतो.  वेणूच्या मनात डॉक्टर डेमियन बद्दल दुरावा निर्माण होण्याची दोन कारणे असतात.  एक म्हणजे गेल्या दीड एक वर्षांपासून डॉक्टर डेमियन अचानक अतिशय श्रीमंत झाल्यासारखे वागत असतात.  घरातले फर्निचर बदलतात.  त्याशिवाय इतरही बराच मोठा खर्च करीत असतात, जे नोकरीच्या पगारात अजिबात शक्य नसते. दुसरे कारण तांत्रिक मतभेदाचे असते.  आदित्य मध्ये दोन हायड्रोजन अणुगर्भांचं मीलन होऊन एका हीलियम अणूगर्भात रूपान्तर होतं.  हे रूपांतर घडण्यासाठी ’ऑर्फन’ नावाचा एक कॅटेलिस्ट लागतो.  ऑर्फन म्हणजे ’ऑर्गॅनिक रिएजंट - फ्यूजन ऍक्टिव्हेटिंग न्यूक्लिआय’.  हा कॅटेलिस्ट असेल तरच रूपान्तर झट्कन आणि दीड-दोन लाख सेल्सियस इतक्या तपमानावरच होतं.  एरव्ही कोटीभर डिग्री सेल्सियस इतकं तापमान लागणार असतं.  डॉक्टर डेमियन यांच्या निदर्शनास येतं की रूपान्तर न झालेला खूपसा हायड्रोजन तसाच रिऍक्टरमध्ये राहतो आणि तो मग नुसता जाळावा लागतो.  त्यानं धोका निर्माण व्हायची शक्यता असते.  म्हणून ते आपल्या मुंबईहून आलेल्या मित्रांच्या मदतीने एक प्रयोग करायचं ठरवतात आणि ऑर्फनचं प्रमाण थोडंसं वाढवतात.  त्यामुळे निदान पन्नास टक्के तरी वेस्ट कमी होईल असं त्यांना वाटत असतं.  पण वेणूला वाटतं की त्यामुळे रिऍक्टर हाताबाहेर जायची शक्यता आहे.  डेमियन च्या मते वेणू इज ओव्हर कॉशस.
तर एवढ्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ’आदित्य’चं कथानक सुरू होतं तेव्हा हवेत गारठा असतो.  आनंदी वातावरणात ख्रिश्चन घरांमध्ये ख्रिस्मस कॅरोल्स गायल्या जात असतात.  इकडे त्याच वेळी आदित्यच्या चार्ज कंट्रोल डिपार्टमेंट मध्ये रात्रपाळीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना दिसून येतं की गाभ्याचं तापमान जवळजवळ दहा टक्क्यांनी वाढलंय.  थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात येतं चॅनल पाचच्या कुलिंग पाईपला गळती लागली असून तिथे धोका निर्माण झालेला असतो.  संगणक सात नंबरच धोक्याचा इशारा देत असतो.  सर्वप्रथम वेणूला फोन जातो.  वेणूला परिस्थितीचं गांभीर्य कळतं तो ताबडतोब कार्यालयात हजर होतो.  रात्री एक च्या सुमारास वेणूसारखा ज्येष्ठ सायंटिस्ट कार्यालयात आलेला पाहून सुरक्षा विभागालाही काही तरी धोका असल्याचा वास येतो.  वेणू संगणकावर काही गणिती प्रक्रिया करून पाहतो आणि तापमान वाढण्याचा अंदाज लावतो.  तीन एक दिवसात गाभ्याचं वातावरण वितळून जायची शक्यता त्याला लक्षात येते.  ही बाब ती डेमियनच्या कानावर घालतो आणि डेमियन संचालक भारद्वाजांच्या. 
इकडे चॅनल नंबर पाचच्या जनरेटर रूममध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांपैकी मोहन नावाच्या कर्मचार्‍यालाही जनरेटरची फ्रिक्वेंसी घसरल्यामुळे कूलिंग चॅनलमधली गडबड जाणवते.  तो वेणूशी फोनवर बोलतो.  वेणू त्याला याविषयी गुप्तता बाळगण्यास सांगतो आणि ड्युटी संपली तरीही संगणकासमोरच थांबण्याचा आदेश देतो.
रात्रीत संचालक भारद्वाजांच्या निवासस्थानी तातडीची बैठक भरते.  स्वत: भारद्वाज, वेणू, डेमियन आणि सिक्युरिटी इन्चार्ज कॅप्टन वरदन् त्यास उपस्थित असतात.  आदित्य अतिशय सुरक्षित आहे असं यापूर्वी डेमियनसकट सार्‍यांनाच वाटत असतं.  त्यामुळे काही बाबतीत सारेच गाफील असतात.  एकटा वेणूच सुरूवातीपासून सांगत असतो की आदित्य बांधताना ठरवल्याप्रमाणे करायचे काही सुरक्षा उपाय राहून गेलेत.  त्यामूळेच डॉक्टर डेमियन यांच्या प्रयोगांना वेणूची हरकत असते.  बैठकीच्या सुरूवातीलाच भारद्वाज विचारतात, “सो मिस्टर वेणू, तुमची खात्री आहे की आदित्यचं आयुष्य संपायच्या मार्गावर आहे.  तुम्हाला काय वाटतं? हे सारं डेमियनच्या आणि त्यांच्या मित्रांच्या संशोधनासाठी केल्या गेलेल्या प्रयोगांमुळे झालं?”  यावर वेणू चूक कोणाची याचं थेट उत्तर द्यायचं टाळून आदित्यला आणि त्याही पूर्वी परिसरातील लोकांना वाचवायच्या बाबींना प्राधान्य देण्याचं सूचवितो.  त्याच्या विस्तृत विवेचनानंतर सार्‍यांनाच पटतं की वेणू सुरूवातीपासून ज्या खबरदारीच्या उपायांचा पाठपुरावा करतोय ते किती गरजेचे होते आणि याआधीच ते अंमलात आणणं किती महत्त्वाचं होतं.  अर्थातच आता संकट येऊ घातल्यावर हे उपाय करणं शक्यच नसतं.  तेव्हा लोकांचे प्राण वाचविण्याकरिता सुरक्षा दल, पोलिस, अग्निशामक दल, महत्त्वाचे राजकीय नेते या सर्वांसोबत बैठक घेऊन आजुबाजूचा संपूर्ण परिसर मोकळा करण्याची गरज बोलून दाखवितो.  सरतेशेवटी लोकांचे प्राण आणि आदित्य दोघांनाही खरंच वाचवायचं असेल तर खास दिल्लीहून त्याकरिता डॉक्टर भरत बसरूर यांना बोलविण्याची मागणी करतो.  बैठकीत जणू काही बॉम्बच पडतो.  सारेच एकदम स्तब्ध होतात.  सर्वांनीच हे नाव ऐकलेले असते.  डॉक्टर भरत बसरूर - ’आदित्य’ च्या संपूर्ण आराखड्याचा एक आधारस्तंभ.  आदित्यची संकल्पना त्यांचीच असते.  फक्त - आता ते त्यांच्यामध्ये नसतात. 
“वेणू, ते जरा कठीण काम आहे.  यू नो व्हॉट आय मीन!” भारद्वाज म्हणाले.  “सर सांगतो म्हणून रागावू नका, तुमचे बंधू केंद्रीय मंत्रालयात उच्च पदावर आहेत.  त्याच्याकरवी तुम्हाला हे काम करून घेता येईल. काही दिवसांसाठी तरी.  अर्थात, आदित्यला वाचवायचं की नाही यावर ते अवलंबून आहे.” वेणू म्हणाला.  “ते सारं करता येईल.  परंतु भरत बसरूर येतील का, हा प्रश्न आहे.” भारद्वाज म्हणाले.  “आपण सर्वेश्वर आणि गुप्ता यांना पाठवून त्यांना बोलावून घ्यावे.” वेणू म्हणाला.  “परंतु तितका वेळ आहे का आपल्याला?” भारद्वाजांनी विचारले.  “लगेच निघाल्यास जमेल.  गोव्याहून मुंबईची सकाळची फ्लाईट घेतली तर ते दुपारच्या आत दिल्लीला पोचतील.  तिथून सायंकाळी दिल्ली-गोवा डायरेक्ट फ्लाईट घेतली तर रात्रीच्या आत ते परत येऊन पोचतील.  आपली बैठक आज मध्यरात्री किंवा उद्या पहाटे घेता येईल.”  वेणू म्हणाला.  वेणूने सारे काही योजून ठेवलेले होते.  भारद्वाजांनी एक अस्वस्थ स्मित केले.  “सो, यू वॉन्ट हिम!” भारद्वाज म्हणाले.  “होय सर! आदित्यला वाचवायचा तो एकच आणि निर्वाणीचा पर्याय आहे.  अर्थात त्यानं आदित्य वाचेलच असं म्हणत नाही मी.  परंतु एक शक्यता आहे.”  वेणू म्हणाला.  “सद्य:परिस्थितीत ’आदित्य’ वाचायला तुम्ही किती टक्के चान्स देता?”  भारद्वाजांन डेमियनला प्रश्न केला.  डेमियनने वेणूकडे पाहिले.  “काहीच नाही.”  वेणूने डेमियनकरिता उत्तर दिले.  “कुणी पैज लावली तरी मी पैज घेणार नाही. - सर”.  वेणू बोलायचा थांबला आणि मग सावकाश म्हणाला, “पैज घ्यायला आपण असू की नाही हे तरी कुणाला माहीत आहे?” खोलीतील भयाण शांततेत ’आदित्य’च्या जनरेटर्सची गुणगुण तेवढी ऐकू येत होती.  दोन वाजायला आले होते.  ख्रिसमस चा दिवस सुरू झाला होता.
येऊ घातलेल्या संकटाची भयानकता वाचकांना इथे पुरेशी स्पष्ट होते.  या बैठकीनंतर ताबडतोब संचालक भारद्वाज ठरल्याप्रमाणे आपले बंधू प्रसन्नकुमार भारद्वाज यांना दिल्लीला फोन करून परिस्थितीची कल्पना देतात.  ते ऊर्जा राज्यमंत्र्यांना आणि ऊर्जा राज्यमंत्री पंतप्रधानांपर्यंत ही बातमी पोचवतात.  त्यानंतर सकाळी आठ वाजता गृहमंत्री तसेच तीनही सेना दलाच्या दिल्लीतील अधिकार्‍यांच्या बैठकी सुरू होतात.  भारद्वाज पंतप्रधानांना आपण डॉ. भरत बसरूरची मदत घेत असल्याचे कळवितात आणि भरत बसरूर ’आदित्य’ आणि परिसराला वाचविण्यास समर्थ असल्याची ग्वाहीही देतात.  त्यामुळे एक मात्र घडते - भरत बसरूर च्या नकळत त्याच्या कार्यक्षमतेविषयी अनेक उंच अपेक्षा निर्माण होतात. अनेकांच्या मनात. 
त्याचवेळी म्हंटले तर भीतीचे एक विलक्षण गूढ वातावरण सावकाश, हळुवारपणे ’आदित्य’ च्या परिसरावर पकड घेत असते.  म्हंटले तर नाही.  कारण सगळी कामे व्यवस्थितपणे पार पाडली जात असतात.  एकतर सर्वांनाच अजुन धोक्याची कल्पना आलेली नसते आणि ज्यांना ती आलेली असते ती ते स्वत:पुरतीच सीमित ठेवतात एखादे गूपित हृदयाशी बाळगावे तशी.  आदित्य नियंत्रणाबाहेर जात असतो खरा.  तापमानही वाढत असते.  पाच नंबर चॅनलमधील गळतीही चालुच असते.  परंतु सारे काही सावकाश, बिनधास्त चाललेले असते.  ’आदित्य’ ही त्या भरत बसरूर नामक त्रात्याची वाट पाहत निश्चिंतपणे नियंत्रणाबाहेर जात असतो. 
कार्यालयात वैज्ञानिकांचा विचारविनिमय सुरू असतो.  भारद्वाजांना पंतप्रधानांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून विचारल्या गेलेल्या अनेक प्रश्नांत एक प्रश्न प्रामुख्याने उपटलेला असतो.  तो म्हणजे, “आदित्य नियंत्रणाबाहेर गेलाय म्हणजे नेमकं काय झालंय? आणि नेमकं काय होणार? स्फोट होणार? किरणोत्सर्ग होणार? नुसती प्राणहानी होणार? मालमत्तेचा नाश होणार? आणि झालाच तर कितीसा परिसर त्याच्या प्रभावाखाली येणार?”  भारद्वाजांकडे त्या प्रश्नांना उत्तर नसते.  कुणालाच नीटसे माहीत नसते.  ’आदित्य’चा स्फोट झालाच तर किरणोत्सर्ग होणार नाही असे डेमियन आणि वेणू यांचे मत असते.  कारण फ्युजन रिऍक्टरची तीच एक खुबी असते.  परंतु जर त्याची तुलना एखाद्या हायड्रोजन बॉम्बशी किंवा उष्णौण्विक म्हणजे थर्मोन्युक्लिअर बॉम्बशी करायची झाली तर मालमत्ता आणि मनुष्य-जीव ह्यांची हानी प्रचंड प्रमाणात होईल ही शक्यता असते.  त्यामुळे प्रयत्न एकाच दिशेने व्हायला हवे असतात - आणि ती दिशा म्हणजे स्फोट होऊ न देणे.  डेमियन आणि वेणू यांच्याशी राव, तन्ना आदी कंपनी सहमत नसते.  राव दाखवून देतात की फ्यूजन प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात न्यूट्रॉन्स पण निर्माण होतात आणि ह्या न्युट्रॉन्समुळे बर्‍याचशा प्रमाणात किरणोत्सर्ग होणारच असतो.  तेव्हा नुसता स्फोट होऊ न देणे एवढ्याने भागणार नसते.  सबंध प्रक्रियाच थोपविणेच गरजेचे असते.  आणि ते काम करणे एकाच माणसाला - शक्य असलेच तर - शक्य असते आणि म्हणून सार्‍यांच्या नजरा डॉ. भरत बसरूर कडे लागून राहिलेल्या असतात.  दरम्यान सर्वेश्वर आणि गुप्ता भरत बसरूर ना आणण्याकरिता दिल्लीला रवना झालेले असतात. 
लष्करी अधिकारी कर्नल गुरदीपसिंग खन्ना आणि त्यांचे दुय्यम अधिकारी मेजर सारडा यांची ही तयारी सुरू असते.  ऑल ऍलर्ट चा संदेश दिला जातो.  प्रत्येक सैनिक सूचनेनंतर केवळ पंधरा मिनीटात तयार होईल, मोटराइज्ड कंपनीची सर्व वाहने तयार ठेवली जातील अशी व्यवस्था होते.  कुठल्याही प्रकारच्या अत्यंत जोखमीच्या कामाची सिद्धता होते.  कुटुंबियांना दूर पाठवायचं का असाही विषय निघतो पण कर्नलच्या मते ते शक्य नसते.  त्यांच्याही चर्चेत तो विषय निघतोच.  “आदित्यचे वैज्ञानिक कुणा भरत बसरूर नावाच्या माणसाची वाट पाहतायत.  यू नो हू ही इज?” कर्नलनी विचारले.  मेजरनी खांदे उडविले.  “सम एक्स्पर्ट?”  मेजरनी विचारले.  “वाटतं खरं! परंतु तो आहे कुठे? दिल्लीत असल्यासारखे ते बोलत होते.  त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो एकटाच सार्‍यांना - आदित्यलाही वाचवू शकेलसं दिसतंय.  कुठे असतो तो?” कर्नलनी विचारले.  “दिल्लीत असं म्हणालात ना?” मेजरनी म्हंटले.  “असं ते म्हणत होते खरे.  पण दिल्लीत तो काय करतोय? जर तो ’आदित्य’चा एकमेव तज्ज्ञ आहे तर तो इथंच असायला हवा होता.  दिल्लीत काही फ्यूजन रिऍक्टर्स नाहीत.” कर्नल म्हणाले.  “एनी वे! कामाला लागा मेजर.  मी त्यांना आपल्या वतीने सर्व साहाय्य मंजूर केलंय.”
इथे आता वाचकांनाही प्रश्न पडतो - कादंबरीचा लार्जर दॅन लाईफ असलेला नायक भरत बसरूर आदित्य च्या जवळ का नाही?  दिल्लीत तो काय करतोय? 
सेनाधिकारी आणि संरक्षणमंत्री यांच्या बैठकीत भरत बसरूर ’आदित्य’ ला वाचवण्यासाठी निघत असल्याची बातमी देण्यात येते आणि ती माहिती देतेवेळी भरत बसरूर मात्र तिहार तुरूंगात ख्रिसमसच्या आंघोळीची प्रतीक्षा करीत रांगेत उभा असतो.  इथे वाचकांना प्रचंड मोठा धक्का बसतो.  भरत बसरूर सव्वा सात वर्षांपासून तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असतो.  आता त्याच्या शिक्षेची दोन वर्षे आणि नऊ महिने बाकी असतात.  गेल्या सात वर्षांत त्याने दोन वेळा राष्ट्रपतींना सुटकेकरिता अर्ज केलेले असतात परंतु दोन्ही वेळा ते फेटाळले गेलेले असतात.  कुटुंबीय, मित्र परिवार यांनाही तो गेल्या दोन वर्षांत भेटलेला नसतो.  ख्रिसमसच्या दिवशी नेहमीच्या अळणी जेवणासोबत जास्तीचा एक गोड पदार्थ - खीर खाल्ल्यावर तो  तुरूंगाच्या खोलीत विश्रांती घेत असतानाच त्याला जेलरच्या केबिन मध्ये बोलावले जाते.  तिथे सर्वेश्वर आणि गुप्ता त्याला घ्यायला आलेले असतात.  ते त्याला थोडक्यात परिस्थितीची कल्पना देतात आणि आदित्यला वाचविण्यासाठी सोबत चलण्याची विनंती करतात.  त्यांनी आठ दिवसांचा पॅरोलही आणलेला असतो.  शिवाय आदित्यला वाचविल्यावर भरतची राष्ट्रपतींकरवी मुक्तता करण्याचेही आश्वासन देतात.  भरत त्यांना कुठलेही खोटे भरीव आश्वासन न देता त्यांच्या सोबत येण्यास तयार होतो आणि तिघांचा दिल्ली गोवा विमानप्रवास सुरू होतो. 
प्रवासात भरत त्या दोघांना तिजोरीफोड्याची ती प्रसिद्ध गोष्ट ऐकवितो.  अमेरिकेतील गोष्ट.  एक विमान एका शहरातून दुसर्‍या शहराला जात होते.  त्या विमानातून एका कुख्यात तिजोरीफोड्याला कैद करू काही पोलीसही प्रवास करीत होते.  विमान ठराविक उंचीवर गेल्यावर पायलट आणि को-पायलट दोघेही विमानाला ऍटोमॅटिक पायलटवर टाकून इतर प्रवाशांशी गप्पा मारायला कॉकपीटमधून बाहेर आले.  मध्येच विमानाला एक हादरा बसून कॉकपीटचे दार बंद झाले.  मजा अशी झाली की लॅचचे कुलूप होते आणि पायलट अथवा को-पायलटकडे किल्ली नव्हती.  घ्या! भयानक गोंधळ आणि भीती.  अखेर पायलट ला कळले की प्रवाशांमध्ये तो तिजोरीफोड्याही आहे.  त्याच्या विनवण्या करून शेवटी एका अटीवर तो तिजोरीफोड्या ते कुलूप उघडायला तयार झाला.  ती अट अशी : हवेतून जाणार्‍या विमानावर त्याचा पायलट म्हणजेच कॅप्टन हा अनभिषिक्त राजा असतो.  तो विमानात घडणार्‍या गुन्ह्याकरिता गुन्हेगाराला जसा शिक्षा फर्मावू शकतो तसाच शिक्षा माफही करू शकतो.  तेव्हा त्या तिजोरीफोड्याने आपल्याला मुक्त करण्याची अट घातली.  आणि शंभरावर लोकांच्या प्राणाची किंमत म्हणून त्या कॅप्टनने ती अट मान्य केली.  त्या चोराने कॉकपिटचे दार क्षणात उघडून दिले, आणि तो ज्या कुलूप फोडायच्या गुन्ह्यासाठी पकडला गेला होता त्याच गुन्ह्यामुळे मुक्त होऊन त्या विमानातून एक मुक्त नागरिक म्हणून उतरला.  गोष्ट ऐकवून भरत मनसोक्त हसतो तर सर्वेश्वर आणि गुप्ताचे डोळे पाणावतात.
इकडे प्रसन्नकुमार भारद्वाज भरत अयशस्वी ठरला तर असा विचार करून आदित्यला रेतीत पुरता येईल का याची चाचपणी सुरू करतात.  पण त्यांच्या या प्रयत्नांतून त्यांना एवढेच कळते की भारतात एवढे मोठे प्रकल्प करणारी एकही सॅल्व्हेजींग कंपनी नाही.  एक अमेरिकन कंपनी असली कंत्राटे घेते परंतू आदित्यला पुरायला किती खर्च येईल त्याचा फक्त अंदाज लावण्याचे कामच आठ दिवसांच्या वर जाणार असते.  घ्या! म्हणजे इथे आदित्यचा स्फोट झालाच तर तीन दिवसातच होणार असतो.  भारद्वाजांपुढे अजुनही एक अडचण असते.  त्यांच्या धाकट्या बंधूंना त्यांनी वशिलेबाजी करून या आदित्यच्या संचालकपदी बसविलेले असते.  याही बाबीची आता चौकशी होणारच.  दुसरा कोणी संचालक असता तर ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या नात्याने त्यांनी त्या संचालकाविरुद्ध कारवाई करून त्याला बडतर्फही करायला लावले असते पण आता आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती.  तिकडे त्यांच्या बंधूंचीही अशीच काहीशी अवघड परिस्थिती होते.  नात्याने त्यांचा भाचा असलेला भार्गव नावाचा कर्मचारी आदित्यवरील गोंधळाचा फायदा घेऊन लेसर प्रक्रियेत लागणारी सोळा लाख रूपये किंमतीची आठ माणके घेऊन पसार झालेला असतो.
आदित्यच्या नंबर पाच जनरेटरच्या विजेवर चालणार्‍या अनेक कारखान्यांपैकी कुंदापूरच्या सुधाकर शेट्टींचाही काजुगराचा एक कारखाना असतो.  विजेचा दाब आणि वारंवारिता कमी होत असल्याने मोटर्स नीट फिरत नाहीत आणि शेट्टींनाही आपला कारखाना बंद ठेवावा लागतो.  हे शेट्टी लवकरच विधानसभेच्या निवडणूका लढविण्याची स्वप्ने पाहत असतात.  स्थानिक बातमीदार गॅब्रिएल डिसुझा उर्फ गॅबी त्यांना योग्य ती पार्श्वभूमी तयार करून देत असतो.  आदित्य मध्ये झालेल्या बिघाडाचा फायदा घेऊन त्याविरुद्ध रान उठवा आणि निवडणूक जिंका असा सल्ला गॅबी शेट्टींना देतो.  पण शेट्टी आधी आदित्यवर फोन लावून नेमकी काय परिस्थिती आहे ह्याची चौकशी करण्यास गॅबीला सांगतो.  गॅबी फोन वर आदित्यच्या पीआरओ शी बोलतो आणि त्याला धोका असल्याचा संशय येतो. 
या धोक्याच्या तीव्रतेमुळेच स्वत: प्रत्यक्ष तिथे जाण्याऐवजी गॅबी वर्तमानपत्राच्या कार्यालयाला केवळ या बिघाडाची बातमी देतो आणि एखाद्या ज्येष्ठ वार्ताहराला आदित्यवर पाठवायची विनंती करतो.  त्याप्रमाणे पन्नाशी गाठलेले पत्रकार गुरूराजा यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडते.  गुरूराजा निघण्याआधी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाच फोन लावतात आणि त्यांना कळते की भरत बसरूर आदित्यला वाचविण्यासाठी येत आहेत.  भरत बसरूर चे नाव ऐकताच गुरूराजा च्या जुन्या आठवणी ताज्या होतात.  गुरूराजा संपादकांना तीच प्रसिद्ध तिजोरीफोड्याची गोष्ट ऐकवितो जी भरत विमानात सर्वेश्वर आणि गुप्तांना ऐकवित असतो.  त्यानंतर आदित्य कडे निघण्यापूर्वी गुरूराजा वर्तमानपत्राचे जुने अंक चाळत बसतो.  इकडे भरत बसरूरही त्याचे दोन्ही सहप्रवासी झोपी गेल्यावर विमानात बसल्या बसल्या जुना काळ आठवू लागतो आणि गुरूराजा व भरत सोबत वाचकांच्याही डोळ्यापुढे भूतकाळाचा पट उलगडतो.
१९६५ साली बार्क (बी.ए.आर.सी. - भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर) मध्ये पी एच डी करणारा विद्यार्थी भरत मोठ्या कष्टाने व त्याच्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपला प्रबंध पुरा करतो.  फ्युजन रिऍक्शनद्वारे वीजनिर्मीती करण्याचा शोध तो लावत असतो.  पुढे तो या विषयावर बर्कलेतही काम करतो.  त्यानंतर काही वर्षे पीआरएल मध्येही काढतो.  नंतर त्याच्या या संकल्पनेला उचलून धरणारे राव, तन्ना, डेमियन हे इतर शास्त्रज्ञही त्याला येऊन मिळतात.  त्यातल्या डेमियनशी तर त्याची विशेष मैत्री जुळते.  पुढे चार वर्षे भरत याच फ्युजन रिऍक्टर च्या कामासाठी स्वत:ला सर्वस्वी वाहून घेतो. 
१९७७ च्या जूनमध्ये आदित्य च्या यशाची चिन्हे दिसू लागतात.  आदित्य च्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होते.  पण दरम्यानच्या काळात घरच्या आघाडीवर भरतला फार त्रास होतो.  कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याने पत्नी छायाशी त्याचे वारंवार खटके उडतात.  या कटकटींमुळे तिला दिवस गेलेले असताना ती कुठली तरी गर्भनिरोधक औषधे घेते आणि तो गर्भ पाडते.  ज्याचा परिणाम म्हणून पुढे तिला गर्भधारणा झाली तरी गर्भ टिकत नाही.  शेवटी चवथ्या वेळी गर्भ राहून मुलगी सुनयना जन्मते पण “ऍब्नॉर्मल”.  तिला जन्मत:च सेरेब्रियल पाल्सी हा असाध्य आजार असतो.  आदित्यची घोडदौड सुरूच असते पण सुनयना कडे दुर्लक्ष होत असते. 
आदित्य अंतिम टप्प्यात असतो तेव्हा भरतला अमेरिकेला जाण्याची संधी मिळते.  तिथे त्याला एक विचित्र ऑफर दिली जाते.  आदित्य विषयी ची सर्व माहिती त्याने अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना द्यावी त्याबदल्यात ते त्याला दहा लाख डॉलर देऊ करतात ज्यामुळे त्याला अमेरिकेत त्याच्या मुलीवर महागडे उपचार करणे शक्य असते.  ही माहिती देणे हा देशद्रोह ठरेल का असे भरत डेमियनला विचारतो.  डेमियन त्याला होकारार्थी उत्तर देतो तरीही त्यावेळी भरत ती चूक करतोच.  ठरल्याप्रमाणे त्याची पत्नी छाया आणि मुलगी सुनयना अमेरिकेत राहू लागतात.  सुनयनावर उपचार चालु होतात.  भरत एकटाच भारतात परततो. 
भरतच्या या तथाकथित देशद्रोहाबद्दल त्याच्यावर खटला चालविला जातो.  पण त्याला कुठलीही शिक्षा ठोठावण्यापुर्वी त्याच्याकडून शक्य तितके आदित्यचे काम करून घेतले जाते.  त्यानंतर पुढे १८ ऑगस्ट १९८७ ला आदित्य पूर्णपणे कार्यान्वित होतो.  फक्त काही सुरक्षा उपाय राहिलेले असतात.  त्याचाही आराखडा भरतने बनविलेला असतो.  आपल्या सहकार्‍यांच्या ताब्यात भरत तो देतो आणि दोन दिवसांतच म्हणजे २० ऑगस्ट १९८७ रोजी त्याला अटक होते.  देशद्रोहाच्या आरोपाखाली १० वर्षे सश्रम तुरूंगवासाची शिक्षा होते.  खटल्यात डेमियनची साक्ष महत्त्वाची ठरते.  त्यामुळे भरत विषयी सहानुभूती असणारे सर्वच अधिकारी कर्मचारी पुढे डेमियनला वाळीत टाकतात.
नंतर आदित्यच्या या सात वर्षांच्या कालावधीत एकट्या पडलेल्या डेमियनला दोन वर्षांपूर्वी नव्यानेच आलेले संचालक भारद्वाज बरोबर हेरतात आणि आपल्यासोबत भ्रष्टाचारात सामील करून घेतात.  त्यामुळे खबरदारीच्या सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीत कसूर होत राहते.  आदित्यच्या बांधणीत एक पैशाचाही भ्रष्टाचार न करणारा भरत केवळ प्रकल्पाची माहिती गुप्त न ठेवल्यामुळे दहा वर्षे तुरूंगात गेला हे पाहून डेमियन ही निगरगट्ट झालेला असतो त्यामुळे तो भारद्वाजांसोबत भ्रष्टाचारात सामील होतो - पैशांची विशेष लालसा नसतानाही.  त्यामुळे त्याच्यापासून वेणूही दुरावतो.
तर हा असा भूतकाळाचा उलगडा झाल्यावर वाचक पुन्हा वर्तमानकाळात येतो.  आदित्यच्या परिसरात भरतचे आगमन होते.  भारद्वाज आणि डेमियनचे जुने सहकारी मित्र त्याचे स्वागत करतात.  जुन्या आठवणी निघतात.  भरतही काही काळ भावविवश होतो.  पण नंतर लगेचच अजिबात वेळ न घालविता ज्या कामासाठी आलेला असतो ते काम सुरू करतो.  तो ओटू प्रकल्प, फायबर ग्लास आणि स्टील सॅंडविच, लिक्विड हीलियम चेंबर्स याविषयी एकेक प्रश्न भारद्वाजांना विचारतो परंतू त्यापैकी एकाही सुरक्षा उपायाची अंमलबजावणी प्रत्यक्षात झालेली नसून केवळ ते कागदावरच असल्याचे त्याला समजते तेव्हा अतिशय धक्का बसतो.  संगणकाने सात नंबरचा धोक्याचा इशारा देउनही काहीच हालचाल न झाल्याचे समजल्यावर तो आपण सात वर्षांपूर्वी बनवून दिलेले आराखडे मागतो.  पण या गलथान लोकांना तेही सापडत नाहीत.  भरतला बसलेला धक्का पाहून भारद्वाज त्याला पटकन सांगतात, “आदित्यला वाळूत पुरायची एक योजना पुढे आलीय.  इथल्या लोकांना हलवायचं की नाही तेही ठरवायला हवं”. 
“इथल्या लोकांना हलवणार? कुठं? कधी? आदित्यचा स्फोट झाला तर इतका मोठा परिसर उद्ध्वस्त होईल की तुम्हाला पळता भुई थोडी होईल.  आपण सर्व वाचायची शक्यता आहे, डॉक्टर भारद्वाज - आदित्य वाचला तरच!  आणि प्रकल्पाला वाळूत पुरायच्या योजनेबद्दल विचाराल तर मी एवढंच म्हणेन - ज्या माणसानं ती सुचवली असेल त्यालाच वाळूत पुरा.  म्हणजे त्याला कसलीच झळ लागणार नाही.  वाळूत तोंड पुरणार्‍या उंटासारखं!”  इतकं बोलून भरत थेट चॅनल पाचवरच निघतो.  तिथे त्याला पाहून जुन्या कर्मचार्‍यांमध्येही उत्साह पसरतो.  स्वयंचलित सुरक्षा उपाय नसले तरी मॅन्युअली फायबरची भिंत सरकवण्याचे भरत ठरवितो.  यात मोठा धोका असतो.  हे काम करणारा भाजून निघणार असतो.  परंतू कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असलेले आदित्यचे कर्मचारी आणि सेनेचे जवान भरतच्या सूचनेप्रमाणे हे काम करू लागतात.  त्याच्या उपायामुळे तापमान खाली येण्याची शक्यता दिसू लागते परंतू भारद्वाज इथेही आडमुठे पणा करायचा प्रयत्न करतात.  “आपल्या जवानांच्या जीवनाची किंमत मी मातीमोलाची होऊ देणार नाही.  शक्यतो एकाही जीवाची हानी होऊ न देता मला हे कार्य करायला हवं.  एका जरी जीवाची हत्या झाली तरी मला माझी सद्सद्विवेकबुद्धी क्षमा करणार नाही.”  भारद्वाज त्वेषाने टेबलावर मूठ आपटीत म्हणाले.  भरतने अति सहजपणे सूत्रे हाती घेतलेली असतात.  सारेच, अगदी कर्नलसुद्धा भरतच्या आज्ञा सहजपणे पाळत असलेले पाहून भारद्वाज मत्सराने जळत असतात.  “दहा लाखांच्या किंमतीच्या हीलियम लिक्विफायरला पंचवीस लाख रूपये देऊन, आदित्य च्या सुरक्षा योजनेत अमूलाग्र बदल करताना तुमची सद्सद्विवेकबुद्धी कुठं पेंड खायला गेली होती काय?”  भरतने रुक्ष स्वरात विचारले.  त्यानंतर मात्र भारद्वाज काहीच बोलत नाहीत.  भरतच्या मार्गदर्शनाखाली जवान आणि कर्मचारी जखमी होत होत हीलियम बाथचा मारा करीत राहतात.  दरम्याने कुलिंग पाइपमध्ये साफ सफाई करताना ऍसिड राहिल्यामुळे छिद्र पडल्याचेही स्पष्ट होते आणि गळतीच्या मुख्य कारणाचा शोध लागून तेही दूर केले जाते.
काही तासांतच भरत आदित्यचं तापमान इतकं खाली आणतो की त्यामुळे तो आदित्यला स्फोटापासून रोखण्यास यशस्वी होतो.  पण प्रक्रिया पूर्णपणे बंद पडून आदित्य जर पूर्ण थंड झाला तर कायमचा निरुपयोगी होणार असतो.  प्रक्रिया पुन्हा चालु राहावी याकरिता लेझर चालु करणे गरजेचे असते.  परंतु त्याकरिता लागणारी माणके भार्गव चोरून घेऊन गेल्याचे कळताच भरत भार्गव चोरी करून कुठे पळून जाऊ शकेल याचा अंदाज लावून त्या दिशेला पोलिस तपास करण्याचे सूचवितो.  त्याप्रमाणे पोलिस भार्गवला सिकंदराबाद दिल्ली आगगाडीत अटक करतात आणि माणके ताब्यात घेतात. 
पोलिस ठीक साडेबारा वाजता ही माणकं आदित्य वर पोचवतात तेव्हा एकच जल्लोष होतो.  ख्रिसमस करिता बनविलेले केक्स वगैरे खाऊन यश साजरं केलं जातं.  आदित्य पूर्ववत होऊन एक लक्ष अंश सेल्सियस तापमानावर कार्यरत होईतो दुपारचे दोन वाजतात.  प्रत्येक कंट्रोल चेक-अप पॉईंटवरुन ओ.के. सिग्नल पाहिल्यानंतर भरत आपल्या घड्याळात पाहतो दुपारचे अडीच वाजलेले असतात.  “सो माय डियर फ्रेंड्स काम संपलं! आता गुडबाय म्हणायची वेळ येऊन ठेपलीय.”  भरत परतायची घोषणा करतो.  सारेच गहिवरतात.  भारद्वाज त्याला आनंदाची बातमी देतात.  त्यांचे ऊर्जासचिव असणारे बंधू दिल्लीहून गोव्याला निघालेले असतात.  येताना ते भरतकरिता माफीचा आदेश आणि टाईप केलेला अर्ज घेऊन येत असतात.  भरतने फक्त अर्जावर सही केली म्हणजे त्याची मुक्तता होणार असते.  पण भरत या प्रस्तावास विनम्र नकार देतो.  ऐवीतेवी शिक्षेची सात वर्षे पूर्ण झालेलीच असतात.  तीन वर्षांकरिता याचना करण्याची त्याची इच्छा नसते.  आपण पुन्हा तुरूंगात जायच्या निश्चयावर ठाम असल्याचे तो बोलून दाखवितो.  संचालकपदा साठी ज्याप्रमाणे आपण लायक नाही त्याचप्रमाने डॉ. भारद्वाज ही नाहीत हे तो त्यांना स्पष्ट सुनावतो.  सुंदर राघव राव ला संचालकपदी नेमा असेही तो पुढे सांगतो.  डेमियनलाही भ्रष्टाचारात सामील केल्याबद्दल भारद्वाजांना तो दोष देतो.  “सुनी (सुनयना) माझी मुलगी होती तिला वाचविण्यासाठी मी देशद्रोह केला.  हा आदित्य माझा मुलगा आहे.  माझ्या मुलासाठी मी काहीही करीने.”  या त्याच्या अखेरच्या वाक्यांनी भारद्वाज कमालीचे हादरतात.
सर्वेश्वर आणि गुप्ता भरतला गोव्याच्या दाभोळी विमानतळावर सोडवायला जातात.  विमानतळावर भरत म्हणतो, “सर्वेश्वर, दिल्ली विमानतळावरून तिहार कडे जायला टॅक्सी करावी लागेल आणि माझ्याकडे तर पैदेखील नाही.”  सर्वेश्वर खजील होऊन भरतला पाचशे रूपये देतो. 
त्याचवेळी इकडे डेक्कन टाईम्सचा ज्येष्ठ वार्ताहर गुरूराजा आदित्यच्या प्रवेशद्वारापाशी टॅक्सीतून उतरतो.  “एक सांग, आदित्य बिघडलाय म्हणे नं?”  आपले ओळखपत्र दाखवित तो सिक्युरिटी गार्डला विचारतो.  “बिघडला होता.  काल रात्री दहा वाजता डॉक्टर भरत बसरूर आले.  आज सकाळपर्यंत ठीक केला आणि दुपारी ते गेले.”  गार्ड उत्तरतो.  हे उत्तर ऐकून गुरूराजा हादरतो.  “एवढ्यातच? इतका मोठा ऊर्जाप्रकल्प! काम एवढंसंच? आणि एवढ्याशा कामासाठी ते दिल्लीहून आले? काम फार नव्हतं?”  गुरूराजा विचारतो.  “काम अय्या!  आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे हे.  कितीही मोठा प्रकल्प असला, कितीही मोठी चूक असली तरी फुकट घालवायला लोकांना वेळ कुठे असतो?  झट की पट काम व्हायलाच हवं! तुम्ही अजून विसाव्या शतकात आहात.  ’आदित्य’ एकविसाव्या शतकाचा प्रकल्प आहे.”  गार्ड हसत उद्गारतो. 
गुरूराजा दूरवरच्या ’आदित्य’ चा कानोसा घेतात.  एक संथ गुणगुण ऐकू येत असते.  जणू काही काहीच झालेले नसते.  काहीच बिघडलेले नसते.
आदित्यच्या वीजनिर्मितीच्या कार्यात क्षणभरही खंड पडू न देता अंधाराविरुद्ध अत्यंत कमी अवधीत युद्ध करून त्याला हरविणारा आपला महानायक पुन्हा स्वत:च्या आयुष्याला अंधाराच्या अधीन करायला निघून गेलाय ही हेलावून टाकणारी जाणीव वाचकाला करून देत आदित्य कादंबरी इथेच संपते. 
वाचकाला एक वेगळीच अनुभूति देणार्‍या १२८ पानांच्या या कादंबरीत गालबोट लावल्याप्रमाणे फक्त एकच गणिती चूक आहे.  पान क्र. ४८ वरील ही वाक्ये वाचा. 
अर्ध्या किलोमीटर व्यासाचा हायड्रोजन बॉम्ब फुटला तर किती मोठा परिसर उद्ध्वस्त होईल? गणित सोपे आहे.  प्रत्येक किलोमीटर वर्गाला पाचशे किलोमीटर वर्ग.  म्हणजे जवळजवळ अडीचशे किलोमीटर वर्ग परिसर उद्ध्वस्त व्हायला हरकत नसावी.  म्हणजे एक ऐंशी किलोमीटर लांबीचा दोर घ्या.  त्याचे एक टोक आदित्य वर ठेवा आणि दुसर्‍या टोकाने त्याभोवती वर्तुळ काढा.  त्या वर्तुळातील परिसर बेचिराख होऊन जाईल.
आता वर्तुळाचे क्षेत्रफळ = त्रिज्येचा वर्ग X ३.१४ हे सूत्र वापरून पाहिल्यास दोराची लांबी ऐंशी किलोमीटरच्या ऐवजी आठ किलोमीटर असायला हवी होती.  शिवाय मजकुरात हे सर्व अंकी न लिहीता अक्षरी असल्याने आठ ऐवजी ऐंशी छापणे हा बहुदा मुद्रणदोष नसावा असे वाटते.  म्हणजे ही लेखकाकडूनच अनवधानाने झालेली गणिती चूक असणार.  असो.  ही चूक वगळता आदित्य कादंबरी वाचनानंद देण्यात कुठेही कमी पडत नाही.
आदित्य । लेखक अरूण हेबळेकर । मौज प्रकाशन गृह, मुंबई.